|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ग्रामपंचायतच्या निधीतून वैयक्तिक कामाचा दिखावा

ग्रामपंचायतच्या निधीतून वैयक्तिक कामाचा दिखावा 

प्रतिनिधी/ आटपाडी

आटपाडीच्या वॉर्ड क्रमांक एक मधील ग्रामपंचायत सदस्याने शहरात वैयक्तिक खर्चातून सिमेंट बाकडे बसविल्याचे सांगुन लोकांची दिशाभुल केली आहे. प्रत्यक्षात त्याबाबतचा खर्च आटपाडी ग्रामपंचायतमधुन झाला आहे. हा प्रकार गंभीर असून विकासकामांचा खर्च ग्रामपंचायतचा आणि वैयक्तिक नावाचा गवगवा करणाऱया सदस्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी युवा नेते आबासाहेब नांगरे-पाटील यांनी केली आहे.

आटपाडीच्या वॉर्ड क्रमांक एकमध्ये झालेली कामे व त्याबाबतचा दावा पोकळ असून ग्रामपंचायतचा निधी खर्ची पडला असताना ही कामे स्वखर्चातून केल्याचे सदस्य दत्तात्रय पाटील यांनी भासविले आहे. त्याबाबत आक्षेप घेत युवा नेते आबासाहेब नांगरे-पाटील यांनी पंचायत समितीने व आटपाडी ग्रामपंचायतने या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. वॉर्ड क्रमांक एकसह शहरात अनेक भागात अनेक सिमेंटची बाकडी बसविण्यात आली आहेत.

त्यावर दत्तात्रय पाटील युवा मंचचे सौजन्य असून नमुद केले आहे. परंतू प्रत्यक्षात त्याचा खर्च ग्रामपंचायतने केला आहे. याबाबतची आम्ही माहिती घेतली असून नागरिकांची फसवणुक कशासाठी? असा सवाल आबासाहेब नांगरे यांनी केला. आटपाडी ग्रामपंचायतने सिमेंट बाकडय़ांसह वॉर्ड क्रमांक एकच्या सदस्यांनी केलेल्या सर्वच कामांची चौकशी करावी. शिवाय आटपाडी पंचायत समितीनेही या गंभीर प्रकारात तातडीने लक्ष घालुन ग्रामपंचायतच्या निधीच्या गैरवापराबाबत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही आबासाहेब नांगरे यांनी केली आहे.

आटपाडी वॉर्ड एकमध्ये अनेक कामे केल्याचा खोटा दावा आमच्या विरोधी सदस्याने केला आहे. हे पुर्णपणे चुकीचे असून विकासकामांबाबतचा हा दावा दिशाभुल करणारा असल्याने या परिसरातील सर्व कामांचा पंचनामा करून त्याबाबतच्या तक्रारी करणार असल्याचेही आबासाहेब नांगरे यांनी सांगितले. लोकांच्या प्रश्नांसाठी आम्ही आत्ता सक्रिय राजकारणात योगदान देणार असून लोकांच्या अडीअडचणी सोडवुन त्यांना दिलासा देण्यासाठी कायमस्वरूपी कटिबध्द राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून विकासकामांना मोठी गती मिळणार असून त्याबाबत नेत्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही आबासाहेब नांगरे म्हणाले.

Related posts: