|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गैर व्यवहारामुळे काही बँकांची परिस्थिती गंभीर

गैर व्यवहारामुळे काही बँकांची परिस्थिती गंभीर 

प्रतिनिधी/ मडगाव

सहकार क्षेत्र सद्या धोकादायक बनले आहे. गैर व्यवहारामुळे राज्यातील काही बँकांची परिस्थिती गंभीर बनल्याचे उद्गार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल बाणावली येथे बोलताना काढले. शिरोडा अर्बंन को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या 15व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

शिरोडा अर्बंन संदर्भात अद्याप काही प्रतिकुल असे काही ऐकू आलेले नाही व भविष्यात तसे काही होणार नाही याची दक्षता घेण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी देतानाच, शिरोडा अर्बंनच्या 15व्या शाखेचे उद्घाटन होत असल्याने शुभेच्छा दिल्या. बऱयाच अर्बंन बँकांनी संचालक मंडळ आपल्याच नातेवाईकांना तसेच स्वताच मोठय़ा रकमेचे कर्ज घेतात व कर्जाची परत फेड व्यवस्थित करत नसल्याने गंभीर समस्या निर्माण होत असल्याचे मुख्यमंत्री श्री. पर्रीकर यावेळी म्हणाले.

गोवा राज्य सहकारी बँक तसेच मडगाव अर्बंन व म्हापसा अर्बंन या बँकांची परिस्थिती नाजूक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सद्या राज्य सहकारी बँकेचा विषय हातात घेतला असून बँकेला सावरण्यासाठी काही उपाय योजना हाती घेतल्याची माहिती दिली. बँकांनी व अर्बंन पत संस्थांनी विवेकपूर्ण धोरण आत्मसात न केल्याने अडचणी निर्माण झाल्याचे मुख्यमंत्री या प्रसंगी म्हणाले.

कर्ज वितरित करताना ते ठराविक लोकांनाच न देता सर्वांना ते उलपब्ध होईल याची दक्षता घ्यावी तसेच लघू कर्ज वितरित करण्यावर भर द्यावा असे सूचित केले. शिरोडा अर्बंनला बाणावली आपला व्यवहार करण्याची चांगली संधी आहे. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

शिरोडा अर्बंनने उत्तर गोव्यात ही जावे

शिरोडा अर्बंनची स्थापना जरी शिरोडय़ात झाली तरी आज 15 शाखांच्या माध्यमातून तिचा विस्तार झालेला आहे. शिरोडा अर्बंन बाणावलीत पोहचल्याने नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी आनंद व्यक्त करतानाच, शिरोडा अर्बंनने आत्ता उत्तर गोव्यात जावे व सहकार क्षेत्रात योगदान द्यावे असे आवाहन केले.

कर्ज देताना संचालक मंडळाने खबरदारी घ्यावी स्वताच्याच लोकांना कर्ज देण्याऐवजी ते सर्व सामान्याना मिळेल अशी व्यवस्था करावी व भ्रष्टाचार मुक्त सेवा द्यावी. तसेच कर्ज मंजूरीसाठी कुणाची भेट घेण्याची पाळी, कर्जदारावर येऊ नये याची दक्षता घेण्याचा सल्ला दिला.

यावेळी व्यासपीठावर शिरोडा अर्बंनचे चेअरमन अकबर मुल्ला, आमदार तथा शिरोडा अर्बंनचे संचालक सुभाष शिरोडकर, जिल्हा पंचायत सदस्य मारिया रिबेलो, बाणावलीच्या सरपंच डियेला फर्नांडिस, उपसरपंच मिनिनो फर्नांडिस तसेच शिरोडा अर्बंनचे उपाध्यक्ष एस. बी. नाईक, संचालक उमेश शिरोडकर, उमेश नाईक, नारायण कामत, तेलीस आंताव व सरव्यवस्थापक व्ही. आर. चोडणकर उपस्थित होते.

सुरवातीला चेअरमन अकबर मुल्ला यांनी सर्वाचे स्वागत करताना, शिरोडा अर्बनच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा घेतला. शिरोडा अर्बंन तर्फे गरजूवंतना सहजरित्या कर्ज उपलब्ध केले जात असल्याची माहिती दिली. कर्जासाठी अर्ज केल्यानंतर कुणालाही भेटावे लागत नाही ही शिरोडा अर्बंनची खासियत असल्याचे सांगितले. बाणावलीतील जनतेने शिरोडा अर्बंनला सहकार्य करावे असे आवाहन देखील केले.

यावेळी सुभाष शिरोडकर व माजी आमदार बेंजामिन सिल्वा यांनी आपले विचार मांडले. शेवटी बाणावली शाखेच्या व्यवस्थापक व शिरोडा अर्बंनच्या कायदेशीर सल्लागार ऍड. सुनीता देसाई यांनी आभार मानले.

Related posts: