|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गणपतीपुळेत हजारो भाविकांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन!

गणपतीपुळेत हजारो भाविकांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन! 

अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांची गर्दी

यात्रोत्सवात भाविकांनी लुटला खरेदीचा आनंद

वार्ताहर / गणपतीपुळे

प्रसिध्द तिर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे मंगळवारी अंगारकी चतुर्थीनिमित्ताने घाटमाथ्यावरुन आलेल्या हजारो भाविकांनी स्वयंभू ‘श्रीं’चे गणेश मंदिरात जाऊन मनोभावे व श्रध्दापूर्वक दर्शन घेतले. त्यानंतर या अंगारकीनिमित्ताने पार पाडलेल्या यात्रोत्सवात विविध वस्तूंच्या खरेदीचा मनमुराद आनंद लुटून भाविकांनी आपआपल्या ठिकाणी मार्गक्रमण केले.

या अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे देवस्थान समितीतर्फे स्वयंभू गणेश मंदिर पहाटे 3.30 वाजता दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यानंतर रात्री 10.30 वाजेपर्यंत भाविकांनी दर्शनाची संधी देउढन मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले. या दिवशी पहाटे 3.30 वाजता स्थानिक पूजाऱयांच्या हस्ते ‘श्रीं’ची पारंपरिक पध्दतीने पूजाअर्चा करण्यात येउढन भाविकांना दर्शनरांगांमधून मंदिरात सोडण्यात आले. यासाठी संस्थांन श्री देव गणपतीपुळे पंचकमिटीमार्फत भाविकांच्या सोयीसाठी सुसज्ज अशा मंडपासहित दर्शनरांगांची व्यवस्था करण्यात आली.

गर्दीवरील नियंत्रणासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त

तसेच दर्शनरांगांवर भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. सेवेसाठी व भाविकांना सुरळीत दर्शनाची संधी मिळावी, म्हणून रत्नागिरी येथील अनिरुध्द बापू ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी विशेष कामगिरी बजावली. त्यांच्यासमवेत देवस्थानचे सुरक्षारक्षक व पोलीस कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. त्याशिवाय विशेषतः समुद्रचौपाटीवर कोणताही अनुचित प्रकार वा दुर्घटना घडू नये, यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, देवस्थानचे सुरक्षारक्षक, स्थानिक व्यावसायिक व पोलीस कर्मचारी आदींनी संपूर्ण समुद्रचौपाटीवर लक्ष ठेवून भाविकांना समुद्र अपघाताविषयी सूचना देण्याचे मोलाचे काम केले. त्यानंतर भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वच ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच वाहनांची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचारी व गणपतीपुळे ग्रा. पं. च्या कर्मचाऱयांनी चोख काम बजावले. यानिमित्ताने झालेल्या यात्रोत्सवात घाटमाथ्यावरील विविध ठिकाणच्या दुकानदारांबरोबरच स्थानिक ठिकाणच्या दुकानदारांनी आपली निरनिराळ्या वस्तूंची दुकाने थाटल्याने सर्वच लहान-मोठय़ा वस्तूंच्या खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.

एसटीतर्फे जादा गाडय़ांची सोय

या अंगारकीनिमित्ताने दूरवरुन आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी एस.टी. प्रशासनाकडून जादा गाडय़ांची सोय करण्यात आली होती. तसेच घाटमाथ्यावरुन आलेल्या विविध ठिकाणच्या गणेश मंडळांनी भाविकांचा उपवासाचा दिवस असल्याने दिवसभरात खिचडी प्रसादाचे वाटप केले. तसेच रात्री उपवासानंतर विविध मंडळांनी महाप्रसादाचा उपक्रम राबवला.

सायंकाळी वाजत-गाजत पालखी मिरवणूक

दरम्यान, या अंगारकी चतुर्थीनिमित्त घाटमाथ्यावरील कोल्हापूर, सांगली, मिरज, कराड, इस्लामपूर, सातारा, इचलकरंजी, कवठे महाकाळ आदी ठिकाणाहून भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे येणाऱया भाविकांना पालखी मिरवणुकीत सहभागी होता यावे, यासाठी गणपतीपुळे देवस्थान समितीतर्फे सायंकाळी 4 वाजता स्वयंभू ‘श्रीं’ची वाजत-गाजत व फटाक्यांच्या आतषबाजीत ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष करीत प्रदक्षिणामार्गे भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत देवस्थानचे सर्व प्रमुख पंच, कर्मचारी, सुरक्षारक्षक, पोलीस, स्थानिक ग्रामस्थ व विविध ठिकाणचे भाविक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. हा अंगारकी चतुर्थी उत्सव उत्साहात व सुरळीत पार पाडण्यासाठी गणपतीपुळे देवस्थान समिती, गणपतीपुळे ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन आदींनी विशेष मेहनत घेतली.

Related posts: