|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गडगडी धरणाला गळती?

गडगडी धरणाला गळती? 

कालव्यातून येतेय गढूळ पाणी

परिसरातील 30 गावे भितीच्या छायेखाली,

पाटबंधारे विभागाकडून धोका नसल्याचा निर्वाळा

प्रतिनिधी /देवरुख

संगमेश्वर तालुक्यातील वाशी-बोरसुतमधील गडगडी धरणाच्या कलव्यामधून गेले काही दिवस गढूळ पाणी येत असून धरणाखाली गळती लागल्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे धरणाखालील 30 गावे भीतीच्या छायेखाली असून पाटबंधारे विभागाने मात्र ही गळती फार मोठी नसून धरणाला धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसऱया बाजूला ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी धरण गळतीचा मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करत आहेत. त्यामुळे परिसरातील 30 गावांमध्ये संभ्रमाचे व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाशी ः गडगडी धरणातील पाण्याचा साठा व कालव्यामधून वाहत असलेले गढुळ पाणी. (छाया-दीपक कुवळेकर, देवरुख.)

तालुक्यात गडगडी व गड असे पाटबंधारे विभागाचे देन मोठे प्रकल्प आहेत. या धरणामुळे अनेक गावे पाणीटंचाईमुक्त झाली आहेत. यातील गडगडी हे धरण वाशी व बोरसुत या खोऱयात बांधण्यात आले आहे. 1982 साली या धरणाला अंतिम मंजुरी मिळाली मात्र प्रत्यक्षात 1987 मध्ये या धरणाचे काम सुरु झाले. 2007 साली एकुण 60 कोटी रुपये खर्च झाले. मात्र त्यानंतर हळूहळू ही रक्कम वाढतच गेली असून आतापर्यंत सुमारे 120 कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अजूनही काही काम अपुर्ण आहे. प्रामुख्याने कालव्याचे काम अपुर्ण असल्याने याचा लाभ शेतकऱयांना घेता येत नाही.

मुख्य धरणाचे काम मात्र पुर्ण असून या धरणात 13.526 दलघमी (टीएमसी) एवढय़ा पाणी साठय़ाची क्षमता आहे. धरणाची भिंत 33 मीटर उंच असून त्यात दोन वर्षापुर्वी थोडी वाढ करण्यात आली आहे. धरणाचा उजवा कालवा 15 कि.मी. चा तर डावा कालवा 8 कि.मी. चा आहे. मात्र या दोन्ही कालव्याची कामे अपुर्णच आहे. यातून 916 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार होते. मात्र कामच पुर्ण नसल्याने याचा एकही थेंब शेतकऱयापर्यंत पोचलाच नाही.

धरणाचा मुख्य कालवा आहे. तिथून काही दिवसापुर्वी पाणी झिरपत असल्याचे ग्रामस्थांना दिसले. आता या कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून ते पुर्णपणे गढूळ आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार भिंतीच्या खालून पाणी झिरपत आहे. यावर त्यांनी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली आहे. पाणी झिरपत असल्याने परिसरातील गावांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. परिसरातील 30 गावांना याचा धोका निर्माण झाला आहे.

त्वरीत उपययोजना हवीः अधटराव

गडगडी धरणाला लागलेली गळतीबाबत ग्रामस्थांनी आपल्याला कळवले होते. त्यानुसार आपण रविवारी ग्रामस्थांसह धरणाची पाहणी केली. भिंती खालून पाणी येते ही वस्तूस्थिती आहे. मात्र सध्या हे प्रमाण कमी असले तरी धोकादायक ठरु शकते. यामुळे पाठबंधारे विभागाने यावर त्त्वरीत उपाययोजना कराव्यात अशी मागणी आपण संबंधित विभागाकडे करणार असल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी सांगितले.

धरणाला धोका नाहीः बनसोडे

गडगडी धरणाला कालव्याच्या बाजूने थोडीशी गळती सुरु आहे हे खरे आहे, पण धोकादायक अजिबात नाही. कालव्याच्या ठिकाणी असलेल्या रबरचे सिल बाद झाले आहेत. त्यामुळे ही गळती सुरु आहे. लवकरच यावर उपाययोजना केल्या जातील अशी माहिती पाटबंधारे विभागाचे सहाय्यक उपअभियंता विकास बनसोडे यांनी सांगितले.

Related posts: