|Monday, June 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बिहारमध्ये 9 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये 9 जणांचा मृत्यू 

राज्यात दोन दुर्घटना : मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात गमाविला जीव

वृत्तसंस्था / पाटणा

बिहारमध्ये रविवारी दोन दुर्घटना घडल्या. वैशाली जिल्हय़ात गंगा नदीत स्नान करताना 6 जणांचा बुडून मृत्यू झाला. एका मुलाला बुडण्यापासून वाचविण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडली. दुसऱया घटनेत समस्तीपूरमध्ये एक नौका बुडाली. यात 3 जणांना जीव गमवावा लागला. नौकेतून 30 जण प्रवास करत होते. शनिवारीच बेगुसराय येथे एका मेळय़ात चेंगराचेंगरी होऊन 3 जणांचा मृत्यू झाला होता.

वैशाली येथील दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढू शकतो असे बोलले जाते. बुडणाऱया मुलाला वाचविण्यासाठी 6 पेक्षा अधिक जणांनी नदीत उडी घेतली होती. यातील 6 जणांचे मृतदेहच हाती लागले आहेत. उर्वरित लोकांचा शोध सुरू करण्यात आला आहे. दुर्घटना घडलेले ठिकाण मस्ताना घाटाला प्रशासनाने धोकादायक ठरविले होते. इशाऱयानंतर देखील लोक या घाटावर पोहोचले होते. मृतांच्या कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाने 4 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली.

समस्तीपूरमध्ये 3 बुडाले

दुसऱया घटनेत समस्तीपूरमध्ये 30 जणांना नेणारी नौका बागमती नदीत बुडाली. या दुर्घटनेत 3 महिलांना जीव गमवावा लागला. या घटनेत देखील मृतांचा आकडा वाढू शकतो. बचावपथक घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरू करण्यात आले. 30 जण गुरांसाठी चारा आणण्यासाठी नदीच्या दुसऱया तीरावर गेले होते. छोटय़ा आकाराच्या नौकेवर 30 जण तसेच चारा ठेवण्यात आला होता. पात्राच्या मध्ये पोहोचताच नौका बुडाली. यातील 8 जण पोहून तीरावर पोहोचले.