|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » घरी जा, 24 तासात अभ्यास करून या!

घरी जा, 24 तासात अभ्यास करून या! 

महाराष्ट्राच्या साक्षीदाराला म्हादई जलतंटा लवादाचा आदेश

प्रतिनिधी/ पणजी

दीर्घ काळाच्या सुट्टीनंतर नवी दिल्ली येथे काल सोमवारी म्हादई जलतंटा लवादाची सुनावणी सुरु झाली. महाराष्ट्राच्या साक्षीदाराला कर्नाटकाच्या धरणांची सविस्तर माहिती आहे, पण खुद्द विर्डी धरणाची काहीच माहिती नसल्याने पहिल्याच दिवशी त्या साक्षीदारावर नामुश्कीची पाळी आली. लवादाने सुनावणी अर्ध्यावर तहकूब करून महाराष्ट्राचे साक्षीदार एस. एन. हुद्दार यांना घरी जा, 24 तासात अभ्यास करून या आणि साक्षीदाराच्या कक्षात उभे राहण्यास सांगितले.

कर्नाटकातील कळसा भंडूरा धरण प्रकल्पाला पाणी किती मिळणार, त्या परिसरात पावसाचे प्रभाग किती आहेत, जादा पाणी असल्यामुळे ते कशाप्रकारे वळवणे आवश्यक आहे, याची पूर्ण माहिती महाराष्ट्राचे साक्षीदार एस. एन. हुद्दार यांच्याकडे होती. साक्षीदाराच्या कक्षात उभे राहिल्यावर त्यांनी कर्नाटकाची बाजू उचलून धरायला सुरुवात केली. पाणी वळण्याबाबत त्यांनी कर्नाटकच्या भूमिकेचे समर्थन केले.

कर्नाटक हलतराच मलप्रभेकडे वळवित आहे

महाराष्ट्राच्या साक्षीदाराला कर्नाटकाच्या प्रकल्पाची किती माहिती आहे, हे आपल्याला आता जाणून घेणे आवश्यक वाटत नाही. पण विर्डी धरणासंबंधी त्यांनी तयार केलेल्या अहवालावर प्रश्न विचारण्याची अनुमती द्यावी, अशी विनंती भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल व गोव्याचे वकील आत्माराम नाडकर्णी यांनी लवादाकडे केली. महाराष्ट्राचे धरण हे घाटावरून येणाऱया हलतरा नाल्यावर आहे. हा नाला सदर धरणाला पाणी पुरवणार आहे. कर्नाटक हलतरा नालाच वळवून मलप्रभा नदीला जोडत असल्याचे माहित आहे का, अशी विचारणा नाडकर्णी यांनी केली.

साक्षीदाराने लावले पालूपद

विर्डी धरण पूर्णपणे हलतरा नाल्यावर अवलंबून नसून या धरणाच्या परिसरात पडणाऱया पावसावर असल्याचे उत्तर महाराष्ट्राचे साक्षीदार हुद्दार यांनी दिले. हलतरा नाल्यावर धरण बांधून ते पाणी कर्नाटक वळवू पाहत आहे. याची कल्पना सदर साक्षीदाराला व महाराष्ट्र सरकारला आहे का? अशी विचारणा गोव्याच्यावतीने पुन्हा करण्यात आली. तरीपण हलतरा नाल्यावरच विर्डी धरण विसंबून नाही, असे पालुपद सदर साक्षीदाराने चालूच ठेवले.

महाराष्ट्राच्या साक्षीदाराचा उडाला गोंधळ

या धरणाच्या परिसरात किती पाऊस पडतो व किती पाणी या धरणाला मिळणार आहे. याचा तपशील या साक्षीदाराला विचारण्यात आला तेव्हा उत्तर देताना लवादासमोर गोंधळ सुरू झाला. नीट तपशील नसल्याचे या साक्षीदाराने मान्य केले. काही वर्षे गाळून आपण मधला काही निवडक वर्षातील पावसाच्या प्रमाणाचा अभ्यास करून अहवाल तयार केल्याचे मान्य केले.

अहवाल तयार केला कोणी

अहवालात काही वर्षे गाळल्याचे त्यांनी मान्य केले तेव्हा हीच वर्षे का गाळली? याचे उत्तर देताना आपण अनभिज्ञ असल्याचे त्यांनी दाखवले. हा अहवाल याच साक्षीदाराने तयार केला आहे की कोणी दुसऱयाने? अशी शंका उपस्थित करून ज्या प्रमाणे कर्नाटकच्या साक्षीदाराला तयार अहवाल देण्यात येत होता तसाच हा ही प्रकार असल्याचा आरोप ऍड. नाडकर्णी यांनी केला.

गांजे येथील पाऊस मोजणी केंद्रात 2005 मध्ये नोंद झालेल्या पावसाच्या प्रमाणाची दखल घेण्यात आली नसल्याचे ऍड. नाडकर्णी यांनी लवादाच्या निदर्शनास आणून दिले. विर्डी धरणाला पाणी पुरवठा किती प्रमाणात होणार आहे? हे पाणी कुठल्या पावसाचे असेल याची माहिती सदर साक्षीदाराला देता आली नाही.

कर्नाटकाने आपला अहवाल तयार करताना सीडब्लूसी अहवालाची जशाच्या तशी नक्कल केल्याचा आरोप गोव्याच्या वतीने करण्यात आला. गांजे रेन स्टेशन का गोठवले गेले त्याचे कारण शेवटपर्यंत सदर साक्षीदाराने दिले नाही. अभ्यास करण्यासाठी लवादाने या साक्षीदाराला घरी पाठवले. उर्वरित उलटतपासणी झाली नाही. आज मंगळवारी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला.

Related posts: