|Thursday, January 17, 2019
You are here: Home » क्रिडा » लंकन एकादश पहिल्या दिवसअखेर 6 बाद 411

लंकन एकादश पहिल्या दिवसअखेर 6 बाद 411 

बोर्ड अध्यक्षीय इलेव्हनविरुद्ध दोन दिवसांची लढत : चार फलंदाजांची अर्धशतके

वृत्तसंस्था/ कोलकाता

आघाडी फळीतील 4 फलंदाजांनी शानदार अर्धशतके झळकावल्यानंतर श्रीलंकेने बोर्ड अध्यक्षीय इलेव्हनविरुद्ध पहिल्या दिवसअखेर 6 बाद 411 धावा जमवल्या व याच धावसंख्येवर आपला डावही घोषित केला. दोन दिवसांच्या या सरावाच्या लढतीत सदीरा समरविक्रमा (74 चेंडूत 77) व दिमुथ करुणारत्ने (50 धावांवर निवृत्त) यांनी 133 धावांची भागीदारी साकारली, ते दिवसाचे ठळक वैशिष्टय़ ठरले. यष्टीरक्षक-फलंदाज निरोशन डिकवेला (नाबाद 73) व पुनरागमनवीर अँजिलो मॅथ्यूज (54 वर निवृत्त) यांनीही येथे लक्षवेधी अर्धशतके साजरी केली. 

बोर्ड अध्यक्षीय संघाचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकल्यानंतर पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि त्यांनीही या संधीचे पुरेपूर सोने केल्याचे दिवसअखेर स्पष्ट झाले. अर्धशतकवीर डिकवेला प्रारंभी 53 धावांवर निवृत्त झाला होता. पण, डावातील 80 व्या षटकात सुरंगा लकमल 3 धावांवर बाद झाल्यानंतर तो पुन्हा मैदानात परतला आणि त्याने 59 चेंडूत जलद 73 धावांची खेळी साकारली. डिकवेलाच्या या शानदार खेळीत 13 चौकारांचा समावेश राहिला.

पुनरागमनवीर अँजिलो मॅथ्यूजचे अर्धशतक लंकेसाठी दिलासा देणारे ठरले तर चक्क आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दिलरुवन पेरेराने देखील यजमान गोलंदाजांचा सुमार दर्जा चव्हाटय़ावर आणत 44 चेंडूत 48 धावांची आतषबाजी केली. 88 व्या षटकानंतर अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. यजमान संघात बहुतांशी क्रिकेटपटू तिसऱया फळीतील असल्याने लंकेची सर्वोत्तम तयारी झाली नसेलही. पण, समरविक्रमासारख्या नवोदितांना येथे फलंदाजीची उत्तम संधी लाभली. सॉल्टलेकवरील जादवपूर विद्यापीठ सेकंड कॅम्पस ग्राऊंडवर ही लढत खेळवली जात आहे.

मागील महिन्यात दुबई येथे पाकिस्तानविरुद्ध दुसऱया व शेवटच्या सामन्यात कसोटी पदार्पण करणाऱया समरविक्रमाने पहिल्याच चेंडूवर उत्तम ऑफ ड्राईव्ह लगावत आपले इरादे स्पष्ट केले. त्याच लढतीत 196 धावांची कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारणाऱया डावखुरा सलामीवीर करुणारत्नेने येथे समरविक्रमाला समयोचित साथ दिली.

समरविक्रमाने जलज सक्सेना व आकाश भंडारी या बोर्ड एकादशच्या फिरकीपटूंविरोधात पुढे सरसावत काही उत्तूंग फटकेही लगावले. त्याने 46 चेंडूतच अर्धशतक फलकावर लावले होते. करुणारत्नेने 62 चेंडूत अर्धशतक झळकावल्यानंतर पुढे 23 व्या षटकात निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. समरविक्रमा पुढे फाईनलेगकडे झेल देत बाद झाला असला तरी दि. 16 पासून खेळवल्या जाणाऱया पहिल्या कसोटीत कौशल सिल्वाऐवजी त्याची वर्णी लागणे जवळपास निश्चित मानले जात आहे. यजमान संघातर्फे मध्यमगती गोलंदाज संदीप वारियर व लेगस्पिनर आकाश भंडारी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका : 88 षटकात 6/411 (समरविक्रमा 77 चेंडूत 13 चौकारांसह 73, निरोशन डिकवेला 59 चेंडूत 13 चौकारांसह नाबाद 73, अँजिलो मॅथ्यूज 54 धावांवर निवृत्त, करुणारत्ने 50 धावांवर निवृत्त. अवांतर 15. एस. संदीप वारियर 2/60, आकाश भंडारी 2/111).

Related posts: