|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » तमाशावरुन कुंभारगाव-चाळकेवाडीत धुमश्चक्री

तमाशावरुन कुंभारगाव-चाळकेवाडीत धुमश्चक्री 

तुफान दगडफेकीत तीन पोलिसांसह सुमारे 20 जण जखमी, 35 जणांवर गुन्हा

प्रतिनिधी/ ढेबेवाडी

पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील लक्ष्मीदेवीच्या यात्रेदरम्यान कुंभारगाव आणि चाळकेवाडी या दोन गावाचे युवक, ग्रामस्थांमध्ये तमाशावरुन जोरदार राडा झाला. या तुंबळ मारामारी व दगडफेकीत तीन पोलिसांसह सुमारे वीस जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी घरात घुसून महिलांसह पै पाहुण्यांनाही मारहाण करण्यात आली. ढेबेवाडी पोलिसांनी दोन्ही गटातील 35 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने पुंभारगावात तणावपूर्ण वातावरण असून गावात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

घटनास्थळावरुन व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभारगावसह चाळकेवाडी व इतर वाडय़ावस्त्यांचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीची यात्रा शनिवार 4 रोजी सुरु झाली. रविवारी 5 रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास गावात तमाशाचे आयोजन केले होते. रात्री काही तरूणांनी नृत्यांगणांना खडे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणांच्या दोन गटात किरकोळ कारणावरुन बाचाबाच झाली. यात्रेचा मुख्य दिवस रविवारी होता. दिवसभर यात्रा सुरळीत पार पडली मात्र सायंकाळी पुंभारगाव आणि चाळकेवाडीच्या तरूणांमध्ये पुन्हा बाचाबाच व हमरीतुमरी झाली होती. त्याबाबत यावेळी ग्रामस्थांनी मध्यस्थी करत वादावर तात्पुरता पडता टाकला. याबाबत पोलिसांत एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, सोमवारी 6 रोजी सकाळी 10.30 वाजता कुंभारगाव येथील आयडीबीआय बँकेच्या समोर दोन्ही गावातील गट एकमेकांच्या समोर आले. एकमेकांकडे बघण्यावरून त्यांच्यात मारामारी व वादाला सुरुवात झाली. ते पाहून दोन्ही गावातील जमाव घटनास्थळी आला. त्यानंतर तुफान धुमश्चक्री होऊन मारामारी, दगडफेक, साहित्याची नासधूस करण्यात आली. काही घरात घुसून महिला, पै पाहुण्यांना मारहाण करण्यात आली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन जमाव पांगवला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तरीही टवाळखोर युवकांनी एकमेकांच्या दिशेने दगडफेक सुरू होती. त्यात पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील, उपनिरीक्षक राजेंद्र अंकुशी, हवालदार एस. एस. नाफड हे दगड लागून जखमी झाले. काही युवक व ग्रामस्थही जखमी झाले. 

घटनेमुळे दोन्ही गावांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक नीता पाडवी यांनीही घटनास्थळी भेट दिली. पोलीस मुख्यालयातील पोलीस पथकासह ढेबेवाडीच्या पोलिसांचा बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून सरकारी नोकरावर हल्ला, शासकीय कामात अडथळा, गर्दी मारामारीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.