|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » डॉक्टरांच्या संपामुळे रूग्णांमध्ये नाराजी

डॉक्टरांच्या संपामुळे रूग्णांमध्ये नाराजी 

प्रतिनिधी / बेळगाव

केपीएमई ऍक्टच्या निषेधार्थ खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी संप पुकारला. परिणामी सोमवारी शहरातील वैद्यकीय सुविधा कोलमडली. डॉक्टरांच्या विरोधानंतरही खासगी रुग्णालय वैद्यकीय विधेयक अधिवेशनात संमत करण्याचा घाट सरकारने घातला आहे. संबंधित कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी सोमवारी डॉक्टरांनी सुवर्णसौधपुढे निदर्शने करत संप पुकारला. खासगी रुग्णालयांची सुविधा बंद असल्याने रुग्णांची गैरसोय झाली.

 रुग्णांना सरकारी इस्पितळांचा आधार घ्यावा लागला. किरकोळ आजरांसाठी देखील सरकारी रुग्णालयांत ताटकळत थांबावे लागले. शहरातील बहुसंख्य नागरिक खासगी वैद्यकीय सुविधांचा लाभ घेतात. एक दिवस वैद्यकीय सुविधा बंद करणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा प्रकार आहे. सरकारचे धोरण आणि खासगी डॉक्टरांची भूमिका यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा नाराजीचा सूर नागरिकांमधून व्यक्त करण्यात आला.

 शहरातील मोठय़ा हॉस्पिटलच्या आवारात शुकशुकाट होता. या संपाची माहिती नसणाऱया रुग्णांना वैद्यकीय सुविधांअभावी घरी परतावे लागले. सोमवारचा दिवस असल्याने परगावाहून वैद्यकीय सुविधांसाठी बेळगावात दाखल झालेल्या रुग्णांना संपाची माहिती नसल्याने जिल्हा रुग्णालयाचा आधार घ्यावा लागला.

सरकारी जिल्हा रुग्णालयात पहाटेपासून दुपारी 12 पर्यंत ओपीडीमध्ये 1810 रुग्णांची नोंद झाली होती. सोमवारी ओपीडीचा दिवस असल्याने रुग्णालयात नेहमीच गर्दी असते मात्र यावेळी संप असल्याने गर्दीत वाढ झाली आहे. सायंकाळपर्यंत ही संख्या 4 हजारपर्यंत जाण्याची शक्मयता येथील कर्मचाऱयांनी व्यक्त केली. अत्यवस्थ तसेच गंभीर जखमी असणाऱया रुग्णांना 108 रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिणामी संपामुळे येथील जिल्हा रुग्णालयावर कामाचा ताण वाढला असल्याचे चित्र पहायला मिळाले.

Related posts: