|Thursday, October 18, 2018
You are here: Home » क्रिडा » पहिली कसोटी जिंकणे, हा सध्याचा प्राधान्यक्रम

पहिली कसोटी जिंकणे, हा सध्याचा प्राधान्यक्रम 

कसोटीतील यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाचे प्रतिपादन, भारत-लंका पहिली कसोटी गुरुवारपासून

वृत्तसंस्था/ कोलकाता

‘आम्ही अद्याप मुख्य खेळपट्टी पाहिलेली नाही. पण, 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत दमदार प्रारंभासाठी येथील ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी जिंकणे, हा आमचा सध्याचा प्राधान्यक्रम असेल’, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाने केले. संघाच्या सराव शिबिरानंतर तो पत्रकार परिषदेला संबोधित करत होता. उभय संघातील पहिली कसोटी गुरुवार दि. 16 पासून खेळवली जाणार असून या मालिकेत 3 कसोटी, 3 वनडे व 3 टी-20 होतील.

‘आमच्यासाठी या मालिकेतीलही प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. या प्रत्येक सामन्यात आमच्यासमोरील आव्हाने देखील वेगळी असतील. अर्थात, आम्ही एका वेळी एकाच लढतीचा विचार करणार आहोत आणि याच अनुषंगाने सध्या पहिली कसोटी जिंकून दमदार सुरुवात करणे, हे आमच्यासमोरील मुख्य लक्ष्य असेल’, असे साहा म्हणाला. अन्य कोणत्याही गोलंदाजांच्या तुलनेत रविचंद्रन अश्विन गोलंदाजी करत असताना यष्टीरक्षण करणे अधिक आव्हानात्मक असते, असे निरीक्षण त्याने एका प्रश्नाला उत्तर देताना नोंदवले.

‘अश्विनच्या गोलंदाजीत बरेच वैविध्य असते. शिवाय, टप्पे देखील वेगवेगळे असतात. जडेजा, कुलदीप यादव यांच्यापेक्षाही तो अधिक प्रयोग राबवत असतो. सुदैवाने मी आतापर्यंत खेळलेल्या 28 कसोटी सामन्यात त्याच्या गोलंदाजीवर बरेच यष्टीरक्षण केले आहे. अश्विन ज्यावेळी चेंडू हातातून सोडतो, त्यावेळी त्याच्या सूक्ष्म हालचाली पाहून चेंडूचा टप्पा कुठे असेल व तो किती उसळेल, याचा अंदाज मी बांधत असतो. चेंडूला फिरकी दिली असताना तो पकडणे आणखी आव्हानात्मक असते, त्याचाही अनेकदा अनुभव घेतला आहे’, असे साहा स्पष्टीकरणार्थ म्हणाला.

मध्यमगती गोलंदाजीच्या आघाडीवर, इशांत शर्मा व मोहम्मद शमी यांच्या गोलंदाजीसमोर यष्टीरक्षण करणे, कोणत्याही भारतीय यष्टीरक्षकासाठी आव्हानात्मकच असते, असेही साहाने यावेळी सांगितले. ‘मध्यमगती गोलंदाजांचा बाहेर जाणारा चेंडू थोपवणे खूपच कठीण असते. त्यात इशांत व शमीचे असे बरेच चेंडू असतात. पण, त्या तुलनेत उमेश यादव व भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर असे फारसे होत नाही’, असे त्याने पुढे नमूद केले. भारतीय संघ या कसोटीत 3 फिरकीपटू खेळवणार का, या प्रश्नावर खेळपट्टीचे स्वरुप पाहिल्यानंतरच संघव्यवस्थापन याबाबत निर्णय घेईल, असे त्याने उत्तर दिले.

भारतीय फलंदाजांचा रिव्हर्स स्वीप, शॉर्ट बॉल्सच्या सरावावर भर

पहिल्या कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल व कर्णधार विराट कोहली यांनी सोमवारी आयोजित पहिल्या सराव सत्रात प्रामुख्याने फिरकी गोलंदाजीसाठी रिव्हर्स स्वीप व मध्यम-जलद गोलंदाजीसाठी आखूड टप्प्यावरील चेंडूंचा प्रामुख्याने सराव केला. रहाणेने सर्वाधिक अर्धा तास कसून सराव केला. संघाच्या साहायक पथकातील सदस्यांनी ‘थ्रो-डाऊन’ केल्यानंतर या खेळाडूंनी सराव केला.

सोमवारी भारतीय फलंदाजांनी प्रामुख्याने ‘व्ही’मध्ये खेळण्यावर भर दिला व नंतर रिव्हर्स स्वीपचे फटकेही घोटवले. रविचंद्रन अश्विन व कुलदीप यादव यांनी रहाणेसमोर गोलंदाजीचा सराव करताना अनेक नवनवे प्रयोग राबवले. कोलकात्यात दाखल झाल्यानंतर काही तासातच मैदानावर दाखल झालेल्या विराटने देखील येथे अडीच तास हजेरी लावली. प्रारंभी स्ट्रेचिंग केल्यानंतर त्याने एका पायाने उडी मारण्याचा सराव केला. नंतर प्रत्यक्ष फलंदाजीचा सराव करताना शॉर्ट पिच चेंडूंवर आपले फटके अधिक घोटवले.

गुजरातविरुद्ध सौराष्ट्रतर्फे रविवारपर्यंत चाललेला रणजी सामना खेळलेल्या चेतेश्वर पुजारा व रवींद्र जडेजा यांनी या सराव सत्रातून विश्रांती घेणे पसंत केले. 3 वर्षांपूर्वी, याच मैदानावर 264 धावांचा वनडे विश्वविक्रम रचणाऱया रोहित शर्माने येथील खेळपट्टीची पाहणी केली. अगदी रहाणे व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही स्वतंत्रपणे खेळपट्टी तपासली.

भारतीय संघ या मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेच्या तब्बल 2 महिन्यांच्या दौऱयावर जाणार असून तेथे प्रामुख्याने ही बाब अधिक महत्त्वाची ठरु शकते. भारत-द. आफ्रिका यांच्यात त्यावेळी 3 कसोटी, 6 वनडे व 3 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत.

अँजिलो मॅथ्यूज कसोटीत गोलंदाजी करण्याची शक्यता अंधूक

भारताविरुद्ध 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी अँजिलो मॅथ्यूज संघात दाखल झाल्याने लंकेचे मनोबल उंचावले असले तरी यजमान बोर्ड अध्यक्षीय इलेव्हनविरुद्ध दोन दिवसीय सराव सामन्यात त्याने केवळ 5 षटकेच गोलंदाजी केली असून 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतही तो गोलंदाजी करण्याची शक्यता कमी आहे. लंकेचे गोलंदाजी प्रशिक्षक रुमेश रत्नानायके यांनी मॅथ्यूज येथे फक्त फलंदाज या नात्याने संघात असू शकतो, असे संकेत याप्रसंगी दिले.

‘कसोटी क्रिकेटमध्ये प्रदीर्घ कालावधीपासून मॅथ्यूजने गोलंदाजी केलेली नाही. येथेही तो गोलंदाजी करेल, असे मला वाटत नाही. आम्ही त्याच्याकडे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील गोलंदाज या नात्याने पाहतो आणि वनडे क्रिकेटमध्येच आम्ही त्याच्याकडून गोलंदाजी करवून घेऊ’, असेही रत्नानायके यांनी स्पष्ट केले.

लंकन गोलंदाजांना त्यांच्या भूमीत सातत्याने संततधार झाल्याने भारताला रवाना होण्यापूर्वी फारसा सराव करता आला नव्हता. पण, येथे दाखल झाल्यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी एसजी चेंडूवर सरावाला सुरुवात केली. इडन गार्डन्सची खेळपट्टी मध्यम-जलद गोलंदाजीला पोषक असल्याने आपले गोलंदाज येथे भरीव प्रदर्शन साकारु शकतील, असा विश्वास रत्नानायके यांनी यावेळी व्यक्त केला.

Related posts: