|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » डीएसकेंना न्यायालयाचा दिलासा

डीएसकेंना न्यायालयाचा दिलासा 

एक लाखाच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर

प्रतिनिधी/ मुंबई

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कचाटय़ात अडकलेले उद्योजक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने एक आठवडय़ाचा अंतरिम जामीन मंजूर केला.

ठेवीदारांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून 1 हजार 340 पेक्षा अधिक लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून त्यांनी पुणे विशेष न्यायालयात अर्ज केला होता. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी बुधवारी तो फेटाळून लावला. त्यानंतर डीएसके यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज न्यायमूर्ती ए. एस. गडकरी यांच्यासमोर सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान कुलकर्णी दाम्पत्याच्यावतीने ऍड. श्रीकांत शिवदे, ऍड. गिरीश कुलकर्णी आणि ऍड. सुशीलकुमार पिसे यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर कुलकर्णी दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला. तसेच एक आठवडय़ात सर्व व्यवहार पूर्ण करता आले तर पहा, नाही तर ठोस प्रपोजल घेऊनच जामिनासाठी या असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

मालमत्ता ताब्यात घेण्यास सुरुवात

एकीकडे न्यायालयाने दिलासा दिला असला तरी दुसरीकडे बँकांनी त्यांच्याविरोधात कारवाई सुरू केली आहे. डीएसके यांच्यावर अनेक बँकांचे तब्बल 1,400 कोटींचे कर्ज आहे. त्यासाठी त्यांनी मालमत्ता गहाण ठेवल्या आहेत. याच मालमत्ता आता जप्त करण्यास सुरुवात झाली असून बालेवाडी आणि फुरसुंगीमधील जमीन सेंट्रल बँक ऑफ इंडियाने जप्त केली आहे. फुरसुंगीमधील जमीन ही डीएसपेंच्या बहुचर्चित ड्रीम सीटीचा भाग आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून डीएसके आणि त्यांच्या पत्नीने 82 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ते कर्ज परत न केल्याने त्यांची मालमत्ता जप्ती सुरू झाली आहे. गुंतवणूकदारांचे 600 कोटी रुपये आपण मालमत्ता विकून देऊ असे डीएसपेंनी वकिलामार्फत न्यायालयात सांगितले. मात्र, त्याआधीच जप्ती सुरू झाल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

Related posts: