|Thursday, October 18, 2018
You are here: Home » क्रिडा » विद्यमानजेता भारत आशिया चषक स्पर्धेबाहेर

विद्यमानजेता भारत आशिया चषक स्पर्धेबाहेर 

वृत्तसंस्था/ लालंपूर

19 वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेत विद्यमानजेत्या भारतीय संघाला बांगलादेशकडून 8 गडय़ांनी पराभव स्वीकारावा लागला. दोनच दिवसापूर्वी भारताच्या युवा संघाला नेपाळने पराभवाचा धक्का दिला होता. सलग दोन पराभवामुळे भारतीय संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात भारताने प्रथम 32 षटकांत 8 बाद 187 धावा केल्या. यानंतर, विजयासाठीचे 188 धावांचे आव्हान बांगलादेशने 28 षटकांत दोन गडय़ांच्या मोबदल्यात पूर्ण करत धक्कादायक विजयाची नोंद केली. नाबाद 81 धावांची खेळी साकारणारा बांगलादेशचा पिनाक घोष सामन्याचा मानकरी ठरला.

प्रारंभी पावसाचा व्यत्यय आल्यानंतर हा सामना 32 षटकांचा खेळवण्यात आला. दोनच दिवसापूर्वी नेपाळविरुद्ध दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर बांगलादेशविरुद्ध लढतीतही भारतीय फलंदाजानी निराशाजनक कामगिरी नोंदवली. पहिल्या 10 षटकांतच भारताची 3 बाद 68 अशी बिकट स्थिती होती. यानंतर, मधल्या फळीतील फलंदाजानी निराशा केल्याने भारताला 32 षटकांत 8 बाद 187 धावा करता आल्या. सलमान खानने अखेरच्या काही षटकांत 38 चेंडूत 2 चौकारासह नाबाद 39 धावा फटकावल्याने भारताला दीडशेपार जाता आले. अनुज रावतने 34 धावांचे योगदान दिले. बांगलादेशतर्फे रुबेल हकने 3 तर नईम हसन व अलताफ होसेन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

प्रत्युतरादाखल खेळणाऱया बांगलादेश युवा संघाने विजयासाठीचे 188 धावांचे आव्हान 28 षटकांत 2 गडय़ांच्या मोबदल्यात पूर्ण करत शानदार विजय मिळवला. शिवाय, उपांत्य फेरीतील आपले स्थानही निश्चित केले. बांगलादेशतर्फे सलामीवीर पिनाक घोषने सर्वाधिक 77 चेंडूत 6 चौकार व 3 षटकारासह नाबाद 81 धावा फटकावत विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली. तोविद हर्दीने 32 चेंडूत नाबाद 48 धावांचे योगदान देत त्याला चांगली साथ दिली. सलग दोन पराभवामुळे भारतीय संघ या स्पर्धेबाहेर झाला आहे. अ गटातून नेपाळ व बांगलादेश तर ब गटातून पाकिस्तान व अफगाणिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

संक्षिप्त धावफलक : भारत 32 षटकांत 8 बाद 187 (हिमांशु राणा 15, अनुज रावत 34, सलमान खान नाबाद 39, रुबेल हक 3/43, नईम हसन 2/38).

 नेपाळ 28 षटकांत 2 बाद 191 (पिनाक घोष 77 चेंडूत नाबाद 81, मोहम्मद नईम 38, सैफ हसन 16, तोविद हर्दी नाबाद 48, मनदीप सिंग 2/36).

Related posts: