|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जयंत पाटील यांनी दिला एकीचा कानमंत्र

जयंत पाटील यांनी दिला एकीचा कानमंत्र 

पोलिसांना चकवा देत महाराष्ट्रातील नेते महामेळाव्यात दाखल

प्रतिनिधी / बेळगाव

सीमाप्रश्नाचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला असला तरी रस्त्यावरील लढाई महत्त्वाची आहे. हा संघर्ष सतत चालू ठेवण्यासाठी एकीने लढत राहण्याची गरज आहे. आपण अनेक लढाया जिंकलेल्या आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंडय़ाखाली एकसंध राहून समितीचे जास्तीत जास्त उमेदवार येत्या निवडणुकीत निवडून आणणे गरजेचे आहे. तरच सर्वोच्च न्यायालयात लोकेच्छा दाखविता येणार आहे. यासाठीच्या प्रत्येक कामात महाराष्ट्र तुमच्या पाठिशी राहिल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केले.

हजारो सीमावासीयांच्या जाज्वल्य मराठी अस्मितेचे दर्शनच  सोमवारी महामेळाव्यात घडले. यावेळी जयंत पाटील बोलत होते. काहीही होवो महाराष्ट्रातच जाणार हा वज्रनिर्धार महामेळाव्यात उपस्थित हजारो सीमावासीयांनी व्यक्त केला. बेळगावात अधिवेशन भरविणारे कर्नाटकी सरकार आणि कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध व्यक्त करीत महामेळाव्याने लोकशाही मार्गाने आंदोलनाची प्रथा पाळली. परवानगी नसताना, महाराष्ट्रातील नेतेमंडळींच्या उपस्थितीवर निर्बंध लादलेले असताना आणि शेवटपर्यंत दडपशाही सुरुच असताना सीमावासीयांनी महामेळावा यशस्वी केला. अबालवृद्ध, महिला, तरुण आणि जुन्याजाणत्या समिती नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या महामेळाव्याला कर्नाटक सरकारच्या निषेध अधिवेशनाचेच स्वरुप आले होते.

येथील व्हॅक्सीनडेपो मैदानावर हा मेळावा घेण्यात येणार होता. मात्र परवानगी नाकारण्यात आल्यामुळे व्हॅक्सीनडेपो मैदानाशेजारील रस्ता आणि गर्द वनराईचा आधार घेवून मंडप घालण्यात आला होता. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, चंदगडचे आमदार संध्यादेवी कुपेकर, कोल्हापूरचे माजी आमदार के. पी. पाटील आदींनी बंदी असतानाही वेगवेगळय़ा मार्गाने महामेळाव्याला उपस्थिती दर्शविली होती. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, निपाणी विभाग समितीचे जयराम मिरजकर, तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष निंगोजीराव हुद्दार, आमदार संभाजी पाटील, आमदार अरविंद पाटील, माजी आमदार दिंगबर पाटील, बिदर जिल्हा म. ए. समितीचे अध्यक्ष रामभाऊ राठोड आदी मान्यवर व्यासपीठावर होते.

नेत्यांवर बंदी घालण्याची भूमिका अत्यंत चुकीची

यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी कर्नाटकानेच येथील मराठी भाषिकांना दडपण्याचा उपद्व्याप चालविला आहे. पोलिसी बळाचा वापर करुन त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही लढाई न्यायालयात आहे, याचे भान न ठेवता रस्त्यावर आलेल्यांवर दंडुकेशाही केली जाते. महाराष्ट्राने अनेकदा लढय़ासाठी विधानसभेत ठराव मांडले आहेत. सीमावासीयांनी लढय़ाची श्रृंखला कधीच तुटू  दिलेली नाही. नेत्यांवर बंदी घालण्याची जिल्हाधिकाऱयांची भूमिका अत्यंत चुकीची आहे, असे विचार मांडले.

सीमाभागातील गावांची नावे आणि सक्तीच्या विळख्यात विद्रुपीकरणाचा जो खटाटोप चालू आहे तो थांबविण्याची गरज आहे. महाराष्ट्राकडून येथील मराठी संस्थांना अनुदान देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर उतरलेल्या भगिनींचे विशेष कौतुक आहे, असे ते म्हणाले.

महामेळाव्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे नगरीमध्ये सकाळी 10 पासूनच नागरिकांनी जमण्यास प्रारंभ केला होता. उपस्थितांना मंडपामध्ये बसून घेण्यात येत होते. प्रारंभी निवृत्त मुख्याध्यापिका प्रतिभा सडेकर यांनी सीमाप्रश्नाचा पोवाडा सादर केला. त्यानंतर महादेव कंग्राळकर यांनी महाराष्ट्रगीत, शिवाजी खांडेकर व जयराम देसाई यांनी पोवाडा, रवी पाटील यांनी सीमाप्रश्नाची कविता तर पियुष हावळ याने 62 वर्षांपासून दुर्लक्षित मी लाभार्थी ही विडंबनात्मक काव्यकृती सादर केली. बिदर विभाग समितीचे कार्यकर्ते रामराव चिटगिरे यांनी औराद आणि भालकी परिसरात सोसाव्या लागत असलेल्या अन्यायाची माहिती दिली.

सकाळी 10 पासून मेळाव्यास्थळी नागरिक गटागटाने येऊ लागले. भगवे ध्वज आणि पारंपरिक वस्त्रात दाखल होणारे महिला व युवकांचे समुह शामीयान्यात सहभागी होत होते. दुपारी 12.30 च्या सुमारास महाराष्ट्रातील नेते मंडळींचे आगमन होवू लागले होते. आडवळणी रस्त्यांचा वापर करुन पोलिसांना चकवा देत तसेच बराचसा प्रवास मोटारसायकलीवरुन करुन ही नेते मंडळी दाखल होत होती. दीपप्रज्वलन, शिवरायांच्या प्रतिमेस अभिवादन आणि पूजन करुन सीमामहामेळाव्यास प्रारंभ करण्यात आला.

घोषणांनी महामेळावा दणाणून सोडला

बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसहं संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे अशा घोषणांनी महामेळावा दणाणून निघाला होता. आयोजक मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इतर राज्यांना जो हक्क मिळाला तो आम्हालाही मिळावा या उद्देशाने हा लढा सुरु आहे. लोकशाहीच्या चौकटीत आपण लढत असताना अद्याप यश मिळाले नाही हे दुर्दैव आहे. कर्नाटकाने ज्या घटनेच्या अधिकारात आपले अधिवेशन भरविले. त्याच घटनेच्या अधिकारांतून महामेळावा भरवून आम्ही सीमावासीय महामेळावा घेत आहोत, असे ते म्हणाले. मात्र अतिशय कमी अवधीत आणि सध्या सुगीचे दिवस असतानाही सीमाप्रश्न महत्त्वाचा असे म्हणत महामेळाव्यास दाखल झालेल्या सीमावासीयांचे त्यांनी कौतुक केले.

माजी आमदार दिगंबर पाटील यांनी रस्त्यावरच्या लढाईत एकही मावळा कमी पडणार नाही, असे उद्गार काढले. सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी हा लढा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे. यामुळे महाराष्ट्राने एकत्रितपणे बाजू घ्यावी, असे उद्गार काढले. बिदर समितीचे अध्यक्ष रामराव राठोड यांनी तेथील अन्याय, अत्याचारांची माहिती देतानाच देशाच्या पंतप्रधानांना हा प्रश्न सोडवायला वेळ नाही, असे उद्गार काढले.

असे निर्णय माथेफिरुच घेवू शकतात…

सीमाभागातील आमदार संभाजी पाटील व अरविंद पाटील यांनी विधानसभेत आपण सीमाप्रश्नाच्या घोषणा देवून सभात्याग करुन आलो आहोत. सीमाप्रश्नासाठी नेहमीच कटिबद्ध राहू, असे उद्गार काढले. कोल्हापूरचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी बंदी घालण्यासारखे निर्णय माथेफिरुच घेवू शकतात, असे सांगताना कर्नाटकातील ही झुंडशाही मोडून काढण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. सर्वोच्च न्यायालयातील लढाईला महाराष्ट्र सरकार व दिल्लीतील नेतृत्त्वाच्या जोरावर प्रयत्नशील राहू. असे त्यांनी सांगितले. कर्नाटकाने बंदी घातली तरी मोटार सायकलवरुन आलोय. यापुढेही अखंड महाराष्ट्र तुमच्या सोबत राहिल, अशी माहिती त्यांनी दिली.

चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी बेळगावच्या प्रश्नावर आपले पती बाबासाहेब कुपेकर नेहमीच प्रामाणिक होते. आपल्याला ही संधी मिळाली असून सीमाप्रश्नासाठी कोणतीही किंमत मोजायची आपली तयारी आहे, असे सांगितले. येथे जे अन्याय, अत्याचार होत आहेत ते निषेधार्ह आहेत, असा उल्लेख त्यांनी केला.

संसदेत सीमाप्रश्नावर भांडेन-खासदार महाडिक

जगातील चांगली लोकशाही भारतात आहे. मात्र अशा लोकशाहीतच रात्री 2 वाजता अध्यादेश निघतात आणि नेत्यांवर बंदी घातली जाते. मात्र गल्लीबोळातून प्रवास करत ही बंदी झुगारुन उपस्थित होताना आपल्याला मोठा आनंद झाला आहे. हा एकाकी लढा नाही संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठिशी आहे. हे सांगण्यासाठी आलो आहे. हा प्रश्न संसदेत मोठय़ा आवाजात घुमविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ही जबाबदारी आपण पूर्णपणे निभावू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

या कर्नाटकात सक्तीची भाषा कशासाठी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  विविधतेत एकता असलेला आपला देश आहे. अशा देशात मराठीचा अवमान करुन कन्नडची सक्ती केली जाते. जेथे संसदेत आपल्या भाषेत बोलण्याचा अधिकार असताना कर्नाटकाची विधानसभा मराठी बोलण्यावर विरोध करते? याला काय म्हणावे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

बॉक्स करणे  त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे आहे

आपल्या भाषणात आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी तरुण भारतने प्रसिद्ध केलेल्या एका बातमीचा उल्लेख केला. कर्नाटकाने शिक्षक भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेत मराठी माध्यमाच्या उमेदवारांना कन्नडमधील प्रश्नपत्रिका देवून मोठा अन्याय केला आहे. या प्रकारे कन्नड सक्ती करणाऱया सरकारला त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.

बॉक्स करणे

…आणि किणेकर घसरले

महामेळाव्यात बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर पुन्हा एकदा घसरले होते. मान्यवर नेते मंडळी एकीची भाषा बोलत असताना किणेकर यांनी मात्र आपले नेहमीचे बेकीचे पालुपद लावून धरले होते. काही नेते मंडळींमुळे सीमाप्रश्न टिकून आहे, असा समज पसरविला जात आहे. मात्र तसे काही नसून बकऱयाप्रमाणे कुणाच्याही मागे धावू नका, असा सल्ला त्यांनी आपल्या भाषणात दिला. याबद्दल नाराजी व्यक्त झाली.

Related posts: