|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कोथळे कुटुंबियांना न्याय देणार

कोथळे कुटुंबियांना न्याय देणार 

गृहराज्यमंत्री केसरकर यांची माहिती, आज सांगली दौऱयावर

प्रतिनिधी / सावंतवाडी:

सांगली शहर पोलिसांच्या कोठडीतील संशयित अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आपण रविवारी सांगली येथे जात आहे. तेथे जाऊन वस्तुस्थिती जाणून घेणार आहे. कोथळेंच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहील. आणि जे या
प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. जे पोलीस सहभागी होते, ते निलंबित झाले आहेत. आता या प्रकरणाचा सीआयडीमार्फत सखोल तपास केला जाणार आहे, असे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.

केसरकर पुढे म्हणाले, ही घटना घडली तेव्हा मी राज्याबाहेर होतो. पोलिसांनी ज्या पद्धतीने कृत्य केले ते योग्य नाही. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे. ही प्रतिमा सुधारण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यात येतील. पोलिसांवरील दबाव दूर करणे तसेच त्यांना स्वतंत्रपणे काम करू देण्याच्या दृष्टीने विचार करण्यात येईल.

पोलीस निःपक्ष पद्धतीने काम करू शकतील, यादृष्टीने काही उपाय अंमलात आणण्याचा विचार आहे. पोलिसांनीच संशयित कोथळेचा मृतदेह आंबोलीपर्यंत आणून जाळल्याचे कृत्य दुर्दैवी आहे. अशा घटनांचा उलगडा लागलीच व्हावा. तसेच अशा कृत्यांना आळा बसावा, यासाठी आंबोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. आंबोली हिलस्टेशन आहे. त्यामुळे दक्षता घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मृत अनिकेत कोथळे याच्या मृतदेहाची डीएनए चाचणी केली जाणार आहे. तसेच त्याच्या पत्नीला नोकरीत सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांना दिल्याचे केसरकर म्हणाले.