|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » हुतात्मा सुभाष कराडे यांना अखेरची मानवंदना

हुतात्मा सुभाष कराडे यांना अखेरची मानवंदना 

वार्ताहर/ लोणंद

“अमर रहे अमर रहे सुभाष कराडे अमर रहे’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जब तक सूरज चाँद रहेगा, सुभाष तेरा नाम रहेगा’ अशा गगनभेदी घोषणांच्या आवेशात, जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या फैरींची मानवंदना दिल्यानंतर हुतात्मा सुभाष कराडे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. विराट जनसागराच्या साक्षीने खंडाळा तालुक्यातील सुभाष कराडे अनंतात विलीन झाला. सव्वा अकराच्या सुमारास भाऊ संजय, मुलगा सनी याने अग्नग्नी दिल्यानंतर गलबलून गेलेला अवघा परिसरही अश्रूंनी चिंब झाला. कराडवाडीच्या सांजेच्या माळावर हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

  हुतात्मा जवान सुभाष कराडे हे अरूणाचल प्रदेश येथील टेंगा भागात भारतीय सैन्यदलातील 120 इंजिनिअरींग रेजीमेंटमध्ये हवालदार पदावर देशाची सेवा करीत असताना अरुणाचल प्रदेश येथील दुर्गम भागात लढाईच्या सरावासाठी सात हजार फूट उंचीवर गेले असताना शुक्रवारी रात्री केरोसिनच्या बुखारीचा स्फोट होऊन त्यामध्ये सुभाष कराडे हे आगीत भाजुन त्यांचा मृत्यु झाला होता. त्यांच्या वीर मरणाचे वृत्त तालुक्यात धडकल्यानंतर कराडवाडीसह अवघा खंडाळा तालुका शोकसागरात बुडाला होता. त्यांचे वीरमरण काळजाला चटका लावणारे होते.

 सुभाष कराडे यांच्या कर्तृत्वाला गावागावात उजाळा दिला जात होता. कराडवाडीकर तर पुरते हडबडून गेले होते. हुतात्मा सुभाष यांच्या पार्थिवाची साऱयांनाच प्रतिक्षा लागून राहिली होती. सोमवारी सकाळपासून तर कराडवाडीमध्ये मान्यवरांची रिघ लागली होती. अवघा परिसर हुतात्मा सुभाष कराडे यांच्या आठवणींनी गलबलून गेला होता. 

   रविवारी रात्री 8 वाजता त्यांचे पार्थिव पुणे येथे आणण्यात आले होते तेथून  सोमवारी सकाळी 9 वाजता पार्थिव कराडवाडीत आणण्यात आले. यावेळी तालुक्यासह जिल्हाभरातून विराट जनसागर लोटला होता. यावेळी हुतात्मा सुभाष यांच्या कुटुंबियांसह उपस्थितांच्याही अश्रूंचा बांध फुटला. हुतात्मा सुभाष यांचे वडील लालासो, वीरमाता छबाबाई, वीरपत्नी मनिषा, मुलगा सनी, मुलगी सुप्रिया,  भाऊ संजय व कुटुंबियांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

गगनभेदी घोषणा अन् नातेवाईकांचा आक्रोश  

हुतात्मा सुभाष यांचे त्यांच्या घरासमोर अंगणात पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांसह तालुक्यातील लोकांनी अंत्यदर्शन घेतले. त्यावेळी अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करत आक्रोश केला. यानंतर लष्कराच्या ट्रकला फुलांनी सजवण्यात आले होते. यातुन हुतात्मा सुभाष यांचा अखेरचा प्रवास सुरू झाला. गावातून अंत्ययात्रेदरम्यान उपस्थितांनी ‘अमर अमर रहे अमर रहे सुभाष कराडे अमर रहे’,‘जब तक सूरज चांद रहेगा सुभाष तेरा नाम रहेगा’,‘भारत माता की जय’, वंदे मातरम’ अशा गगनभेदी घोषणा दिल्या.

 पार्थिव अंत्यविधीसाठी कराडवाडी येथील सांज्याच्या माळावर आणण्यात आले यावेळी प्रशासनाच्यावतीने सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, आ. मकरंद पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, पोलीस उपअधीक्षक रमेश चोपडे, बकाजीराव पाटील, नितीन भरगुडे- पाटील, आनंदराव शेळके, दत्तानाना ढमाळ, हणमंतराव साळुखे, मनोज पवार, दिपाली साळुंखे, उदय कबुले, तहसिलदार विवेक जाधव, सभापती मकरंद मोटे, सदस्य राजेंद्र तांबे, शोभा जाधव, अनिरुध्द गाढवे, माजी रमेश धायगुडे, गटविकास अधिकारी दीपा बापट, सपोनि सोमनाथ लांडे, नगराध्यक्ष स्नेहलता शेळके, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके, प्रकाश देशमुख, अजित यादव, रामदास शिंदे, राजेंद्र नेवसे, नगरसेवक किरण पवार, बाळासाहेब शेळके, अशोकराव धायगुडे, सरपंच कुंडलिक ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

 यावेळे पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले पार्थिव अंत्यविधीसाठी तयार केलेल्या चबुतऱयावर ठेवल्यानंतर तर अवघा परिसर हेलावून गेला. यावेळी कोल्हापूरचे चीफ वाय राणा, जिल्हा सैनिक बोर्डाचे कर्नल आर. आर. जाधव, सुभेदार चंद्रकांत पवार व यांच्या जवानांनी हवेत तीन फायर करून अखेरची मानवंदना दिली. त्यानंतर सव्वा अकराच्या सुमारास मुलगा सनी, भाऊ संजय यांनी अग्नग्नि दिला.