|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » लोकसभा, विधानसभेसाठी महिलांना 33 टक्के आरक्षण द्यावे

लोकसभा, विधानसभेसाठी महिलांना 33 टक्के आरक्षण द्यावे 

 

प्रतिनिधी/ मिरज

लोकसभा आणि विधानसभेसाठी महिलांना 33 टक्के आरक्षण द्यावे, यासाठी काँग्रेसच्या महिला आघाडीने राज्यभरात आवाज उठविला आहे. प्रत्येक जिह्यात जिल्हाधिकाऱयांना यासंदर्भात निवेदन देण्यात येत आहेत. सांगली जिह्यात महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी सदस्या सौ.प्रतिक्षाताई सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिलांनी एकत्रित येऊन जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांना याबाबतचे निवेदन दिले.

माजी पंतप्रधान स्व.इंदीरा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, खासदार सुष्मिता देव आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ऍड.चारुलता टोकस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व जिह्यात महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदने देण्यात येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाल्याने आज अनेक ठिकाणी महिला सक्षमपणे कारभार हाताळीत आहेत. या निर्णयामुळे असंख्य महिला राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. अशाच पध्दतीचे आरक्षण लोकसभा आणि विधानसभेसाठीही लागू करावे, अशी मागणी महिला काँग्रेसच्या वतीने केली जाऊ लागली आहे. यासाठी तीन लाख महिलांच्या सह्यांचे निवेदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देण्यात येणार आहे.

सांगली जिह्यात अशा पध्दतीचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले. यासाठी सौ. प्रतिक्षा सोनवणे यांच्यासह गौराबाई भोरे, हिना मुजावर, अर्चना शिर्के, रेखा यादव, रईसा मुजावर, शाहीन मुजावर या महिला उपस्थित होत्या. विधानसभेसाठी महिलांना 33 टक्के आरक्षण मंजूर झाल्यास राज्यात 97 महिला आमदार होतील. प्रत्येक जिह्यामधून किमान तीन महिलांना आमदारकीची संधी मिळणार आहे. तर लोकसभेसाठी 182 महिला खासदार होतील. या निर्णयाने महिलांना खऱया अर्थाने न्याय मिळणार आहे. त्यामुळे या मागणीचा गांभीर्याने विचार होऊन त्यास मान्यता द्यावी, अशी मागणी सौ. प्रतिक्षाताई सोनवणे यांनी या निवेदनात केली आहे.