|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » घराला आग लागून 80 हजाराचे नुकसान

घराला आग लागून 80 हजाराचे नुकसान 

प्रतिनिधी /कुडाळ :

कुडाळ-पानबाजार येथील नाडकर्णीवाडा परिसरातील संतोष विनायक मोरे यांच्या घराला बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. घरातील रोख रक्कम व चीजवस्तू जळून अंदाजे 80 हजार रु. चे नुकसान झाले. शेजाऱयांनी प्रसंगावधान राखून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

संतोष मोरे यांच्यासह घरात पाचजण राहतात. जेवण आटोपून काल रात्री ते येथील कुडाळेश्वराच्या जत्रेला गेले होते. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घरातून धूर येताना काहींच्या निदर्शनास आले. त्यांनी पाहिले असता, घरात आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तेथील लोकांना कल्पना देताच शेजाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. तोपर्यंत रोख तेरा हजार रु., शिलाई मशिन, टीव्ही, मिक्सर, डीश टीव्ही मशिनरी, कपाट, कपडे तसेच दुसरीतील मुलाचे दप्तरही जळाले.

                   नागरिकांचे प्रसंगावधान

नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत आग आटोक्यात आणली. थोडा उशीर झाला असता, तर घराच्या दोन्ही बाजूला असलेले लाकडी गोदाम तसेच गॅस सिलिंडरपर्यंत आग पोहचली असती. मात्र, आग योग्यवेळी आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आग लागली तेव्हा घरात कोणी नव्हते. सकाळी कुडाळ तलाठय़ांनी पंचनामा केला. मात्र, कुडाळ पोलिसांत याची नोंद नाही.