|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » क्रिडा » पेस-राजाचे पहिले जेतेपद

पेस-राजाचे पहिले जेतेपद 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लियांडर पेस व पुरव राजा यांनी एकत्र खेळताना पहिले जेतेपद मिळविले असून त्यांनी नॉक्सव्हिले चॅलेंजर स्पर्धेत दुहेरीचे अजिंक्मयपद पटकावले.

अग्रमानांक मिळालेल्या पेस-राजा यांनी जेम्स सेरेटानी व जॉन पॅट्रिक स्मिथ या अमेरिकन-ऑस्ट्रेलियन जोडीचा संघर्षमय लढतीत 7-6 (7-4), 7-6 (7-4) असा पराभव केला. गेल्या ऑगस्टमध्ये एकत्र आल्यानंतर पेस-राजा यांनी मिळविलेले हे पहिलेच जेतेपद आहे. पेससाठी मात्र या मोसमातील हे चौथे चॅलेंजर जेतेपद आहे. याआधी त्याने लेऑन व इल्कली येथील चॅलेंजर स्पर्धा कॅनडाच्या आदिल शमसदिनसमवेत तर तालाहासी ट्रॉफी स्पर्धेत अमेरिकेच्या स्कॉट लिपस्कीसमवेत जेतेपद मिळविले आहे. पेसने या मोसमात अनेकदा 250 दर्जाच्या एटीपी स्पर्धांत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारलेली आहे. अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर मात्र त्याने यावषी एकही स्पर्धा गमविलेली नाही.

पेसचा जोडीदार होण्यापूर्वी राजाने दिविज शरणसमवेत बोरडॉ चॅलेंजर स्पर्धा जिंकली होती आणि चेन्नई ओपन एटीपी 250 स्पर्धेत त्याने दिविजसमवेत अंतिम फेरी गाठली होती. ‘पेसशी जोडी जमवून थोडाच काळ झाला असला तरी आतापर्यंत मी त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकलो आहे. त्याच्यासमवेत खेळणे आनंददायक अनुभव असून आमच्या कामगिरीत सुधारणा होण्यासाठी खास पद्धतीवर कठोर परिश्रम घेत आहोत. त्याचे निश्चितच चांगले परिणाम दिसतील, अशी मला आशा वाटते,’ असे राजा म्हणाला. गेल्या साडेतीन महिन्यांत दोघांनी एकत्र खेळलेली अमेरिकन ओपनसह ही आठवी स्पर्धा होती. काहीवेळा आम्हाला कठोर निकालांना सामोरे जावे लागले तर काही अपेक्षित निकालही मिळाले, असेही राजा म्हणाला.

Related posts: