|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » लंका-बोर्ड अध्यक्ष इलेव्हन सराव सामना आजपासून

लंका-बोर्ड अध्यक्ष इलेव्हन सराव सामना आजपासून 

वृत्तसंस्था/ कोलकाता

गेल्या 35 वर्षांत भारतात एकही कसोटी जिंकू न शकलेल्या लंका संघाचा भारत दौऱयातील एकमेव सराव सामना शनिवारपासून येथे सुरू होत असून हा दोन दिवसीय सामना ते बोर्ड अध्यक्ष इलेव्हन संघाविरुद्ध खेळणार आहेत.

2009-10 नंतर लंका संघ भारतात प्रथमच कसोटी मालिका खेळणार आहे. भारत दौऱयातील त्यांचे रेकॉर्ड खराब असून 1982 पासून आतापर्यंत झालेल्या सोळा दौऱयात त्यांना एकही विजय मिळविता आलेला नाही तर दहा सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळेच दिनेश चंडिमलच्या नेतृत्वाखालील लंकन संघासमोर इतिहास बदलण्याचे कठीण आव्हान उभे आहे. चंडिमल भारतात प्रथमच कसोटी खेळणार असून अँजेलो मॅथ्यूज व रंगना हेराथ यांच्या अनुभवावरच त्याला भरवसा ठेवावा लागणार आहे. सात वर्षांपूर्वी लंकेला भारताकडून 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. मॅथ्यूज व हेराथ हे त्या संघाचे सदस्य होते.

दोन महिन्यापूर्वी लंकेता त्यांच्याच भूमीत भारताकडून तीन प्रकारांत मिळून 9-0 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र त्यानंतर लंकेने संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत पाकवर 2-0 असा विजय मिळविला असल्याने त्यांचा आत्मविश्वास काहीसा उंचावलेला आहे. भारतातील मालिकेत तीन कसोटी, 3 वनडे व 3 टी-20 सामने ते खेळणार आहेत. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील तृतीय दर्जाच्या संघाविरुद्ध चांगले प्रदर्शन करून दौऱयाची सुरुवात करण्याची आशा कर्णधार चंडिमलने व्यक्त केली आहे. हा सामना जाधवपूर युनिव्हर्सिटी कॅम्पस मैदानावर होणार असून तेथील खेळपट्टी सीम गोलंदाजीसाठी नेहमी अनुकूल ठरते.

सध्या रणजी करंडक सामने सुरू असल्याने मंडळाने त्याला जास्त महत्त्व दिले असून लंकेविरुद्धच्या लढतीसाठी त्यांनी तिसऱया फळीच्या खेळाडूंना निवडले आहे. हैदराबाद, केरळ, मध्यप्रदेश व पंजाब यांचे पाचव्या फेरीतील रणजी सामने नसल्याने याच संघातील खेळाडूंना बोर्ड अध्यक्ष संघात निवडण्यात आले आहे. त्यामुळे लंकेची कसोटी मालिकेची पूर्वतयारी अपेक्षेप्रमाणे होईल, असे म्हणता येणार नाही. मात्र या सामन्यात लंकेचे लक्ष असेल ते दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱया अँजेलो मॅथ्यूजवर. दुखापतमुळे पाकविरुद्धची पूर्ण मालिका त्याला हुकली होती. त्याने आता जोरदार सराव केला असून मुख्य मालिकेआधी लय मिळविण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

पाकविरुद्धच्या मालिकेत 16 बळी मिळविणारा फिरकी गोलंदाज रंगना हेराथ या मालिकेतही त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक आहे. या 39 वर्षीय गोलंदाजाला डावखुरा चायनामन गोलंदाज लक्षण संदकनकडून साथ मिळेल. गेल्या ऑगस्टमध्ये भारताविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत त्याने पाच बळी मिळविले होते. फलंदाजीत दिमुथ करुणारत्नेवर त्यांची प्रमुख भिस्त असेल. पाकविरुद्ध त्याने 93 व 196 धावांची खेळी केली होती. तीच घोडदौड पुढे चालू ठेवण्यास तो उत्सुक आहे. याशिवाय चंडिमल व डिकवेला यांच्याकडूनही फलंदाजीत चमक अपेक्षित आहे. पाकविरुद्ध चंडिमलने शतक तर डिकवेलाने दोन अर्धशतके झळकवली होती.

लंका संघ : चंडिमल (कर्णधार), करुणारत्ने, समरविक्रमा, थिरिमने, डिकवेला, दिलरुवान परेरा, हेराथ, लकमल, गमगे, धनंजय डी सिल्वा, मॅथ्यूज, संदकन, विश्वा फर्नांडो, शनाका, रोशेन सिल्वा.

बोर्ड अध्यक्ष संघ : संजू सॅमसन (कर्णधार), अभिषेक गुप्ता, आकाश भंडारी, अवेश खान, जलज सक्सेना, जिवनज्योत सिंग, रवि किरण, रोहन प्रेम, बी. संदीप, तन्मय अगरवाल, संदीप वॉरियर, अनमोलप्रीत सिंग.