|Monday, July 16, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » लेप्टोचे थैमान कसे, कधी रोखणार?

लेप्टोचे थैमान कसे, कधी रोखणार? 

सिंधुदुर्ग हा देशात स्वच्छतेत नंबर एक म्हणून गौरविलेला जिल्हा आहे. त्यामुळे जनतेचे आरोग्यमानही चांगलेच असायला हवे. परंतु जिल्हय़ाच्या आरोग्याचे आता तीनतेरा वाजू लागले आहेत. लेप्टो आणि माकडतापाने जनतेला त्रस्त करून सोडले आहे. रत्नागिरी जिल्हय़ालाही लेप्टोचा अनेकवेळा सामना करावा लागला आहे,

 

चांगले आरोग्यमान, ही सिंधुदुर्गची ओळख. मात्र गत चार/पाच वर्षांच्या काळात जिल्हय़ाला लेप्टोस्पायरोसीस, माकडताप या आजारांनी ग्रासले आहे. लेप्टो व माकडतापावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा काम करीत आहे. परंतु तज्ञ डॉक्टरांची मोठी कमतरता आहे. सिंधुदुर्गचे सुपुत्र डॉ. दीपक सावंत आरोग्य मंत्री झाले, तरी आरोग्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ाला उपचारासाठी आजही गोवा, कोल्हापूरवरच अवलंबून राहावे लागत आहे. सिंधुदुर्ग हा देशात स्वच्छतेत नंबर एक म्हणून गौरविलेला जिल्हा आहे. त्यामुळे जनतेचे आरोग्यमानही चांगलेच असायला हवे. परंतु जिल्हय़ाच्या आरोग्याचे आता तीनतेरा वाजू लागले आहेत. लेप्टो आणि माकडतापाने जनतेला त्रस्त करून सोडले आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ाबरोबरच रत्नागिरी जिल्हय़ालाही लेप्टोचा अनेकवेळा सामना करावा लागला आहे, लागत आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हय़ात उद्भवणारी व काही बळी घेणारी तापसरीची साथ लेप्टोसदृश असल्याचा दावा तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱयांनी केला. त्यावर हा लेप्टो कसा नाही, हे सांगण्यावर तत्कालीन प्रशासनाने काही वर्षे काढली. त्यानंतर अनेक पथकांच्या माध्यमातून या तापाचे संशोधन करण्यासाठी उंदीर पकडणे, जनावरांच्या रक्त नमुन्यापासून ते मृत नातेवाईकांचे रक्त नमुने घेण्यापर्यंत कार्यवाही झाली. डेरवण, मणिपालहून आलेल्या टीमनीही या तापसरीचा अभ्यास करीत रक्त नमुने तपासले हेते. तरीही अशा तापाच्या रुग्णांवर जिल्हय़ातील शासकीय यंत्रणेकडे उपचारासाठी तज्ञ डॉक्टर उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. शासकीय रुग्णालयात अशा तापाने दाखल झालेल्या रुग्णांचे प्लेटलेट्स कमी होत असतील, तर तातडीने त्यांना गोवा किंवा कोल्हापूरला हलविण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा तालुक्याच्या ठिकाणाहून जिल्हा रुग्णालयात पाठवले जाते व तेथून पुढे गोवा असा प्रवास सुरू होतो. जिल्हय़ाच्या एकूण आरोग्य यंत्रणेच्या स्थितीचा विचार करता ताप आल्यास तातडीने दवाखान्यात उपचार घ्या, ही जागृती आता खूप झाली व लोकांना माहीतही झाली. मात्र ताप आल्यानंतरच्या उपचाराचे काय, याचे उत्तर सापडत नाही. या साऱयात सुधारणा होऊन योग्य उपचार व त्यासाठीची यंत्रणा आज तरी नाही हे सत्य आहे. त्यात सुधारणा व्हायला हवी.

सिंधुदुर्ग जिल्हय़ात लेप्टोची साथ उद्भवल्यानंतर 2010 मध्ये लेप्टोचे 87 रुग्ण सापडले आणि 25 जणांचा मृत्यू झाला. 2011 मध्ये 23 रुग्ण सापडले, चार जणांचा मृत्यू झाला. 2012 मध्ये पाच रुग्ण सापडले, त्यात पाचही जणांचा मृत्यू झाला. 2013 मध्ये एक रुग्ण सापडला, त्याचा मृत्यू झाला. सन 2014 व 2015 मध्ये एकही रुग्ण सापडला नाही. 2016 मध्ये एक रुग्ण सापडला, त्याचा मृत्यू झाला. जानेवारी 2017 पासून आतापर्यंत या वर्षात लेप्टोचे 39 रुग्ण सापडले, पैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. गेली तीन वर्षे लेप्टोवर नियंत्रण मिळवता आले होते. परंतु, यावर्षी पुन्हा एकदा लेप्टोने डोके वर काढले असून 28 गावे बाधित झाली आहेत. गेल्या सात वर्षांच्या काळात लेप्टोमुळे 39 जणांचे बळी गेले आहेत. एवढे होऊनही शासनकर्त्यांना मात्र जाग आलेली दिसत नाही. म्हणूनच तर सात वर्षे लेप्टोचा उद्रेक होऊनसुद्धा त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केलेली नाही.

सिंधुदुर्गात उद्भवलेल्या लेप्टोसदृश तापावर संशोधन करणे, तात्काळ निदान होऊन उपचार करता यावेत, यासाठी शासनाने सन 2012 मध्ये रेण्वीय निदान प्रयोगशाळा (मॅलीक्युलर डायग्नोस्टीक लेबोरेटरी) मंजूर केली. मात्र अनेक लोकांचे बळी गेले, तरी प्रयोगशाळा कार्यान्वित झालेली नाही. जिल्हय़ाच्या आरोग्य यंत्रणेला आजही पुणे व मणिपालच्या आरोग्य संस्थेवर अवलंबून राहावे लागत आहे. सिंधुदुर्गात प्रयोगशाळा सुरू झाली असती, तर लगतच्या रत्नागिरी, कोल्हापूर जिल्हय़ांनाही फायदा झाला असता.

लेप्टोबरोबर माकडतापानेही सिंधुदुर्गवासीय हैराण झाले आहेत. कर्नाटक, गोवामार्गे सिंधुदुर्ग असा माकडताप आला आहे. गेल्या तीन वर्षांत माकडतापानेही जिल्हय़ात 156 लोकांचे बळी गेले आहेत. लेप्टो व माकडतापावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्ययंत्रणा निश्चितपणे चांगले काम करीत आहे. घरोघरी जाऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करीत आहे. प्राथमिक स्तरावरील औषधोपचारही करीत आहे. परंतु, लेप्टोवर तातडीने उपचार होऊन रुग्ण बरे होण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे डॉक्टर काही मिळालेले नाहीत. त्यामुळे जिल्हय़ाची आरोग्य सेवा व्हेंटीलेटरवर आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. जिल्हय़ातील जनता ज्या आशेवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात धाव घेते, त्याच जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱयांची तब्बल 23 पदे रिक्त आहेत. उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्येही डॉक्टरांची 51 पदे रिक्त आहेत.
प्राथमिक आरोग्य केंदांमध्ये डॉक्टरांची 38 पदे रिक्त आहेत. तज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे आरोग्य सेवा कोलमडली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा स्वतंत्र होऊन 36 वर्षे झाली, तरी आजही जिल्हय़ातील जनतेला उपचारासाठी गोवा, कोल्हापूर पेंवा बेळगावलाच जावे लागत आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या कुडाळ पंचायत समितीच्या सदस्या संपदा पेडणेकर यांचा लेप्टोच्या तापाने मृत्यू झाला. याची दखल घेत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या तापसरीच्या रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली. परंतु, आता नुसती विचारपूस करून चालणार नाही, तर तज्ञ डॉक्टर सिंधुदुर्गात आणून जिल्हय़ातील रुग्णांना जिल्हय़ातच आरोग्य सेवा देण्यासाठी आमदारांना आवाज उठवावा लागणार आहे. अन्यथा लेप्टो किंवा माकडतापाने अनेक लोकांचे बळी जाऊन अनेक कुटुंबांचे संसार उघडय़ावर येणार आहेत.  सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले डॉ. दीपक सावंत युती सरकारमध्ये आरोग्यमंत्री झाले. त्यामुळे जिल्हय़ाची आरोग्य सेवा सुधारेल, तज्ञ डॉक्टर मिळतील अशी मोठी आशा होती. मात्र जिल्हय़ातील जनतेची आरोग्यमंत्र्यांकडून घोर निराशा झाली आहे. निदान यापुढे तरी जिल्हय़ाच्या जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी ठोस पावले उचलावीत व तज्ञ डॉक्टर आणून उत्तम आरोग्य सेवा द्यावी. म्हणजे लेप्टोच नाही तर माकडताप असो किंवा अन्य कुठलाही आजार असो. समर्थपणे त्याला तोंड देता येईल, हीच कोकणच्या जनतेकडून अपेक्षा आहे.

Related posts: