|Monday, July 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘सूदीरसूक्त’ला पुरस्कार देण्यासाठी फिक्सिंग केल्याचा आरोप

‘सूदीरसूक्त’ला पुरस्कार देण्यासाठी फिक्सिंग केल्याचा आरोप 

प्रतिनिधी/ मडगाव

सूदीरसूक्त हा विष्णू वाघ यांचा कविता संग्रह पुरस्कारांच्या यादीत नव्हताच, पुरस्कारासाठी 25 पुस्तके निवडण्यात आली होती. पण नंतर या सूदीरसूक्तचा समावेश करण्यात आला. त्यामुळे या कविता संग्रहाला पुरस्कार देण्यासाठी फिक्सिंग झाल्याचा आरोप प्रकाश नाईक यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. ‘सूदीरसूक्त’वरील या नव्या आरोपामुळे काहीसे थंड झालेले वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बायलांचो एकवोट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश नाईक यांनी वरील आरोप करतानाच सूदीरसूक्तचे समर्थन करणाऱया एन. शिवदास यांच्यावर देखील प्रकाश नाईक यांनी जोरदार टीका केली. एन. शिवदास हे अराष्ट्रीय असून त्यांना मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार मागे घेण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली. या पत्रकार परिषदेला श्रीमती आवदा व्हियेगस व मार्गचे निमंत्रक गुरूनाथ केळेकर उपस्थित होते.

कोकणी अकादमीच्या साहित्य पुरस्कारासाठी 25 पुस्तकांची निवड विद्यार्थ्यांनी केली होती. हे विद्यार्थी कुठले ते आपल्याला ठावूक नाही. या विद्यार्थ्यांनी पुस्तकांची निवड केली होती. त्यात सूदीरसूक्तचा समावेश नव्हता. नंतर कोकणी अकादमीच्या अध्यक्षांनी सूदीरसूक्तचा समावेश केल्याने पुस्तकांची संख्या 26 वर गेल्याची माहिती प्रकाश नाईक यांनी दिली. नंतर सूदीरसूक्तला पुरस्कार मिळावा यासाठी परीक्षक मंडळ देखील तसेच निवडण्यात आले. त्यात विलभा काणेकर, सोनाली चोडणकर व संजीव वेंरेकर यांचा समावेश होता.

विलभा काणेकर ही व्यक्ती विष्णू वाघांना जवळची होती तसेच सोनाली चोडणकर हिचे साहित्य क्षेत्रात काहीच योगदान नव्हते, त्याच बरोबर तिने पुस्तकांचे सुद्धा वाचन केले नव्हते असा दावा प्रकाश नाईक यांनी केला. ‘सूदीरसूक्त’मधील कवितांना संजीव वेंरेकर यांनी आक्षेप घेतला व कविता उघडय़ा पाडल्याने आज त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. पण, विलभा काणेकर व सोनाली चोडणकर यांच्यावर देखील कारवाई होणे तितकेच गरजेचे असल्याचे प्रकाश नाईक म्हणाले.

जातीच्या निकषावर पुरस्कार नकोच

विष्णू वाघ हे भंडारी समाजातील असल्याने, त्यांच्या पुस्तकाला पुरस्कार मिळायला पाहिजे असे समर्थन केले जाते हे योग्य नव्हे. आपण सुद्धा भंडारी समाजातीलच आहे व आपले देखील पुस्तक पुरस्कार यादीतून बाजूला काढण्यात आले. पण, पुरस्कार जातीच्या निकषावर देऊच नये असे मत प्रकाश नाईक यांनी मांडले. सद्या जो सारस्वत विरोधी सूर व्यक्त केला जातो तो अत्यंत चुकीचा असल्याचे मत त्यांनी मांडले.

एन. शिवदास हे राष्ट्रीय लेखक आहे. पण, त्याची कृती अराष्ट्रीय ठरू लागल्याने त्यांना अराष्ट्रीय घोषित करावे तसेच त्यांना मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार मागे घेण्यात यावा अशी मागणी प्रकाश नाईक यांनी केली आहे. एन. शिवदास हे कोकणी लेखक संघाचे अध्यक्ष आहे. पण, त्यांनी जातीवाद पुढे केल्याने अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली.

आज बहुजन समाज सूसंस्कृत झालाय

विष्णू वाघ यांचा सूदीरसूक्त हा कविता संग्रह सारस्वतांना ‘टार्गेट’ करणारा आहे. 60 वर्षापूर्वीच्या काही गोष्टांचा त्यात समावेश झाला असावा, पण आज गोव्यात अशी परिस्थिती कुठेच नाही. बहूजन समाज हा सूसंस्कृत झाला आहे. अशा वेळी सूदीरसूक्तमधील कवितांचे समर्थन करता येणार नाही. या काव्य संग्रह भांडणांना आमंत्रण देणारा असल्याचे मत गुरूनाथ केळेकर यांनी व्यक्त केले.

साहित्य हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे असावे, त्यातून भेदभाव नसावा असे आपले प्रामाणिक मत असल्याचे त्यांनी सांगितले. सूदीरसूक्तमधील ‘छंद’ व ‘विश्वाची ओळख’ या दोन कवितांमधून स्त्रीला खाली पाडण्याचा प्रयत्न झाल्याचे मत व्यक्त केले. कविता संग्रहातील कविता उघडरित्या कोणत्याही व्यासपीठावर वाचण्याजोग्या नसल्याचे मत व्यक्त केले.

अत्याचार करणाऱयाला बोलण्याचा अधिकार नाही

एन. शिवदास यांनी अत्याचार केला आहे. त्यामुळे त्यांना बोलण्याचा कोणताच अधिकार नसल्याचे मत आवदा व्हियेगस यांनी व्यक्त केले. एन. शिवदासची प्रकरणे आपल्याजवळ पोचली होती अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. सूदीरसूक्तवर बोलताना त्या म्हणाल्या की, विष्णू वाघांनी अत्यंत घालच्या पातळीवर लिखाण केले आहे. त्यांच्या लिखाणाचे समर्थन करता येत नाही.

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत

प्रकाश नाईक, गुरूनाथ केळेकर व आवदा व्हियेगस या तिघांनीही कोकणी अकादमीचे पुरस्कार रद्य करण्याचा निर्णय घेतला, त्याचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्य होता असे ते म्हणाले. आम्ही मुख्यमंत्र्यांचे कधीच समर्थन करत नव्हतो. पण, या बाबतीत करावे लागल्याचे त्यांनी सांगितले. 

Related posts: