|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » 440 एकरावर उभारणार अलकूड एमआयडीसी

440 एकरावर उभारणार अलकूड एमआयडीसी 

कवलापूरचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत : मणेराजुरी, योगेवाडीची 186 एकर जागा संपादित करणार

कुपवाड / वार्ताहर

जिह्याचा औद्योगिक विकास वाढीच्यादृष्टीने जिह्यात नव्या औद्योगिक वसाहती निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. याचा औद्योगिक विकास महामंडळाने  गांभिर्याने विचार केला आहे. मिरज-पंढरपूर राज्य महामार्गालगत कवठेमहांकाळ तालुक्यात अलकूड, मणेराजुरी व योगेवाडी या तीन गावांचा समावेश असणाऱया परिसरात 440 एकर जागेवर नव्याने ‘अलकूड औद्योगिक वसाहत’ स्थापन करण्याचे पाऊल औद्योगिक महामंडळाने उचलले आहे. यासाठी मणेराजुरी व योगेवाडी या दोन गावच्या शेतकऱयांची 186 एकर शेतजमीन संपादित करण्यात येणार आहे, अशी माहिती सांगली औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली.

यासंदर्भात जमीन संपादन व दराबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी औद्योगिक महामंडळातर्फे येत्या शुक्रवारी 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता योगेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील मारुती मंदिरात मणेराजुरी, योगेवाडी या दोन गावातील शेतकऱयांची औद्योगिक अधिकाऱयांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत संबंधीत शेतकरी व गावातील सरपंच, उपसरंपच यासह विविध पदाधिकारी यांच्याशी थेट चर्चा होणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

देशमुख म्हणाले, जिह्याचा औद्योगिक विकास खुंटल्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. औद्योगिक विकास वाढीसाठी जिह्याचे औद्योगिक क्षेत्र पडू लागल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. जागेअभावी जिह्यात मोठे व नवीन उद्योगांची उभारणी होऊ शकली नाही. त्यामुळे सांगली, मिरज व कुपवाड एमआयडीसी लगत नवी औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी औद्योगिक प्रशासन प्रयत्नशील आहे. नव्याने अस्तित्वात येणाऱया 166 एकरातील कवलापूर औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱयांकडे मंजुरीसाठी पाठवला असुन त्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल. तर अलकूड एमआयडीसी स्थापन करण्यासाठी याठिकाणची शासनाकडून मिळालेली 253 एकर जागा सध्या औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात आहे. परंतु, औद्योगिक क्षेत्र वाढीच्या दृष्टीने जागा कमी पडू लागल्याने अलकुड लगतच्या मणेराजुरी व योगेवाडी या दोन गावांचा समावेश असणाऱया ठिकाणची आणखी 186 एकर शेतजमिनीची जागा ताब्यात घेण्याची आवश्यकता आहे. त्य़ामुळे ही जागा औद्योगिक महामंडळाकडे भुसंपादन करण्यासाठी शेतकऱयांकडे मागणी केली आहे. ही वाढीव 186 एकर जागा भुसंपादीत झाल्यास ताब्यातील 253 व शेतकऱयांची 186 एकर मिळुन एकूण 440 एकर जागेवर नव्याने मोठी व स्वतंत्र अलकुड औद्योगिक वसाहत स्थापन होईल. त्यामुळे परिसरांतील नवउद्योजकांना नवीन उद्योग उभारण्याची संधी मिळेल आणि बेरोजगारीही काही प्रमाणात संपुष्टात येईल, अशी आशा आहे. दरम्यान, शुक्रवारी योगेवाडी येथे होणाऱया बैठकीसाठी योगेवाडी व मणेराजुरीचे शेतकरी व पदाधिकाऱयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.