|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » भाजपाचा लबाडपणाला जनता माफ करणार नाही

भाजपाचा लबाडपणाला जनता माफ करणार नाही 

प्रतिनिधी / महाबळेश्वर

केंद्र व राज्यात सत्ता परिवर्तन होऊन तीन वर्षे लोटली. या काळात केंद्र- राज्यातील भाजपाचे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले असून या सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व्यापक जनआंदोलन छेडणार आहे. या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी, नेत्यांची एक बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात आली असून या बैठकीत आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

  सातारा येथे खासदार शरदचंद्र पवार यांच्या संसदीय कार्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे आले होते. त्यावेळी महाबळेश्वर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या भूमित स्व. वसंतदादा पाटील यांचे पुण्यस्मरण व त्याच दिवशी खासदार पवार यांचा गौरव समारंभ होत आहे. हा विलक्षण योगायोग आहे. देशाच्या राजकारणावर वेगळ्या कार्यशैलीचा ठसा उमटविणारे खासदार पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला मिळाली, याचा मला सार्थ अभिमान आहे. तसेच केंद्र-राज्यात सत्ता परिवर्तन झाले. याला तीन वर्षाचा काळ लोटला असून या काळात भाजपा सरकारने शेतकरी विरोधी धोरण राबवून कर्ज माफीच्या नावाखाली 89 लाख शेतकरी बांधवांची क्रुर थट्टा केली आहे. त्याबरोबर प्रामाणिक कर्जमाफी अशी केली याची जाहिरात सरकारकडून केली जात आहे. एकीकडे शेती मालाला आधारभूत किंमत मिळत नाही, त्यामुळे शेतकरी विवंचनेत आहे, तर दुसरीकडे करोडो रूपयांची उधळपट्टी करून सरकार ‘मी लाभार्थी’ अशा आशेयाच्या खोटय़ा व फसव्या जाहिराती दाखवून सरकार जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.

   मोठय़ा प्रमाणावर परकीय चलन मिळेल, रोजगार मिळेल असे सांगून केंद्र सरकारने ‘मेक इन इंडिया’ ही योजना सुरू केली. या योजनेमुळे किती लोकांना रोजगार मिळाला, हा संशोधनाचा भाग आहे. उलट नोटाबंदी करून सामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला. सरकारच्या या निर्णयाने लोकांमध्ये  नाराजी पसरली आहे. ही नाराजी कमी करण्यासाठी तसेच राज्यात जी प्रतिमा मलिन झाली आहे ती सुधारण्यासाठी भाजपा सरकारने ‘मी लाभार्थी, होय हे माझं सरकार’ अशा फसव्या जाहिरातींचा मारा जनतेवर करण्यास सुरूवात केली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था पार ढासळली आहे, हे सांगलीतील अनिकेत कोथळे या खून प्रकरणावरून सिध्द झाले आहे. 3 वर्षांच्या बालिके पासून ते 60 वर्षांच्या वृध्दांपर्यंत या राज्यात कोणीही सुरक्षित राहीले नाही. राज्यात विनयभंग व बलात्काराच्या घटना सातत्याने घडत आहेत. हे सरकारचं अपयशच म्हणावे लागले. अशा वेळी सरकारमधील शिवसेना व भाजपा हे दोन्ही पक्ष परस्परांवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. या दोन्ही पक्षात मोठय़ा प्रमाणावर मतभेद आहेत. राज्यातील जनतेला हे सराकार बिन पैशाचा तमाशा दाखवित आहेत. यापेक्षा अधिक लोकशाहीचे धिंडवडे निघू नयेत म्हणून राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने खासदार पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात या सरकार विरोधात व्यापक जन आंदोलन सुरू करणार आहे. या आंदोनाची दिशा उदयाच्या बैठकीत निश्चित केली जाईल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी उपनगराध्यक्ष अफजल सुतार राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय वाडकर, विशाल तोष्णीवाल, रोहीत ढेबे, शरद बावळेकर, संदीप मोरे आदी उपस्थित होते. 

विधानसभा निवडणुकीत समविचारी पक्षासोबत आघाडी  

चौकट : रायगड येथे झालेल्या शिबिरात आगामी विधानसभा निवडणुकीत समविचारी पक्षा बरोबर आघाडी करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. या आघाडीत जर शिवसेना सामील होवू इच्छित असेल, तर त्यांना प्रथम हिंदुत्ववादी विचार सरणी बाबत पूर्नविचार करावा लागेल, तरच शिवसेनेबरोबर आघाडी होईल, अन्यथा शिवसेने बरोबर आमची आघाडी होणार नाही, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.  

  तसेच नारायण राणे यांचा मंत्री मंडळात समावेश झाला, तर शिवसेना बाहेर पडेल असे त्यांनी पूर्वी जाहीर केले होते. परंतु, आता शिवसेनेच्या धोरणात बदल झालेला दिसत आहे. त्यामुळे राणे मंत्रिमंडळात आले तरी शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही. त्यामुळे शिवसेना बाहेर पडल्याने भाजपा सरकारला राष्ट्रवादीने पाठींबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राष्ट्रवादीने आपली भूमिक यापूर्वीच स्पष्ट केली  आहे.

   राजकीय वळण देऊन हेडलाईन तयार

चौकट  :  पवार साहेब व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट ही कौटुंबीक स्वरूपाची होती, एवढेच आम्हाला पवार साहेबांनी सांगितले आहे. तसेच पवार यांना कोणीही भेटले की, माध्यमे त्याला राजकीय वळण देऊन हेडलाईन तयार करतात, ही भेट यातीलच एक प्रकार आहे, असे सांगितले.

   चौकट  :  निवडणुकीच्या तोंडावर आघाडीतून जी मंडळी तिकीटासाठी भाजपामध्ये गेली त्यातील काही मंडळी निवडून आली, हे जरी खरे असले तरी त्यांना आजही त्या पक्षात हवी तशी किंमत मिळत नाही. अशा अनेक आमदारांना भाजपामध्ये गेल्याचा पश्चाताप होत आहे, योग्य वेळी ही सर्व मंडळी पुन्हा स्वगृही परत येतील, असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

Related posts: