|Thursday, July 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » डबस्मॅशमुळे तो बनला रंगीला रायबा

डबस्मॅशमुळे तो बनला रंगीला रायबा 

एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी खरी गोष्ट म्हणजे सोशल मीडियावरील डबस्मॅश व्हिडीओमुळे नवोदित कलाकाराला अभिनयाची संधी मिळाली. सोलापूरचा एक युवक आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत नाटक पाहण्यासाठी पुण्याला जातो… नाटक सुरू होण्यापूर्वी तो नेहमीच्या सवयीप्रमाणे डबस्मॅशवर एक व्हिडीओ शूट करून फेसबुकवर अपलोड करतो आणि नाटक पाहून झाल्यावर त्याला त्याच्या मित्राचा फोन येतो… आणि तो चक्क एका सिनेमासाठी हिरो म्हणून सिलेक्ट होतो…

तर सीन असा आहे की, गेला उडत या नाटकाचा पुण्यात प्रयोग होता. सोलापूरचा युवा नाटय़अभिनेता आल्हाद अंदोरे आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत सिद्धार्थ जाधव आणि अमीर तडवळकर यांची भमिका असलेला गेला उडतचा प्रयोग पाहण्यासाठी तो पुण्याला गेला होता. नाटक सुरू व्हायला थोडा अवकाश असल्याने ऍक्टींगचं वेड असलेल्या आल्हादने नेहमीच्या सवयीप्रमाणे प्रेक्षागफहाच्या संकुलात डबस्मॅशवर नक्कल करणारे व्हिडीओ काढणं सुरू झालं. त्यातील एक डबस्मॅश व्हिडीओ आणि इन्स्टाग्रामवरील बुमरँग व्हिडीओ मित्र अमीर तडवळकर यांना टॅग करून फेसबुकवर अपलोड केला. संपूर्ण नाटक पाहून बाहेर पडतो तोच त्याला एक फोन आला. फोन अमीर तडवळकरचा होता. अमीरने त्याला तत्काळ नाटकाच्या गाडीजवळ बोलावलं. तो गेला… भेटला. अमीरने स्वत:च्या फोनवरून एक फोन लावला आणि आल्हादच्या हातात दिला आणि म्हणाला बोल. फोनवर समोरची व्यक्ती होती… दिग्दर्शक केदार शिंदे.

फेसबुकवर टॅग केलेले डबस्मॅश आणि बुमरँग व्हिडीओ केदार शिंदेनी पाहिले आणि अमीर तडवळकरला कॉल करून आल्हादबद्दल विचारणा केली. सोलापूरच्या एकाच नाटय़वलयातील असल्याने अमीर आल्हादला चांगला ओळखत होता. त्याने आल्हादच्या एकांकिका आणि नाटकातील कारकिर्दीबद्दल सांगितलं. केदार शिंदेंनी आल्हादला फोनवरून ऑडीशन पाठवायला सांगितली. आल्हादसाठी हे सारं स्वप्नवतच होतं. वेगवेगळय़ा शैलीत आल्हादने आपल्या अभिनयाचे व्हिडीओ शूट केले आणि अमीरच्या माध्यमातून केदार शिंदेना व्हॉट्सऍपवर धाडले. केदार शिंदेनी त्याला मुंबईत बोलावले. ‘रंगीला रायबा’ चित्रपटासाठी त्याची निवड झाली.  तुला लीड रोल देतोय. घरी सांग आता हीरो बनूनच सोलापूरला परतेन, असे केदार शिंदेंनी त्याला सांगितले. केदार शिंदेच्या बोलण्याप्रमाणे बॅग पॅक झाली आणि आल्हाद मुंबईत हजर झाला.

आल्हाद… दिसायला हॅण्डसम… उत्तम भाषाशैली… विनम्र… अभिनयाची उत्तम जाण… सोलापूरच्या कॉलेज रंगभूमीवरचा हिरो आणि व्यवसायाने ऍडव्होकेट! आतापर्यंत त्याने अनेक एकांकिका केल्या. त्यात अस्वल आणि दे धक्का या एकांकिका गाजल्या. इस्केलॅवो आणि हिल टॉप व्हीला या व्यावसायिक नाटकांनी त्याला ओळख मिळवून दिली. लहानपणापासून बालनाटय़ात काम करणाऱया आल्हादचं सिनेमात हिरो बनण्याचं स्वप्न गेला उडत हे नाटक पाहून साकार झालंय. रंगीला रायबा एकदम जबरदस्त ताजेपणा, रंगीत-विनोदी मनोरंजन करणारा, केदार शिंदे दिग्दर्शित, श्री विजयसाई प्रॉडक्शन निर्मित ‘रंगीला रायबा’ येत्या 10 नोव्हेंबरला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होतोय. अतुल कुलकर्णी नंतर सोलापूरच्या मातीतला ऍड. आल्हाद अंदोरे हा युवा अभिनेता रंगीला रायबा बनून मराठी चित्रपटसफष्टी गाजवायला सज्ज झालाय.