|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘आनंदगंधर्वां’च्या गायनाची, ‘जितेंद्र, गिरिजा’च्या अभिनयाची पखरण

‘आनंदगंधर्वां’च्या गायनाची, ‘जितेंद्र, गिरिजा’च्या अभिनयाची पखरण 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांच्या ‘स्वर अमृताचे’ मैफलीत रसिक भारावून गेले. मैफलीच्या पूर्वार्धात पं. भीमसेन जोशी व उत्तरार्धात बालगन्धर्वांच्या गीतांची भाटे यांनी रसिकांना मोहिनी घातली. “पुलोत्सव”चा शुभारंभाचा दिवस भाटे यांच्या सुरांनी अविस्मरणीय झाला. तर दुस-या दिवशी ‘दोन स्पेशल’ नाटकात अभिनेता जितेंद्र जोशी आणि अभिनेत्री गिरिजा ओक यांच्या अभिनयाची जादू रसिकांवर पसरली.

मैफलीचा शुभारंभ भाटे यांनी राग पुरिया धनश्रीने केला, तर शेवट ‘अगा वैकुंठीच्या राया’ या भैरवीने केला. पं. भीमसेन जोशी यांच्या गायनाचा प्रवास मांडताना ‘मन राम रंगी रंगले, सखी मंद झाल्या तारका, रम्य ही स्वर्गाहून लंका’ या गीतांसह ‘पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, अणुरणिया थोकडा, माझे माहेर पंढरी, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ या अभंगांची सलग मेलडी गाऊन रसिकांवर सुरांची पखरण केली.

तर बालगंधर्वांच्या गायनाचा प्रवास मांडताना भाटे यांच्या ठायी जणू बालगन्धर्व अवतरल्याचा आभास होत होता. बालगन्धर्वांच्या सुरांची जणू बरसात आनंदगन्धर्व यांनी रसिकांवर “नयने लाजवित, सं. स्वयंवर नाटकातील नरवर कृष्णा समान, सं. मानापमान नाटकातील नाही मी बोलत नाथा, जोहार मायबाप जोहार’ या पदांद्वारे केली. तर ‘अगा वैकुंठीच्या राया’ या भैरवीने रसिकांना विठ्ठलमय केले. या मैफलीत संवादिनी साथ तन्मय देवचके, तबलासाथ प्रसाद जोशी, तालवाद्यसाथ संजू बर्वे यांनी केली. तर निवेदक राजेश दामले यांनी निवेदन केले. आर्ट सर्कलचे मनोज देसाई यांनी कलकारांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा पेठे यांनी केले.

मैफलीच्या मध्यंतरात ‘आविष्कार’ संस्थेला ‘पुलोत्सव सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ गायक आनंद भाटे, नगराध्यक्ष राहुल पंडित, सौ. सुचित्रा चित्राव यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक डॉ. शाश्वत शेरे, डॉ. मनिषा वंडकर यांना प्रदान करण्यात आला. मनोगतात डॉ. शेरे यांनी ‘आविष्कार’ शाळेच्या स्थापनेच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी व्यासपीठावर निवड समितीचे सुहास विद्वान्स, डॉ. प्रभुदेसाई उपस्थित होते. यावेळी दीप्ती कुवळेकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. माऊली प्रतिष्ठानतर्फेही संस्थेला 10 हजार रुपयांचा धनादेश, तसेच सौ. केतकर यांच्याकडून दर महिन्याच्या पेंशनमधील काही भाग देण्यात येतो, तोही प्रदान करण्यात आला.

तर ‘पुलोत्सव’च्या दुसऱया दिवशी अभिनेता जितेंद्र जोशी यांना ‘पुलोत्सव’ तरूणाई सन्मान रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी सुनीत तथा दादा वणजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यानंतर पत्रकारितेवर भाष्य करणारे ‘दोन स्पेशल’ हे नाटक अ†िभनेता जितेंद्र जोशी आणि अ†िभनेत्री गिरीजा ओक यांनी अक्षरशः जिवंत केले. वृत्तपत्र क्षेत्र, पत्रकार व पत्रकारिता यावर मार्मिक भाष्य करता करता दोन जीवांतील प्रेमाचा पदर या नाटकात जितेंद्र व गिरीजा यांनी उत्तमरित्या उलगडलाय. साहित्यिक ह.मो. मराठे यांच्या कथेला नाटय़लेखक क्षितीज पटवर्धन यांनी योग्य न्याय दिलाय.

‘पुलं’च्या नावाचे ‘मित्रपत्र’

पु.ल.देशपांडे हे नावाचा पुरस्कार हा माझ्यासाठी अतिव मोलाचा आहे. पुलंच्या नावाने चिटुरा, पुस्तक जरी मिळाले तरी माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. या पुरस्कारादरम्यान मला देण्यात आलेले सन्मानपत्र हे माझ्यासाठी ‘मित्रपत्र’ आहे. या घडीलाही माझ्या पिढीतले व पुढच्या पिढीतले श्रेष्ठ नट पहाता, मी अजूनही पूर्ण नट झाल्यासारखे मला वाटत नाही. आजच्या जगात वावरताना जाती-पातीचा वीट आलाय. यावर भाष्य करताना गौरी लंकेश, नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होते. कवितेवर माझे अधिक प्रेम आहे. आई इतकाच बापही मला महत्त्वपूर्ण वाटतो. त्या बापाच्या डोळ्यात मला कविता दिसते, असे भावोद्गार जितेंद्र जोशी याने काढले. नाटकाआधी जितेंद्रची मुलाखत सौ. सुचित्रा चित्राव यांनी घेत त्यांना बोलते केले.

 

Related posts: