|Monday, December 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे » लोणीमावळा बलात्कार-हत्येप्रकरणी तिघांना मृत्युदंड

लोणीमावळा बलात्कार-हत्येप्रकरणी तिघांना मृत्युदंड 

अन्य गुन्हय़ात जन्मठेप, प्रत्येकी 50 हजार रुपये दंड, नगर जिल्हा न्यायालयाचा निर्णय

नगर / प्रतिनिधी

अहमदनगर जिल्हय़ातील पारनेर तालुक्मयातील लोणीमावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी नराधम आरोपी संतोष विष्णू लोणकर, मंगेश लोणकर आणि दत्तात्रेय शंकर शिंदे या तिघाही आरोपींना शुक्रवारी मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. याखेरीज या आरोपींना सामूहिक बलात्कार, कट रचणे यांसह अन्य गुन्हय़ांत जन्मठेप व प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपींकडून वसूल करण्यात येणाऱया दंडातील रक्कम मुलीच्या कुटुंबाला देण्यात येणार असून, 50 हजार रुपये सरकारजमा होणार आहेत.

निकालाच्या वेळी विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम, आरोपीचे वकील यांच्यासह पीडित मुलीच्या आई-वडिलांसह स्थानिक गावकरी उपस्थित होते. नगर जिल्हय़ातील लोणीमावळा येथे 22 ऑगस्ट 2014 रोजी अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार करून खून करण्यात आल्याची घटना घडली. संबंधित तीन आरोपींनी या मुलीवर अत्याचार करीत अतिशय निर्घृण पद्धतीने तिचा खून केला. आरोपींनी पीडित मुलीच्या नाकातोंडात चिखल घातला. संतोष लोणकर याने तिच्या डोक्यात स्क्रू ड्रायव्हरने वार केले. मंगेश लोणकरने डोक्यात दगड घातला. तर दत्तात्रेय शिंदे याने तिचे पाय पकडून ठेवले. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी तिच्या अंगावर सर्वत्र चिखल टाकला होता. विकृत पद्धतीने त्यांनी हे कृत्य केले. हा खटला सुरुवातीच्या काळात म्हणावा तसा चर्चेत आला नव्हता. शाळकरी मुलीवर अत्याचार करून खून झालेला असतानाही सरकार पक्षाकडून फारशी गंभीर दखल घेतली नसल्याने ज्ये÷ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या खटल्यात ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली. प्रशासनाने खटल्यात निकम यांची डिसेंबर 2014 ला नियुक्ती केली. 18 नोव्हेंबर 2014 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर झाले आणि 1 जुलै 2015 पासून खटल्याची सुनावणी सुरू झाली.

या खटल्यात एकूण 32 साक्षीदार तपासण्यात आले. घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. मात्र, निकम यांनी 24 परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी न्यायालयात सादर केली व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेले पुरावे आणि अन्य बाबींचा विचार करून न्यायालयाने आरोपी संतोष लोणकर, मंगेश लोणकर आणि दत्ता शिंदे यांना बलात्कार, खून व त्यासाठी कट करणे या आरोपाखाली दोषी ठरवले. दोन दिवसांपूर्वी आरोपी व सरकार पक्षातर्फे शिक्षेवर युक्तिवाद संपल्यानंतर शुक्रवारी 10 नोव्हेंबर रोजी अंतिम निकाल देणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले होते. सकाळी विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी शिक्षापत्राचे वाचन केले. हत्येचा कट करणे, सामूहिक बलात्कार या प्रकारामध्ये जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजार रुपये दंड तसेच खून आणि अत्याचार या प्रकरणांमध्ये तिन्ही आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. आरोपीकडून वसूल करण्यात येणाऱया दंडाच्या रकमेपैकी एक लाख रुपयांची रक्कम संबंधित पीडित मुलीच्या कुटुंबाला दिली जाणार आहे, तर 50 हजार रुपये सरकारजमा होणार आहेत. निकालाच्या वेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, आरोपीचे वकील ऍड. राहुल देशमुख, ऍड. अनिल आरोटे, ऍड. परिमल फळे उपस्थित होते. लोणीमावळा येथील घटनेचा निकाल असल्यामुळे न्यायालयात मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

न्याय मिळाला : पालकांची प्रतिक्रिया

यासंदर्भात पीडित मुलीचे पालक म्हणाले, आमच्या मुलीवर तिघांनी अतिशय निर्घृण पद्धतीने अत्याचार करून तिला मारले. ही घटना गेल्या तीन वर्षांत आम्ही विसरू शकलो नाही. मात्र, आज न्यायालयाने फाशीची शिक्षा देऊन आम्हाला आणि आमच्या मुलीला योग्य न्याय दिला आहे. ज्ये÷ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून आमच्याच नव्हे; तर महाराष्ट्रातील लाखो मुलींना न्याय दिला आहे.

कोपर्डीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निकाल

दरम्यान, कोपर्डी प्रकरणाचीही सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याआधी लोणीमावळा प्रकरणाचा निकाल लागला असून, दोन्ही घटनांमध्ये काही प्रमाणात साम्य असल्याचे मानले जाते. मुख्य म्हणजे कोपर्डीचा खटलाही ऍड. उज्ज्वल निकम लढवत आहेत. न्यायालयाने याप्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्याने कोपर्डी प्रकरणाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. कोपर्डी बलात्कार प्रकरणी शिक्षेची अंतिम सुनावणी 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Related posts: