|Thursday, January 17, 2019
You are here: Home » क्रिडा » यजमान मुंबई पराभवाच्या उंबठय़ावर

यजमान मुंबई पराभवाच्या उंबठय़ावर 

वृत्तसंस्था/ मुंबई

वानखेडेवर सुरु असलेल्या मुंबईच्या ऐतिहासिक 500 व्या रणजी सामन्याचा आनंद बडोदकरांनी चांगलाच लुटला. या महत्वपूर्ण सामन्यात बडोदा संघाने आपला पहिला डाव 180 षटकांत 9 बाद 575 धावांवर घोषित करत मुंबईला चांगलेच बॅकफूटवर ढकलले आहे. तब्बल 404 धावांची भक्कम आघाडी मिळवल्यानंतर बडोद्याच्या गोलंदाजानी चोख कामगिरी बजावताना मुंबईची तिसऱया दिवसअखेर 4 बाद 102 अशी बिकट अवस्था केली आहे. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा अजिंक्य रहाणे 28 व सुर्यकुमार यादव 2 धावांवर खेळत होते. अद्याप मुंबई संघ 302 धावांनी पिछाडीवर असून डावाने पराभव टाळण्यासाठी शेवटच्या दिवशी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहे. विशेष म्हणजे, बडोद्याचा स्टार फलंदाज स्वप्नील सिंगने तिसऱया दिवशी खडूस शतक झळकावताना मुंबईच्या गोलंदाजाना चांगलेच झगडायला लावले.

तत्पूर्वी, बडोदा संघाने 4 बाद 376 धावसंख्येवरुन तिसऱया दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. डावातील तिसऱयाच षटकांत आशिष कंरबळीकरला 13 धावांवर धवल कुलकर्णीने बाद करत पाहुण्या संघाला पहिला धक्का दिला. यानंतर, मधल्या फळतील स्टार फलंदाज मितेश पटेललाही (1) धावांवर शार्दुलने बाद करत बडोदा संघाची 5 बाद 388 अशी अवस्था केली होती. शुक्रवारी नाबाद राहिलेल्या स्वप्नील सिंगने मात्र एकतर्फी किल्ला लढवताना अतित शेठसोबत सातव्या गडय़ासाठी 63 धावांची भागीदारी साकारत संघाला साडेचारशेपर्यंत मजल मारुन दिली.

स्वप्नील सिंगचे रणजीतील पहिले शतक

मधल्या फळीतील फलंदाजानी निराशा केल्यानंतर स्वप्नील सिंगने मात्र एकतर्फी किल्ला लढवला. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील पहिलेवाहिले शतक साजरे करताना 309 चेंडूत 10 चौकार व 4 षटकारासह 164 धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. विशेष म्हणजे, 15 वर्षापूर्वी 2006 मध्ये प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱया स्वप्नीलने तब्बल 11 वर्षानंतर आपले पहिलेवाहिले शतक झळकावले. स्वप्नीलने मुंबईच्या गोलंदाजाच्या चांगलाच समाचार घेतला. कर्णधार तरेने खडूस स्वप्नीलला बाद करण्यासाठी तब्बल आठ गोलंदाजाचा वापर केला. अखेरीस, 164 धावांवर स्वप्नीलला धवलने बाद करत त्याची 432 मिनिटांची खेळी संपुष्टात आणली. आतापर्यंतच्या रणजी सामन्यांमधील माझी ही सर्वोत्तम खेळी असल्याचे स्वप्नीलने सामन्यानंतर सांगितले. स्वप्नील बाद झाल्यानंतर बडोद्याचा कर्णधार दीपक हुडाने संघाचा पहिला डाव 180 षटकांत 9 बाद 575 धावांवर घोषित केला व 404 धावांची भक्कम आघाडी मिळवली. तळाचा फलंदाज सागर मंगोलकरने 131 चेंडूत 5 चौकारासह नाबाद 43 धावांची खेळी साकारत स्वप्नीलला चांगली साथ दिली. लकवन मेरिवाला 6 धावांवर नाबाद राहिला.

मुंबईतर्फे शार्दुल ठाकुरने 79 धावांत 3 तर धवल कुलकर्णी व विजय गोहिलने प्रत्येकी 2 गडी बाद केले. रोस्टन दिएस व श्रेयस अय्यरने प्रत्येकी 1 गडी बाद केला. विशेष म्हणजे, तिसऱया दिवशीही मुंबईच्या दिशाहीन व बोथट गोलंदाजीचा प्रत्यय आला.

बडोद्याने पहिला डाव 575 धावांवर घोषित केल्यानंतर दुसऱया डावात खेळणाऱया मुंबईने तिसऱया दिवसअखेरीस 29 षटकांत 4 बाद 102 धावा केल्या होत्या. सलामीला आलेला कर्णधार आदित्य तरे (5) मेरिवालाने सहाव्या षटकांत तंबूचा रस्ता दाखवताना मुंबईला पहिला धक्का दिला. यानंतर, पृथ्वी शॉ व अजिंक्य रहाणेने दुसऱया गडय़ासाठी 62 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. आक्रमक खेळणाऱया पृथ्वीचा अडथळा स्वप्नील सिंगने दूर केला. पृथ्वीने 70 चेंडूत 7 चौकार व 1 षटकारासह 56 धावा फटकावल्या. यानंतर, श्रेयस अय्यर (8), विजया गोहिल (0) स्वस्तात बाद झाल्याने मुंबईची 4 बाद 99 अशी बिकट अवस्था झाली होती. तिसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मुंबईने 29 षटकांत 4 बाद 102 धावा जमवल्या होत्या. अनुभवी अजिंक्य रहाणे 3 चौकारासह 28 व सुर्यकुमार यादव 2 धावांवर खेळत होते. मुंबई संघ अद्याप 302 धावांनी पिछाडीवर आहे. बडोदातर्फे अतित शेठ, मेरिवाला, स्वप्नील सिंग व काकडे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : मुंबई पहिला डाव 171 व दुसरा डाव 29 षटकांत 4 बाद 102 (पृथ्वी शॉ 70 चेंडूत 7 चौकार व 1 षटकारासह 56, आदित्य तरे 5, श्रेयस अय्यर 8, विजय गोहिल 0, अजिंक्य रहाणे खेळत आहे 28, सुर्यकुमार यादव 2, अतित शेठ 1/47, स्वप्नील सिंग 1/26, मेरिवाला 1/13). बडोदा पहिला डाव 180 षटकांत 9 बाद 575 घोषित (आदित्य वाघमोडे 138, सोळंकी 54, दीपक हुडा 75, स्वप्नील सिंग 309 चेंडूत 10 चौकार व 4 षटकारासह 164, सागर मंगोलकर नाबाद 43, शार्दुल ठाकुर 3/95, धवल कुलकर्णी 2/79, विजय गोहिल 2/177).

 

ऐतिहासिक सामन्यात शेवटच्या दिवशी मुंबईची अग्निपरीक्षा..

मुंबईचा हा पाचशेवा ऐतिहासिक सामना. पण आतापर्यंत झालेल्या 100, 200, 300 व 400 व्या शतकमहोत्सवी सामन्यांमध्ये मुंबईचा संघ कधीही पिछाडीवर पडला नव्हता. प्रत्येक सामन्यात मुंबईने मर्दुमकी गाजवली होती. पण, पाचशेव्या रणजी सामन्यात मात्र मुंबई संघ पहिल्या दिवसापासून पिछाडीवर पडलेला पहायला मिळाला. सामन्याचा आजचा शेवटचा दिवस शिल्लक असून यजमान मुंबईला डावाने पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. अनुभवी अजिंक्य रहाणेवर मुंबईच्या आशा असणार आहेत.

Related posts: