|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वाई नगरपरिषद अतिक्रमण हटाव मोहीम तीव्रतेने राबवणार

वाई नगरपरिषद अतिक्रमण हटाव मोहीम तीव्रतेने राबवणार 

प्रतिनिधी/ वाई

वाई नगरपरिषदेच्यावतीने नगरपालिका हद्दीतील विविध रस्त्यावर व्यवसायधारकांनी आणि नागरिकांनी तसेच बांधकाम व्यावसायिकांनी आणि घरमालकांनी केलेली अतिक्रमणे हटविली जाणार असून ही मोहीम 14 नोव्हेंबर पासून राबविली जातणार असल्याची माहिती वाई नगरपालिकेने मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, पोलीस निरिक्षक विनायक वेताळ, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनील सावंत, गटनेते भारत खामकर, आरोग्य सभापती चरण गायकवाड यासह अन्य नगरसेवकांची उपस्थिती होती.

मुख्याधिकारी पुढे म्हणाले, सुंदर वाई स्वच्छ वाई असावी ही सर्वांचीच अपेक्षा आहे. पण अतिक्रमणामुळे तिला शिस्तबद्ध स्वरुप राहत नाही. अतिक्रमणे काढल्याशिवाय वाहतूक व्यवस्थाही सुधारणा नाही. याकरिता अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांनी तसेच नागरिकांनी बांधकाम व्यावसायिकांनी, घरमालकांनी, झोपडपट्टीवासियांनी आपली अतिक्रमण ज्यांत बोर्ड, जाळ्या, पत्र्याची शेड, हातगाडय़ा, खोकी, रस्त्यावर टाकलेले बांधकाम साहित्य, बंद वाहने, झोपडय़ा व अन्य स्वरुपाची अतिक्रमणे यांचा समावेश आहे. ती काढून घ्यावीत. अन्यथा ती नगरपालिका मोहिमेंतर्गत काढली जाणार आहेत.

अतिक्रमण हटाव मोहिमेची सुरुवात गणपती आळी भागांतील मंडई परिसर, कोर्ट, स्टॅण्ड, परिसरांतील खोकी, शेड, पायऱया, ओटे, बोर्ड, सिद्धनाथ एस.टी. स्टॅण्ड ते सार्वजनिक बांधकाम कार्यालय रस्त्यावरील खोकी व इतर अतिक्रमणे, सिद्धनाथवाडी बसस्टॉप ते शेखमिरा क्लब, सोनगीर वाडी पोस्ट ऑफिस ते साईट नं 62 येथील हातगाडय़ा खोकी झोपडय़ा अशी होणार असून रोज ही मोहीम शहरातील अन्य सर्व रस्त्यावरही राबविली जाणार आहे.

यावेळी बोलताना उपविभागीय पोली अधिकारी अजित टिके म्हणाले, ही मोहीम तीव्र स्वरुपात राबविली जाणार असून कोणत्याही लोकप्रतिनिधीचा हस्तक्षेप किंवा दूरध्वनी घेतला जाणार नाही. अतिक्रमण काढताना जे अडथळा निर्माण करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. याकरिता पोलीस प्रशासनाकडून सर्व प्रकारचा बंदोबस्त पुरविला जाणार आहे.

वाई शहरांत विविध रस्त्यांवर अनेक वर्षापासून बंद पडलेली वाहने, अनधिकृत फ्लेक्स हटवून ते जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे. अन्यथा ज्यांची वाहने आहेत त्यांनी 14 पूर्वी त्यांची विल्हेवाट लावावी. याबाबत जागृती व्हावी याकरिता रिक्षावरुन जाहिरात केली जाणार असून अतिक्रमण काढतावेळीच व्हिडीओ चित्रिकरणही केले जाणार आहे.

शहरात सीसीटीव्ही पॅमेरे त्वरित बसवावेत आणि नगरपालिकेने वाहतूक शिस्तीकरिता गणवेशधारी ट्रफिक वॉर्डन पुरवावेत तसेच पोलीस प्रशासनाला 10 जामर पुरवावेत अशी मागणी पोलीस निरिक्षक विनायक वेताळ यांनी केली. वाहतूक आराखडय़ाची अंमलबजावणीही लवकरच सुरु केली जाणार असून जड वाहनांना वेळ ठरवून दिली जाईल आणि टेलिफोन खात्याचे रस्त्याचे नाटक असणारे अडथळा वजा पोल हटविले जातील असेही यावेळी सांगण्यात आले.

अतिक्रमण हटाव मोहिमेची वाई शहरात नितांत गरज असून शहरात विनाकारण झालेली अतिक्रमणे कोणाच्याही दबावाशिवाय काढली जातील असे यावेळी मुख्याधिकारी काटकर यांनी सांगितले.