|Saturday, January 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मातृभक्त, निर्भीड विनोबा भावे

मातृभक्त, निर्भीड विनोबा भावे 

विनोबा भावे यांची आज पुण्यतिथी. विनोबा हे मला न उकललेले भव्य गूढ आहे. त्यांचे विविध भाषांवरचे प्रभुत्व, गीताई, गांधीजींनी त्यांना दिलेला शिष्यत्वाचा आणि पहिला सत्याग्रही होण्याचा मान, भूदान यज्ञ, आणि त्यांचे मृत्यूला धीटपणे
प्रायोपवेशनासह सामोरे जाणे, विविध विषयांवर आणि प्रश्नांवर व्यक्त केलेले अभ्यासपूर्ण आणि अचूक विचार. एकाच आयुष्यात माणूस किती गोष्टी करू शकतो. त्यांच्या उंचीकडे बघताना मान मोडून पडेल. 

लहानपणी शाळेच्या पेटी वाचनालयात वाचलेल्या त्यांच्या दोन मजेदार कथा मात्र माझ्यासारख्या सामान्य माणसाला पेलतील इतपत सोप्या आहेत.  

एकदा लहानगा विनू कोणाकडे तरी जेवायला गेला. पानात इतर पदार्थांबरोबर आणि भाज्यांबरोबर कारल्याची भाजी होती. विनूला ती भाजी आवडत नव्हती आणि आईची शिकवण अशी की पानात एकही पदार्थ उष्टा टाकायचा नाही. त्याने विचार केला की आपण ही अप्रिय भाजी आधी संपवू आणि मग पानातल्या इतर पदार्थांचा मनसोक्त समाचार घेऊ. त्याने घाईघाईने ती भाजी संपवली. पण त्यामुळे यजमानांचा गैरसमज झाला की विनूला कारल्याची भाजी खूप आवडते. कोणीतरी पुन्हा त्याला ती भाजी वाढली. संकोचामुळे तो नकार देऊ शकला नाही. त्या दिवशी इतर आवडते पदार्थ मनसोक्त खाता आले नाहीत. पण कारल्याच्या भाजीची चव तोंडात छान बसली आणि ती भाजी आवडू लागली.

दुसरी गोष्ट-उन्हाळय़ाचे दिवस होते. तरुण विनोबा ब्रिटिश लायब्ररीत वाचनासाठी जात. तिथे मनस्वी उकाडा असे. विनोबा एका कोपऱयात जागा पकडून वाचन करीत. उकाडा सहन न झाल्यामुळे कधी कधी सदरा काढून बसत. हे पाहून लायब्ररीचा गोरा संचालक विनोबांकडे आला आणि म्हणाला, ‘लायब्ररीमध्ये तुम्ही असे सदरा काढून वाचत बसणे असभ्यपणाचे लक्षण आहे.’ त्यावर तरुण विनोबा ताडकन उत्तरले, ‘…तर मग तुम्ही सातासमुद्रापलीकडून येऊन आमचा देश बळकावणे आणि राज्य करणे हे कोणत्या सभ्यतेत बसते?’  

विनोबांचा हा किस्सा कितपत खरा, ठाऊक नाही. पण त्यातून व्यक्त झालेला विनोबांचा निर्भीडपणा निःसंशय खरा आहे. गल्लीतल्या नगरसेवकाने एखादी अनुचित गोष्ट केली तर त्याला जाब विचारायला आपण घाबरतो. विनोबांच्या अंगी असलेले हे धैर्य या जन्मी नाही तर निदान पुढच्या जन्मी तरी आपल्याला लाभावे.

आजच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विनोबांना वंदन….

Related posts: