|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » केपीएमई विधेयकाच्या निषेधार्थ डॉक्टरांचा एल्गार

केपीएमई विधेयकाच्या निषेधार्थ डॉक्टरांचा एल्गार 

प्रतिनिधी / बेळगाव

केपीएमई विधेयकाच्या निषेधार्थ राज्यभरातील खासगी सेवा बजाविणाऱया डॉक्टरांनी दि. 13 नोव्हेंबर रोजी सुवर्णसौध येथे ठाण मांडले. दरम्यान आयएमए व सरकार यांच्यात झालेल्या चर्चेतून कोणतीच फलनिष्पत्ती पुढे आली नाही. त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ आयएमएने दि. 14 नोव्हेंबरपासून साखळी उपोषण सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तथापि सरकारने आयएमएच्या पदाधिकाऱयांशी चर्चा करताना तुमच्या पेशावर गदा आणण्याचा सरकारचा हेतू नाही. त्यामुळे विधेयक मांडण्यापूर्वी पुन्हा एकदा फेरविचार करू, अशी ग्वाही दिली.

सुवर्णसौधजवळ उभारलेल्या भव्य मंडपात डॉक्टर एकत्र आले. या सभेला माजी मुख्यमंत्री व जनता दलाचे नेते कुमारस्वामी, विधानपरिषद सदस्य बसवराज होरट्टी, विरोधी पक्षनेते जगदीश शेट्टर, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते के. एस. ईश्वरप्पा यांनी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी सकाळी झालेल्या सभेत आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर, सचिव डॉ. आर. एन. टंडन, आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. राजशेखर बळ्ळारी, डॉ. नागेंद्र स्वामी, डॉ. मल्लेश हुलमनी, डॉ. अलेक्झांडर थॉमस, डॉ. अजयकुमार, डॉ. सुरगावी यांच्यासह अनेक डॉक्टरांनी आपली मते व्यक्त केली.

प्रारंभी आयएमए बेळगावच्या अध्यक्षा डॉ. सुचित्रा लाटकर यांनी आयएमएची शपथ सांगितली. उपस्थित डॉक्टरांनी तिचा पुनरुच्चार केला. यावेळी आयएमए लिगल सेलचे चेअरमन डॉ. योगानंद रेड्डी म्हणाले, हा लढा सरकार किंवा मंत्र्यांच्या विरोधात नाही तर आमच्या अस्तित्त्वासाठी, लोकांच्या आरोग्यासाठी आहे. डॉक्टराने रुग्णालाच संशयाने पहावे, अशी परिस्थिती सरकारने आणली आहे. त्यामुळे या विधेयकाला आमचा विरोध राहिल.

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळले नाही

डॉ. मल्लेश हुलमनी यांनी सरकारने हे विधेयक लादण्याचा अट्टाहास केल्यापासून पाचवेळा आपण सरकारशी बैठका केल्या. सरकारने दोनवेळा चर्चेला बोलविले. परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे ‘बेंगळूर चलो’ कार्यक्रम झाला. मुख्यमंत्र्यांनी याबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले. पण ते पाळले नाही. त्यामुळे लढा अपरिहार्य असल्याचे सांगितले.

डॉ. नागेंद्र स्वामी यांनी सरकार निवडणुकीवर डोळा ठेवून हे विधेयक आणत आहे. परंतु आम्ही मतदार नाही असे सरकारला वाटत आहे. आम्ही आमचे कुटुंबीय आणि आमचा स्टाफ यांच्या मताचा सरकारने विचार करावा, व पुढील निवडणुकीची तयारी करावी, असा इशारा दिला. डॉ. मदन गायकवाड यांनी आम्ही खलनायक नाही, आमच्यामुळे 5 लाख जणांना रोजगार मिळत असून 25 लाख कुटुंबे उदरनिर्वाह करत आहेत. हे सरकारने लक्षात घ्यावे, असे सांगितले.

Related posts: