तेंडोलीत लेप्टोचा आणखी एक रुग्ण

संपदा पेडणेकर यांचा मृत्यू ‘व्हायरल सिंड्रोम’मुळे
आमदार वैभव नाईक यांची ग्रामीण रुग्णालयाला भेट
प्रतिनिधी / कुडाळ:
अणाव येथील रमेश कटेकर यांचा मृत्यू लेप्टोने झाल्याचा अहवाल प्राप्त होऊन दोन दिवस झाले असतानाच सोमवारी लेप्टोचा रुग्ण तेंडोली येथे आढळल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ ग्रामीण रुग्णालयाला सोमवारी भेट देऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्याकडून आढावा घेतला. यावेळी त्यांनी सतर्क राहून काम करा, अशा सूचना दिल्या.
कुडाळात लॅप्टोसदृश तापाचे तसेच अन्य तापसरीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ व रमेश कटेकर, संपदा पेडणेकर यांचा मृत्यू या पार्श्वभूमीवर आमदार नाईक यांनी रुग्णालयाला भेट देऊन चौकशी केली. त्यांच्या समवेत कुडाळ पंचायत समिती सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, जि. प. सदस्य संजय पडते, अनुप्रिती खोचरे, अमरसेन सावंत, वर्षा कुडाळकर, संजय भोगटे आदी उपस्थित होते.
पंचायत समिती सदस्या संपदा पेडणेकर यांचा मृत्यू व्हायरल सिन्ड्रोम (म्हणजे अनेक लक्षणांच्या पेशी किडणी, फुप्फुस यावर ऍटॅक करतात. उपचार होण्यापूर्वी रुग्ण दगावतो.) मुळे झाल्याचे डॉ. साळे यांनी सांगितले. अणाव येथील रमेश कटेकर यांचा मृत्यू लेप्टोने झाला. तालुक्यात आरोग्य कर्मचाऱयांसह सर्व यंत्रणांना सूचना देऊन तापाचे रुग्ण आढळल्यास सरकारी दवाखान्यात पाठवा, असे आदेशच दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सक्षम आहे. आपल्याकडे चार व्हेंटीलेटर मशिन्स आहेत. एका मशिनसाठी तीन फिजिशियन्स लागतात. आपल्याकडे एकच फिजिशियनची मागणी आरोग्य संचालक यांच्याकडे केल्याचे डॉ. साळे यांनी सांगितले.
तालुक्यातील तेंडोली परबवाडा येथील राजश्री राजन परब हिला ताप येत होता. तिने स्थानिक खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतले. तिच्या तपासणीत लेप्टोसदृश ताप असल्याचे आढळून आल्याचे डॉ. साळे यांनी सांगितले. यावेळी डॉ. गौरव घुर्ये, डॉ. प्रमोद वालावलकर, डॉ. श्रीपाद पाटील उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी असलेली ऍम्ब्युलन्स गेले पंधरा दिवस बंद असल्याचे आमदार नाईक यांना समजल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली. फक्त पन्नास हजार रुपये खर्च आहे. ताबडतोब ऍम्ब्युलन्स दुरुस्त करून घ्या, असे आदेश दिले. पैसे शासनाकडून मिळण्याची वाट पाहू नका. पैसे आपण देऊ. आजच ऍम्ब्युलन्सचे काम करून घ्या. तापसरीचा रुग्ण उपचाराशिवाय राहणार नाही. प्रत्येक रुग्णांची रक्त तपासणी करून उपचार करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.