|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » भाजपविरोधात संयुक्त मोर्चाची गरज

भाजपविरोधात संयुक्त मोर्चाची गरज 

कन्हैय्या कुमार यांचे प्रतिपादन, केंद्र सरकारवर डागली तोफ

प्रतिनिधी / कोल्हापूर

भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. त्यांना या देशात एक नेता, एक ध्वज, एक पार्टी अशी हुकूमशाही आणायची आहे. 2019 च्या निवडणुकीत या सरकारला पराभूत करायचे असेल तर भाजपा विरोधकांनी एकत्र येऊन संयुक्त मोर्चा उभारला पाहीजे. हा मोर्चा केवळ राजकीय नसून सामाजिक स्तरावरही कार्यरत ठेवला पाहीजे. असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष  कन्हैय्या कुमार यांनी केले. तसेच भविष्यात निवडणूक लढवण्याची  इच्छाही त्यांनी वर्तवली. बुधवारी संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहात त्यांनी ‘लोकशाही वाचवा देश वाचवा’ या विषयावर भाषण केले. 

जवाहर लाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देण्याच्या आरोपावरून कन्हैय्या कुमार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कन्हैय्या कुमार महाराष्ट्राच्या राज्यव्यापी दौऱयावर आले होते. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आणि ऑल इंडिया युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11 वाजता केशवराव भोसले नाटय़गृहात सभेला सुरुवात झाली. सुरुवातीला पानसरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सभेचे प्रास्तावीक हरिष कांबळे यांनी केले. कॉ.गोविंद पानसरे विचार व निवडक लेखे, ‘कन्हैय्या बिहार ते तिहार’ या पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कॉम्रेड गिरीष फोंडे यांनी रा.स्व.संघ आणि परिवार देशात फूट पाडण्याचे काम करत असल्याचा आरोप केला.  तर ए.आय.एस.एफ चे राज्य सेक्रेट्री पंकज चव्हाण यांनी केजी टू पिजी मोफत शिक्षण मिळाले पाहीजे असा विचार मांडला. कन्हैय्या कुमार यांनी आपल्या भाषणात नोटबंदी, भाजापा सरकार यांच्यावर टीका करत आपल्यावर होणारे सर्व आरोपांचे खंडन केले.

संयुक्त मोर्चाची गरज

संघाचा हिंदू राष्ट्रचा अजंडा राबवण्याचे काम भाजपा करत आहे. शिक्षणाचे भगवीकरण, मुस्लीम तुष्टीकरण करून राजकारण करण्याचे संघ परिवाराचे लक्ष आहे. भाजपामुळे लोकशाहीपुढे संकट उभे राहीले आहे. यासाठी भाजपाचा पराभव करणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला केवळ 31 टक्के मते मिळाली. म्हणजे 69 टक्के मते त्यांच्या विरोधात आहेत. मात्र ही मते 5 पक्षांमध्ये विभागली गेल्याने भारतीय जनता पक्षाचा विजय झाला. त्यांचा पराभव करायचा असले तर सर्व विरोधकांनी एकत्र येऊन संयुक्त आघाडी बनवणे आवश्यक आहे. हा संयुक्त मोर्चा केवळ राजकीय नसून सामाजिक स्तरावरही कार्यरत राहीला पाहीजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली लोकतंत्राची संकल्पना केवळ राजकीय नसून सामाजिकही आहे. शिक्षण, आरोग्य, समाजिक समस्य या विषयावर संयुक्त आघाडीच्या माध्यमातून रचनात्मक काम उभे केले पाहीजे. तरच भारतीय जनता पक्षाचा पराभव करता येईल.

‘भारतीय जनभक्षक पार्टी’चे सरकार

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशातील बेरोजगार तरुणांनी, शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. सुमारे चारशे जवान शहीद झाले आहेत. नोटाबंदीच्या काळात रांगांमध्ये उभेराहून शंभरहून अधिक लोकांचे प्राण गेले आहेत. त्यामुळे ही भारतीय जनता पाटी नसून भारतीय जनभक्षक पार्टी आहे. नोटाबंदीचा निर्णय केवळ भांडवलदारांसाठी घेतला होता. यांना काळा पैशाचा बंदोबस्त करण्याची इच्छा नाही. फक्त त्याचा रंग बदलून तो आता गुलाबी केला आहे. डिजीटल व्यवहार भारतात शक्य नाही कारण इथे मायक्रो उद्योगांची संख्या अधीक आहे. फेरीवाले, हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणारे यांना डिजीटल व्यवहार करता येणार नाहीत. हे सरकार टाटा आणि बिर्लांचे आहे गरिबांचे नाही.

मी देशद्रोही नाही

कन्हैय्या कुमार म्हणाले, मी देशाच्या विरोधात कोणतीच घोषणाबाजी केली नाही. माझ्यावर गुन्हा दाखल करून 16 महिने झाले. मात्र अद्याप माझ्यावर आरोप पत्र दाखल करण्यात आलेले नाही. मी देशद्रोही नाही आणि या टिकेचा मला रागही येत नाही कारण देशद्रोहीमध्ये देश शब्द आहे. माझ्या परिवारातील 16 जण सैन्य दलामध्ये आहेत असे असताना मला लष्कर विरोधी सांगितले जाते. माझे गाव मिथिलानगरी म्हणजे सीतेचे जन्मगाव आहे. मी हिंदू आहे पण मला हिंदूद्रोही म्हटले जाते. धर्माचे समीक्षण करणे हे प्रत्येकाचे सामाजिक दायित्व आहे. त्यातूनच खरा धर्म समजतो. माझ्यासाठी धर्म हा आस्थेचा विषय आहे राजकारणाचा नाही.

आतंकवाद्यासोबत जाणारे भाजपा

काश्मिरमध्ये फुटीरतावादी पीडीपी सोबत भाजपीची युती आहे. खलिस्तानची मागणी करणाऱया अकाली दलाबरोबर यांनी सत्ता भोगली आहे. नागालँडमध्ये नागा फ्रंडबरोबर यांची युती आहे. सत्तेसाठी भाजपाबरोबर काहीही करेल त्यांच्यामुळे देशाच्या अखंडतेला धोका आहे. मुस्लीमांच्या माथी त्यांनी आतंकवाद्यांचा शिक्का मारला. हिंदू-मुस्लिम अशी भांडणे लावून हे केवळ सत्ता उपभोगतात.

 या सभेला डाव्या विचाराच्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेट्री कॉ.भालचंद्र कांगो, कॉ.उदय नारकर, माजी आमदार संपतबापू पवार-पाटील, कॉ.चंद्रकांत यादव, बाबुराव कदम, कॉ.चंद्रकांत यादव, सुभाष वाणी, व्यंकाप्पा भोसले, सरोजनीताई पाटील, रवी जाधव, दत्ता मोरे, भारती पोवार, एस.बी.शेख, सुमनताई पाटील, सीमा पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

पानसरे विचाराने आपल्यात आहेत

अध्यक्षीय भाषणात उमा पानसरे म्हणाल्या, लोकशाही केवळ मतदान करण्यापूर्तीच उरली आहे. विचार मांडणाऱयांना भरदिवसा गोळ्या घातल्या जातात. पानसरेंना मारून त्यांचा विचार संपणार नाही. कन्हैय्याला पाहिल्यावर पानसरे देहाने जरी उरले नसले तरी विचाराने आपल्यात असल्याचे जाणवते.

 

एक चहावाला जोडणारा, एक तोडणारा

कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते गंगाराम कांबळे यांनी  चहा विकून सामाजिक समतेचा संदेश दिला. जातीअंतासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि दुसरे चहावाले म्हणजे आपले पंतप्रधान ज्यांनी चहा विकला की नाही ते माहिती नाही पण देश तोडायचे काम केले. असे कन्हैय्याकुमार म्हणाले.

 

राम जंगलात गेले, योगी शहरात आले

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना कन्हैय्या म्हणाले, राम राजवौभव सोडून जंगलात गेले. आणि योगी उत्तराखंडच्या दंगलातून भगवी वस्त्रेधारण करून राजभोग घेण्यासाठी लखनौमध्ये आले. भगवा रंग हा शौर्याचा आणि त्याचागा आहे तो त्यांना शोभत नाही.

 

सभेमध्ये केलेले ठराव

1) अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण केले पाहीजे. पानसरेंचे मारेकरी आणि मास्टर माईंड यांना अटक व्हावी.

2) स्त्री-पूरुष समानता आणण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत.

3) शिक्षणाचे भगवीकरण आणि खासगीकरण थांबवावे.

Related posts: