|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कार-ट्रक्टर अपघातात कोपर्डे माजी सरपंचाचा मृत्यू

कार-ट्रक्टर अपघातात कोपर्डे माजी सरपंचाचा मृत्यू 

वार्ताहर/ पट्टणकुडी

 रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला भरधाव वेगात बोलेरो कारने मागून जोराची धडक दिल्याची घटना रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पट्टणकुडीनजीक घडली. या अपघातात एकजण जागीच ठार तर सहाजण जखमी झाले आहेत. सदर अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून यामध्ये कोपर्डेच्या माजी सरपंचाचा जागीच मृत्यू झाला. दादासो दत्तात्रय कदम (वय 65, रा. कोपर्डे ता. सातारा) असे त्यांचे नाव आहे.

 घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, नागरमुन्नोळी येथे अर्धांगवायू विकारावर संजय शिवाजी चव्हाण (वय 43) यांना औषध घेण्यासाठी कराडहून दादासो दत्तात्रय कदम, शुभम मानसिंग सूर्यवंशी (वय 22), मनिषा संजय चव्हाण (वय 40), अशोक शंकर चव्हाण (वय 40), उद्धव शिवाजी चव्हाण (वय 37 सर्व रा. नडशी कोपर्डे ता. कराड) व अजय विनायक सूर्यवंशी हे बोलेरोने (एमएच 12 एचएफ 9585) आले होते. सदर प्रवासी शनिवारी रात्री नागरमुन्नोळी येथे उपचारासाठी थांबले.

 पहाटेच्या सुमारास उपचारानंतर ते निपाणीहून कराडच्या दिशेने निघाले होते. त्यादरम्यान हालसिद्धनाथ साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणारा ट्रक्टर (केए 48 टीए 0820) हा पंक्चर झाल्याने पट्टणकुडीनजीकच्या जुन्या सिमेंट कारखान्याजवळ उभा होता. बोलेरोचालक शुभम सूर्यवंशी याला थांबलेल्या ट्रक्टर व ट्रॉलीचा अंदाज न आल्याने कारची ट्रॉलीला मागून जोराची धडक बसली. त्यात चालकाच्या बाजूला बसलेले दादासो कदम यांच्या डोक्याला जबर मार बसला त्यामुळे ते जागीच ठार झाले. तर चालकासह कारमधील अन्य प्रवासी जखमी झाले.

 सदर धडकेचा आवाज मोठा झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ 108 रुग्णवाहिकेतून निपाणी गांधी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती समजताच खडकलाट पोलीस स्थानकाचे आय. जे. वाळके, हवालदार डी. बी. कोतवाल, आय. एम. कडलस्कर, विनोद कंग्राळकर यांनी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद खडकलाट पोलीस स्थानकात झाली आहे. तर परस्पर फिर्यादीही दाखल करण्यात आल्या आहेत. जखमींवर गांधी हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले.

अरुंद रस्त्यामुळे अपघाताच्या वाढत्या घटना

 निपाणी-मुधोळ राज्यमार्गाचे काम पूर्णत्त्वास आले आहे. रस्त्याचे काम चांगले झाल्याने वाहनधारक सुसाट वेगाने वाहने चालवत आहेत. रस्त्याची उंची 5 ते 10 फुटांनी वाढली आहे. पावसाळय़ात काही ठिकाणी कच्च्या मार्गावर खड्डे पडले आहेत. त्यातूनच वाहनधारक गतीने वाहने घेऊन जाताना दिसतात. त्यामुळेच या मार्गावर अधिक अपघात होत आहेत. या मार्गावर कोठेही गतिरोधक नसल्याने वाहनधारक सुसाट वेगाने मार्गक्रमण करताना दिसतात. सदर अपघातस्थळी या मार्गावर गतिरोधक बसविण्यात यावेत. तसेच अरुंद मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी चर्चा सुरू आहे.

वाहनांना रिफ्लेक्टरची गरज

 सध्या परिसरातील कारखान्यांची ऊस वाहतूक सुरू आहे. अधिकतर ट्रक्टर, ट्रक यातून ऊस वाहतूक केली जात आहे. पण त्यांना रिफ्लेक्टर बसविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सदर अपघात हा थांबलेल्या ट्रक्टरला रिफ्लेक्टर नसल्याने झाला असावा असा कयास बांधण्यात येत होता. पुढील अपघात व धोके टाळण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱया वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्याची गरज व्यक्त होत आहे.