|Friday, July 20, 2018
You are here: Home » क्रिडा » शास्त्रींकडूनही धोनीच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

शास्त्रींकडूनही धोनीच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

टी-20 क्रिकेटमध्ये अलीकडील कालावधीत अपेक्षित कामगिरी करु न शकलेल्या धोनीला कर्णधार विराट कोहलीनंतर प्रशिक्षक रवी शास्त्री यांचेही पाठबळ लाभले आहे. ‘महान खेळाडू त्यांच्या कारकिर्दीविषयी स्वतःच निर्णय घेत असतात’, अशा शब्दात शास्त्रींनी माहीचे समर्थन केले. सांघिक अपयशाकरिता केवळ धोनीला लक्ष्य करणे चुकीचे आहे, असे यापूर्वी विराटने म्हटले होते.

यापूर्वी, न्यूझीलंडविरुद्ध दुसऱया टी-20 सामन्यात धोनीने 37 चेंडूत 49 धावा केल्यानंतर भारताला तेथे पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर धोनीच्या संथ फलंदाजीवर बरीच टीका झाली. धोनीने त्या डावात फटकेबाजी केली असली तरी बरेच चेंडू निर्धाव खेळून काढले होते. त्या पार्श्वभूमीवर, त्याच्यावर माजी खेळाडू व टीव्ही तज्ञांनी बरीच टीका केली. त्यानंतर एकीकडे, विराटने फक्त धोनीलाच का लक्ष्य केले जाते, असा सवाल उपस्थित केला तर शास्त्री यांनी आणखी आक्रमकपणे धोनीची बाजू मांडली.

‘धोनीविषयी मत्सर असणारे अनेक जण आजूबाजूला आहेत, असे सध्या जाणवते. काही जणांना तर फक्त माहीच्या कारकिर्दीचा अस्त पाहायचा असावा की काय, अशी साशंकता वाटते. पण, त्याच्यासारखे महान खेळाडू स्वतःच्या कारकिर्दीविषयी स्वतःच निर्णय घेत असतात’, असे शास्त्री याप्रसंगी पुढे म्हणाले. टीव्हीवरील कार्यक्रमाच्या स्वरुपामुळे देखील काही तज्ञ वाहवत गेले असावेत. कारण, वाहिन्यांना शो चालवायचा असतो आणि त्यासाठी प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांना तज्ञांना उत्तरे द्यावीच लागतात. अशा परिस्थितीत असे गैरसमज होऊ शकतात, असा दावाही त्यांनी केला.

‘धोनी सुपरस्टार खेळाडू आहे. शिवाय, तो भारतीय संघातील काही मोजक्या महान खेळाडूंपैकी देखील एक आहे. त्याच्यामागे त्याची सोनेरी कारकीर्द आहे. तसेच त्याने मिळवलेले यशही आहे. अशा पार्श्वभूमीवर टीव्ही वाहिन्यांवर हा निश्चितच मोठा ‘टॉपिक’ होऊ शकतो’, असे शास्त्री पुढे म्हणाले.

विराटकडून समर्थन

यापूवी, धोनीला पाठबळ दर्शवताना विद्यमान कर्णधार विराट कोहली म्हणाला होता, ‘धोनी ज्या फलंदाजी क्रमांकावर, ज्या परिस्थितीत फलंदाजीला उतरतो, ते आपण पाहायला हवे. इतर लोक काय म्हणतात, त्यापेक्षा प्रत्यक्ष कोणत्या परिस्थितीत त्याला खेळावे लागते, हे समजून घ्यावे लागेल’.

Related posts: