|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अशोक मोनेंसह 10 नगरसेवकांविरूद्ध न्यायालयात केस दाखल

अशोक मोनेंसह 10 नगरसेवकांविरूद्ध न्यायालयात केस दाखल 

राष्ट्रगीताचा अवमानप्रकरणी वसंत लेवे यांची कोर्टात धाव, सीडी पाहिल्यानंतरच केली केस दाखल

प्रतिनिधी/ सातारा

नगरपालिकेत सभेवेळी राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी नगरसेवक अशोक मोनेंसह 10 नगरसेवकांविरूद्ध नगरसेवक वसंत लेवे यांनी थेट न्यायालयात पेस दाखल केली आहे. न्यायालयाने त्या घटनेची सीडी पाहिल्यानंतर ही केस दाखल करून घेतली. यापुर्वी अशोक मोने यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी लेवे यांनी राष्ट्रगीताचा अवमान केला अशी तक्रार दाखल केली आहे.

  सातारा नगरपालिकेच्या श्री. छ. शिवाजी सभागृहात दि. 2 नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत सातारा विकास आघाडीने दडपशाही करीत सभा गुंडाळली होती. त्यामुळे नगरविकास आघाडीचे विरोधीपक्ष नेते अशोक मोने व भाजपच्या नगरसेवकांनी या घटनेचा तीव्र शब्दांत सभागृहात निषेध केला. यावेळी लेवे-मोने यांच्यात शाब्दिक चकमक उडून लेवेंनी मोनेंना गळा पकडून धक्का देवून खाली पाडले हेते.

  दरम्यान, साविआने राष्ट्रगीत लावले व राष्ट्रगीत सुरू असतानाच नगरपालिकेत वादविवाद सुरू होता. त्यामुळे दुसऱया दिवशी अशोक मोने यांनी लेवे व अन्य नगरसेवकांविरूद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे आरोग्य सभापती वसंत लेवे यांनी सोमवारी सर्व पुराव्यानिशी सातारा न्यायालयात नगरसेवक अशोक मोने, अण्णासो राजाराम मोरे, शकिल गुलाब बागवान, मनिषा विजय काळोखे, दिपलक्ष्मी प्रकाश नाईक, संगिता दत्तु धबधबे, लीना सुर्यकांत गोरे, सोनाली शांताराम नलवडे, सिद्धी रविंद्र पवार, प्राची प्रवीण शहाणे या दहा नगरसेवकांविरूद्ध राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी खटला दाखल केला. हा खटला दाखल करून घेण्यापुर्वी न्यायालयाने सर्व पुरावे तपासले. यामध्ये लेवे यांनी या प्रकरणाची सीडी दाखल केली ही सीडी न्यायालयाने पाहिल्यावर खटला दाखल करण्यात आला.

 या केसमधील अन्य पुरावे व वकिलांचा युक्तीवाद पुढच्या तारखेला ऐकल्यानंतर न्यायालयाला पुर्ण खात्री वाटल्यानंतर न्यायालय पोलिसांना या 10 नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देईल. त्यामुळे येत्या सहा महिन्यात राष्ट्रगीत अवमान प्रकरण हा विषय साताऱयात गाजणार एवढे निश्चित.