|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अंगारकी संकष्टी भक्तीभावाने साजरी

अंगारकी संकष्टी भक्तीभावाने साजरी 

प्रतिनिधी / बेळगाव

तो विघ्ने दूर करतो म्हणून विघ्नहर्ता, बुद्धी प्रदान करतो म्हणून बुद्धिदाता, कार्य सिद्धीस नेतो असा 64 कलांचा अधिपती म्हणजेच गणपती. कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ गणपतीच्या पूजनानेच होतो. इतके महत्त्व या देवतेला आहे. अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने शहरातील उपनगरातील सर्व गणेश मंदिरांमध्ये झालेल्या भाविकांच्या गर्दीने हीच श्रद्धा अधोरेखीत केली.

अंगारकी संकष्टी केल्यानंतर 21 संकष्टी केल्याचे पुण्य लाभते, अशी श्रद्धा आहे.  भारद्वाज ऋषी यांनी पृथ्वीच्या गर्भातून भौम पुत्राचा जन्म घडवून आणला. या मुलाने 1 सहस्त्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले तो दिवस मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचा होता. त्याने गणेशाकडून स्वर्गलोकी अमृत प्राशन करण्याचे आणि त्रैलोक्मयात विख्यात व्हायचे वरदान मागितले. गणेशाने मंगळवारी येणारी संकष्टी ही तुझ्याच अंगारीका या नावाने ओळखली जाईल व उपासकास 21 संकष्टी केल्याचे फळ मिळेल, असा वर दिला. तेंव्हापासून अंगारकी संकष्टीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

विघ्नहर्ता गणेश हे साऱयांचेच आराध्य दैवत आहे. मंगळवार हा गणपतीचा वार म्हणून ओळखला जातो. मंगळवारी जेंव्हा संकष्टी येते तेंव्हा ती अंगारकी संकष्टी म्हणून ओळखली जाते. या संकष्टीला विशेष महत्त्व असल्याने शहर परिसरात मंगळवारी अंगारकी भक्तीभावाने आचरली गेली.

असंख्य भाविकांनी हिंडलगा गणपती, चन्नम्मा सर्कल येथील गणपती, गणेशपूर येथील स्वयंभू गणेश, अनगोळ क्रॉसवरील स्वयंभू गणपती, शहापूरमधील गणपतीची दोन्ही मंदिरे यासह शहर आणि परिसरातील गणेश मंदिरांमध्ये गणेशाची विधिवत पूजा करण्यात आली. काही ठिकाणी गणहोम झाला. सर्वच मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती.

सर्वच मंदिरांच्या बाहेर श्रीफळ, हार, फुलांचे स्टॉल मांडण्यात आले होते. हिंडलगा गणपती मंदिरानजीक लहान मुलांच्या खेळण्यांचे व फुग्यांचे स्टॉल मांडण्यात आले होते. संकष्टीला उपवास असल्याने साबुदाणा, बटाटा, भगर यांची आवक वाढली होती. केळी व फळांचे दर इतर दिवशींपेक्षा पाच रुपयांनी वाढले होते.

Related posts: