|Saturday, May 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » धोनीला टीकेचे लक्ष्य करणे चुकीचे : विराट

धोनीला टीकेचे लक्ष्य करणे चुकीचे : विराट 

वृत्तसंस्था / तिरुअनंतपूरम

‘माजी कर्णधार व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘बेस्ट फिनिशर’चे बिरुद लाभलेला महेंद्रसिंग धोनी हा एकच खेळाडू सध्या अपयशी ठरत नाहीय. अगदी माझ्यासह अनेक खेळाडूंना अशा अपयशातून मार्ग काढावा लागत आहे. पण, इतके असताना देखील केवळ सोयीनेच त्याला टीकेचे लक्ष्य केले जात असून माझ्या दृष्टीने ते सर्वथा चुकीचे आहे’, अशा स्पष्ट शब्दात विराटने माहीच्या टीकाकारांचा चोख समाचार घेतला. भारताने न्यूझीलंडला तिसऱया व शेवटच्या टी-20 लढतीत 6 धावांनी पराभूत करत मालिकाविजयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर तो माध्यमांना संबोधित करत होता.

यापूर्वी, दुसऱया टी-20 सामन्यात न्यूझीलंडने भारताला नमवले, त्यावेळी 37 चेंडूत 49 धावा जमवणाऱया धोनीवर बरीच टीका झाली होती. त्या खेळीत धोनीने बरेच चेंडू निर्धाव खेळून काढले होते. एकीकडे, व्हीव्हीएस लक्ष्मणने टी-20 क्रिकेटमध्ये एखादा नवा खेळाडू उतरवणे योग्य ठरेल, असे म्हटले होते तर दुसरीकडे,  संघव्यवस्थापनाने माजी कर्णधाराला त्याची संघातील भूमिका समजावून सांगणे आवश्यक आहे, असा दावा सेहवागने केला होता. त्या पार्श्वभूमीवर विराट येथे बोलत होता. धोनीने अलीकडेच संपन्न झालेल्या न्यूझीलंडविरुद्ध 3 वनडे सामन्यांत 25, नाबाद 18 व 25 तर 3 टी-20 सामन्यात अनुक्रमे नाबाद 7, 49 व नाबाद 0 अशा धावा केल्या आहेत..

‘सर्व जण धोनीकडेच का अंगुलीनिर्देश करत आहेत, याचा मला उलगडा होत नाही. जर मी स्वतः फलंदाज या नात्याने तीनवेळा अपयशी ठरलो तरी माझ्यावर अशी टीका होणार नाही. कारण, मी अद्याप वयाची पस्तिशी गाठलेली नाही’, असे नाराज विराटने यावेळी नमूद केले.

‘धोनी पूर्ण तंदुरुस्त आहे. सर्व निकषांमध्ये तो चपखल बसतो. मैदानात प्रत्येक बाजूने त्याचे योगदान असते. फलंदाजीत लंकेविरुद्ध (विदेशात) आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने लक्षवेधी योगदान दिले. अर्थात, असे असले तरी त्याला फलंदाजीची किती संधी मिळते, हे देखील आपल्याला तपासून पाहावे लागेल. विशेषतः या मालिकेत तरी त्याला फारशी संधीच मिळालेली नाही. अगदी हार्दिक पंडय़ा देखील न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या टी-20 लढतीत अपयशी ठरला होता. पण, तरीही सोयीस्करपणे धोनीला टीकेचे लक्ष्य केले जात आहे, हे योग्य नव्हे’, असे या विद्यमान कर्णधाराने पुढे स्पष्ट केले.

शेवटी तो म्हणाला, ‘धोनी ज्यावेळी फलंदाजीला उतरतो, त्यावेळी धावसरासरी 8.5 ते 9.5 च्या घरात असते. नव्या चेंडूवर फलंदाजी सुरु होते, त्यासारखी स्थिती येथे नसते. आघाडीचे फलंदाज पूर्णपणे सेट असतात. त्यामुळे ते फटकेबाजी सुरु ठेवू शकतात. पण, तळाच्या स्थानी फलंदाजीला उतरणाऱया फलंदाजासाठी अशी परिस्थिती नसते. सर्वप्रथम त्याला खेळपट्टी वाचावी लागते. त्यामुळे, धोनीच्या कामगिरीविषयी आम्ही फारसे भावूक नाही, हे मी स्पष्ट करु इच्छितो’.

Related posts: