|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महापालिका मिरज कार्यालयात नगरसचिवांची झाडाझडती

महापालिका मिरज कार्यालयात नगरसचिवांची झाडाझडती 

प्रतिनिधी/ मिरज

महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयातील ढिसाळ कारभार मंगळवारी उघडकीस आला. आयुक्तांच्या आदेशानुसार नगरसचिव चंद्रकांत आडके यांनी दुपारी अचानक कार्यालयास भेट दिली असता, तब्बल 35 कर्मचारी कोणतेही कारण न देता गैरहजर होते. तर जे हजर होते, ते केवळ मस्टरवर सह्या करुन फिरतीवर गेले होते. कोणाचा कोणास पायपोस नव्हता. यामुळे संतप्त नगरसचिवांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱयांची झाडाझडती घेतली. गैरहजर असणाऱया कर्मचाऱयांना कारणे दाखवा नोंटीसा बजाविण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या मिरज कार्यालयात अधिकारी व कर्मचारी कधीही जागेवर नसतात, तसेच कर्मचाऱयांवर प्रशासनाचा अंकुश नसल्याने येथे मनमानी कारभार सुरु असल्याबाबत वारंवार तक्रारी होत्या. याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या आदेशानुसार नगरसचिव चंद्रकांत आडके यांनी अचानक मिरज कार्यालयास भेट देऊन तपासणी केली. त्यांना हजेरी मस्टर आणि   हालचाल रजिस्टर मध्ये तफावत असल्याचे दिसून आले. तब्बल 35 कर्मचारी गैरहजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामध्ये 23 कर्मचारी हे पाणीपुरवठा विभागातील तर 12 कर्मचारी अन्य विभागातील होते. यापैकी अनेकजण सकाळी हजेरी लावून फिरतीवर गेले होते. अनेकजणांनी हालचाल रजिस्टरमध्ये सांगली कार्यालयात जात असलेच नमूद केले होते मात्र ते, तेथेही गेले नव्हते आणि सायंकाळपर्यंत मिरजेतही परतले नाहीत. यामुळे मिरज कार्यालयातील भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते मोहन वाटवे यांनी याबाबत वारंवार आयुक्तांकडे तक्रार केली होती. मनपातील अनेक अधिकारी व कर्मचारी यांचे दररोज सांगलीत काय काम असते व दिवसभर सांगलीत जाऊन ते काय करतात, नक्की सांगलीत जातात का, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. तसेच हालचाल रजिस्टर प्रमाणे अधिकारी प्रत्यक्ष कधीही पाहणी करत नाहीत असेही सांगितले होते. त्यानुसार नगरसचिव आडके यांनी तपासणी केली असता त्यांनाही कार्यालयातील या भोंगळ कारभाराचा अनुभव आला.

मिरजेतील या अनागोंदी कारभाराबाबत आयुक्तांनी स्वत: लक्ष घालून योग्य ती उपाययोजना करावी व जनतेच्या कररूपाने मिळणाऱया पैशातून गलेलठ्ठ पगार घेऊन काम चुकारपणा करणाऱया कर्मचाऱयांवर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

Related posts: