|Thursday, October 18, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बोलले महाजन!

बोलले महाजन! 

महाराष्ट्राचे जलसंपदा तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री गिरीश महाजन हे जरासे उत्साही आणि उत्सवी प्रवृत्तीचे मंत्री आहेत. जीन पॅन्टच्या खिशात रिव्हॉल्वरचे प्रदर्शन, प्रोटोकॉल विसरून बुलेटवरून राउंड असे अनेक ‘जिंदा दिल’ प्रयोग ते करतात. मंत्री म्हणून ते यासाठीच प्रसिद्ध झाले आहेत. आता महाजनांनी मद्य विक्रीत वाढ करण्यासाठी साखर कारखान्याला अस्सल देशी सल्ला दिला आहे. महाजन आणि भाजप हे नाव घेतले की लोकांना आठवण येते ती दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची आणि त्यांच्या वाणीवरील प्रभुत्वाची. ते महाजन आता भाजपा संस्कृतीतून विस्मृतीत गेले आहेत. आता नव्या महाजनांचे राज्य आहे. तर नवे महाजन खानदेशातील सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप हंगाम कार्यक्रमात आपले स्वदेशी मार्केटिंगचे ज्ञान पाजळताना भलताच सल्ला देऊन बसले. मद्य उत्पादनाच्या विक्री वाढीसाठी त्या उत्पादनांना महिलांचे नाव दिल्यास ती हमखास खपतील. सातपुडा कारखान्याच्या महाराजा मद्याचे नाव बदलून महाराणी मद्य करा असे त्यांनी सांगितले. पण, हा महाजनांचा हा बुस्टर डोस समाजाला काही पचण्यासारखा नाही. त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविकच होते. सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी महाजनांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली तर राष्ट्रवादी काँग्रेसने मद्य उत्पादनांना देवेंद्र, नरेंद्र, गिरीश अशी नावे देण्याचा सल्ला दिला. एकूणच हे मद्य खप वाढविण्याचे प्रकरण महाजनांवर चांगलेच उलटले आहे. महिलांची नावे एखाद्या उत्पादनाला किंवा ब्रँडला दिली तर त्याचा खप वाढतो असा जर महाजनांचा होरा असेल तर ते ज्या मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत त्या मंत्रिमंडळाला हा नियम लागू होईल का? मंत्रिमंडळाचा पुरूषी ब्रँड बदलून तो पंकजा किंवा अन्य कोणी महिला करता येईल का? आणि त्यामुळे राज्य सरकारच्या उर्वरित कार्यकालात सरकारची लोकप्रियता वाढेल का? अच्छे दिनप्रमाणे या सरकारची जनतेला नशा चढेल का? ते पुन्हा हा कडवट घोट घेतील का याचा खुलासा महाजनांनी केलेला बरा. वैद्यकीय शिक्षण विभाग आणि जलसंपदा विभागाचे मंत्री मार्केटिंगचे किती अगाध ज्ञान बाळगून आहेत हे महाराष्ट्राने या निमित्ताने पाहिले हे बरेच झाले. कारण, त्यानिमित्ताने मंत्रिपदावर बसणारा भाजपाचा विशेषतः सांस्कृतिकतेचा टेंभा आजपर्यंत मिरवत आलेल्या राजकीय पक्षाच्या युवा चेहऱयाची विचाराची झेप किती उंच आहे ते समजले. प्रसंग पडला तर ती वैचारिकता किती भराऱया घेऊ शकते आणि महाराष्ट्राला किती हेलकावे त्यातून खाता येतील याची यानिमित्ताने रंगीत संगीत तालीम झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमधील एका मंत्री महोदयांची जीभ अशीच एकदा सैल झाली आणि  कासाराला रोजच वेगवेगळय़ा महिलांचे हात हातात घेता येतात त्यामुळे त्याच्या इतका नशीबवान तोच असे वक्तव्य त्या मंत्र्यांनी केले होते. ज्याच्यावर भाजपने किती टीका केली होती, ते महाराष्ट्र अजून विसरलेला नाही. त्याहीपूर्वी त्याच मंत्र्यांच्या बंधुंनी एका हवाई सुंदरीशी केलेले गैरवर्तन हा तर थोरल्या महाजनांच्या भाषणातील कळीचा मुद्दा असायचा. अर्थात तो भाजपा आता राहिलेला नाही हे नक्कीच आहे. त्या सरळ, साध्या वैचारिकतेची नशा कदाचित उतरली असावी. आता युवा बाटलीत नवा दव असा प्रकार आहे. पक्षात जो येईल त्याच्यावर कसलेतरी मंतरलेले जल मारून शुद्ध करून घेणारा आजचा भाजपा गिरीश महाजनांचे हे वक्तव्य गमतीने घेईल. पण, महाराष्ट्राने ते गमतीने घ्यावे का? स्त्री ही उपभोगाची वस्तु आहे, ती दासी आहे, तिला माणूस म्हणून दुय्यम स्थान आहे या जुन्या पुराण्या मानसिकतेशी मिळते जुळते वक्तव्य सहज आणि चेष्टा म्हणून जेव्हा मंत्रीपदावर विराजमान असलेल्या व्यक्तीच्या तोंडून येते तेव्हा आधुनिक काळातील 50 टक्के शक्ती असलेली स्त्री आणि एकूणच समाजाने हे सहजपणे घ्यावे का, याचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी महाजनांना यावर खुलासा करायला लावले पाहिजे. नागपुरात धनगर आरक्षण मेळाव्यात आपल्याच माणसांनी तोंडघशी पाडल्यानंतर मैदान मारण्यासाठी येळकोट करत मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली. त्यामागे त्यांचे गणित काय असायचे ते असो, पण, रस्ते, घाट, धर्मशाळा, बारवा बांधून काश्मिर ते कन्याकुमारी, अरूणाचल ते गुजरात असा देश जोडणाऱया अहिल्यादेवींचा गौरव सरकारने केला आहे.  त्याच दिवशी त्यांच्या एका मंत्र्याने स्त्रियांची अवहेलना केली.  अहिल्याबाईंच्या सारखी स्त्री केवळ धार्मिक नव्हे तर राजकीय मुत्सद्दी आणि क्षात्रवृत्तीची म्हणून प्रसिद्ध आहे, जिला पेशवे मातोश्री म्हणत, जिने जगातले महिलांचे पहिले सैन्यदल उभे केले, ज्या सैन्याला घाबरून राघोबा आक्रमण विसरून पेशवाईत परतला, जिने महादजी शिंदेंना आर्थिक स्थैर्य दिले आणि प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांचे मनसुबे ओळखून पेशवा माधवरावाला इंग्रज म्हणजे अस्वल आहे, ज्याला मस्तकात गोळी घालूनच मारले पाहिजे असा सल्ला दिला. यवनी राज्यात अयोध्या, सोमनाथ, काशीविश्वेश्वर, श्रीरंगपट्टनमच्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला, टिपुच्या राज्याला रेशमी वस्त्राचे कारागिर दिले, भारतभरातील शासकांच्या दरबारात आपले वकील नेमून नैतिक धाक ठेवला त्या मध्ययुगीन भारतातील स्त्रीचा गौरव झाला आहे. त्याचवेळी आणि त्याच दिवशी आधुनिक स्त्रीवर मंत्री महाराज बोलतात आणि त्यांच्या समोर बसलेले आनंदाने डोलतात हे लांच्छनास्पद आहे. एक वक्तव्य अजित पवारांच्या सत्तेचे धरण फोडून  गेले हे त्यांच्या खात्याचे उत्तराधिकारी महाजन यांनी लक्षात ठेवावे. असा कोणता ब्रँड आहे जो मंत्र्यांना इतका झिंगवून सोडत आहे? हे एकदा मुख्यमंत्र्यांनी तपासून पाहिलेले बरे. या वक्तव्याला ‘एकच प्याला’ समजून डोळेझाक केली तर राम ते तळीराम अशा प्रवासाचा अनुभव महाराष्ट्राच्या जनतेला तरी पचणारा नाही, हे समजून घ्यावे.

Related posts: