|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उद्धव ठाकरेंची 26 रोजी कराडात जाहीर सभा

उद्धव ठाकरेंची 26 रोजी कराडात जाहीर सभा 

प्रतिनिधी / कराड

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच दक्षिण महाराष्ट्राच्या दौऱयावर येत आहेत. या दौऱयात 26 नोव्हेंबरला ठाकरे यांची जिल्हय़ातील एकमेव जाहीर सभा कराडमध्ये घेण्याचे निश्चित झाले असल्याची माहिती सेनेच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली. या सभेच्या तयारीसाठी सेनेचे स्थानिक पदाधिकारी कामाला लागले आहेत.

शिवसेनेच्या शेतकरी संवाद अभियानांतर्गत उद्धव ठाकरे यांचा दौरा विदर्भात व मराठवाडय़ात झाला आहे. आता श्री. ठाकरे या महिन्यात दक्षिण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. राज्य सरकारच्या कर्जमाफीला शिवसेनेने विरोध केला असून राज्यात सत्तेत असूनही शिवसेने सत्ताधारी भाजपाशी संघर्ष करत आहे. दक्षिण महाराष्ट्रातही शेतकरी संवाद अभियानांतर्गत ते शेतकरी व सेना पदाधिकाऱयांशी संवाद साधणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार 24 नोव्हेंबरला कोल्हापूर, 25 नोव्हेंबरला सांगली व 26 नोव्हेंबरला कराड येथे ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या दौऱयावर शिक्कामोर्तब झाले असून कराडमध्ये सभेच्या ठिकाणाचा शोध सेना पदाधिकाऱयांकडून सुरू झाला आहे. ठाकरे यांच्या दौरा निश्चितीने शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.