|Monday, January 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » नोकरी जाण्याच्या निमित्ताने …

नोकरी जाण्याच्या निमित्ताने … 

इंग्रजतील When God closes one Door. He opens Another ही म्हण सध्याच्या विविध क्षेत्रातील उद्योग आणि कंपन्यांमध्ये विविध कारणांवरून नोकरी जाणाऱया व नोकरी गमवावी लागणाऱयांच्या संदर्भातही लागू होते हे वेळोवेळी प्रकर्षाने उजेडात येत आहे. असे होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अनेक कंपन्यांमधून विविध कारणांनी वा प्रसंगांनी नोकरीवरून कमी करण्यात आलेल्या वा कागदोपत्री ‘स्वेच्छा राजीनामा’ घेऊन संबंधित कर्मचाऱयाला सेवामुक्त करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात या कर्मचाऱयांना कंपनी वा कामावरून कमी करण्यात येत असते. ही बाब एक कटू वस्तुस्थिती आहे हे विसरून चालणार नाही.  कंपनी वा व्यवस्थापनाचा या संदर्भातील दृष्टिकोन म्हणजे वाढती व्यावसायिक स्पर्धा, व्यावसायिक अस्थिरता, कच्चा माल, वाहतूक इ. मुळे सतत वाढणारा उत्पादन-व्यवसाय खर्च, सरकारी धोरण, आर्थिक स्थिती, तंत्रज्ञानाचा होणारा सर्वांगीण विकास व यामुळे व्यावसायिक वाढते मशिनीकरण इ. मुळे कंपनी वा व्यवस्थापनाला आपल्या आर्थिक व्यावसायिक खर्चावर मर्यादा येतात व त्याचाच अपरिहार्य परिणाम व्यवस्थापनाला कर्मचाऱयांच्या संख्येला कात्री लावण्यावर म्हणजेच त्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागतो.

कंपनीमध्ये अनेक वर्षे काम केलेल्या, वेळोवेळी आपल्या क्षमता-कार्यक्षमतेचा परिचय देणाऱया, वैयक्तिक-सांसारिक संदर्भात जबाबदारी असणाऱया अनुभवी व मध्यवयीन-वयस्क कर्मचाऱयांना या आणि अशा कारणांवरून कमी करणे व मुख्य म्हणजे अशा प्रकारचा निर्णय कळविणे हे प्रत्येक व्यवस्थापक व व्यवस्थापन या उभयतांसाठी एक कठीण कर्म असते.. व्यवहार-भावना-संबंध इ. बहुविध मुद्दे या प्रक्रियेशी जुळलेले असतात. मुख्य म्हणजे हे सारे करताना संबंधित कर्मचाऱयांना व्यवस्थापनाचा निर्णय कशा प्रकारे सांगितला जातो ही बाबसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते.

व्यवस्थापन व वैयक्तिक या दोन्ही संदर्भात सांगायचे म्हणजे कुणा कर्मचाऱयाला कंपनीच्या सद्यस्थिती वा व्यावसायिक स्पर्धा परिस्थितीमुळे कुठल्याही कर्मचाऱयाला कामावरून काढणे, नोकरी सोडून जाण्यास सांगणे वा त्या पार्श्वभूमीवर त्यांचा राजीनामा घेणे या साऱयाच बाबी संबंधित व्यक्ती मग ती व्यवस्थापक असो अथवा सहकारी-कर्मचारी, या साऱयांसाठीच मोठी कष्टप्रद लाभदायक व भावनात्मकदृष्टय़ा कठीण अशी असते. एकीकडे सध्याच्या वा प्राप्त परिस्थितीत कंपनी वा व्यवस्थापनाची व्यावसायिक, व्यावहारिक अडचणी लक्षात घेऊन त्यासाठी आर्थिक संदर्भात आवश्यक बाब म्हणून कर्मचाऱयांच्या संख्येवर मर्यादा आलेल्या असतात तर दुसरीकडे या साऱया धोरणात्मक निर्णयाचा परिणाम आपल्याच काही कर्मचाऱयांच्या रोजगारावर थेट गदा येण्यावरच होत असल्याने याकामी खूपच संवेदनशीलता बाळगावी लागणे आवश्यक ठरते हे महत्त्वाचे. जेव्हा केव्हा व्यावसायिक वा आर्थिक संदर्भात कंपनी वा औद्योगिक पातळीवर आव्हानपर वा संकटसदृश स्थिती उत्पन्न होते तेव्हा कर्मचाऱयांची नव्याने भरती थांबविणे अथवा आहे त्या कर्मचाऱयांच्या संख्येत लक्षणीय स्वरुपात घट वा कपात करण्याचे निर्णय तडकाफडकी घेऊन त्याची लगोलग अंमलबजावणी करण्यात येते हा इतिहास तसा ताजाच आहे.

युरोप अमेरिकेत सुमारे 20 वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या व्यापक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत प्रथम मोठय़ा प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आली व नंतर तसा पायंडाच पडला. नंतरच त्याचेच अनुकरण बहुसंख्य संगणक सेवा कंपन्या व कथित बहुराष्ट्रीय व्यवस्थापनांनी केल्याचे दिसते. परिणामी साधारणतः काही वर्षाच्या मुदतीनंतर हजारो कर्मचाऱयांना अचानक व आकस्मिकपणे आपल्या नोकरी रोजगाराला मुकावे लागले.  पाश्चिमात्य देश आणि युरोपियन व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीची सुरुवात झाल्यामुळे या व्यावसायिक निर्णयाला वा त्याच्या अंमलबजावणीमध्ये कर्मचाऱयांशी संबंधित मानवीय पैलुंकडे सर्वस्वी दुर्लक्ष करण्यात आलेले दिसते. वास्तविक पाहता कंपनी अथवा उद्योग कोणत्याही प्रकारचा वा स्वरुपाचा असो त्यामध्ये कर्मचारी, त्यांचे कामकाज आणि योगदान यांचे महत्त्व फार मोठे आहे.  तंत्रज्ञान वा कार्यपद्धती किंवा उत्पादन प्रक्रिया कशीही असो, त्यासाठी काम करणारे कर्मचारी आणि त्यांची मानसिकता महत्त्वाची असते. मशीनला मानवी मानसिकतेची जोड मिळाल्यासच उद्योग व्यवसायाची उत्पादकता साधली जाऊ शकते हे तर अनुभवसिद्ध सत्य आहे. दुसरे म्हणजे कंपनी व व्यवस्थापनाच्या आर्थिक, औद्योगिक कारणांवरून अचानकपणे कर्मचारी कपात झाल्यास त्याचा थेट व दूरगामी परिणाम आकस्मितपणे आपला रोजगार गमावला लागणाऱया कर्मचाऱयाच्या संपूर्ण कुटुंबावर होत असतो. घरच्या कर्त्या कमावत्या व्यक्तीलाच कामावरून कमी करून घरी बसावे लागल्याने कर्मचाऱयाला बसणाऱया भावनिक वा मानसिक धक्क्मयाला जोड मिळते ती अशा कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांपुढे निर्माण होणाऱया आर्थिक विवंचनेची. वर्षानुवर्षे आपापल्या नोकरी रोजगाराच्या ठिकाणी दररोज काम करण्याची व त्या कामापोटी आर्थिक उत्पन्न व पगार मिळण्याची खात्रीशीर सवय झालेल्या व्यक्तीला त्याची नोकरी अचानक गेल्याने म्हणूनच दुहेरी धक्का बसतो. भारतातील विविध उद्योगांमध्ये कर्मचारी कपात झाल्यानंतर अशी कपात सहन करावी लागणारे बरेच कर्मचारी म्हणूनच आपले कुटुंबीय वा विशेषतः पत्नीपासून दीर्घ काळपर्यंत दडवून ठेवतात.

आता मात्र या पद्धतीमध्ये सुदैवाने लक्षणीय स्वरुपात बदल होत असून त्यामध्ये पण भारतीय कंपन्यांनी पुढाकार आणि आघाडी घेतल्याचे दिसून येते. या संदर्भात बहुराष्ट्रीय व भारतीय कंपन्या आणि व्यवस्थापनांच्या संदर्भात तुलनात्मकदृष्टय़ा सांगायचे झाल्यास युरोपियन कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीच्या निर्णयापासून त्याच्या अंमलबजावणी करण्यापर्यंतचे काम आऊट सोर्सिंगच्या नावाखाली कंपनीबाहेरच्या मंडळींकडे सोपविले जाते. मिळणारा मोबदला व स्वरूप लक्षात घेता ही व्यावसायिक मंडळी कुठलीही व्यक्ती वा कर्मचाऱयाचा मुलाहिजा न ठेवता हे काम चाकोरीबद्ध पद्धतीने करतात. परिणामी त्या प्रक्रियेमध्ये भाव-भावनांना कुठेही स्थान नसते.  ज्या कंपन्यांना विशि÷ परिस्थितीत कर्मचारी कपात करावी लागते अशांनी आपल्या ज्या कर्मचाऱयांना नोकरी सोडून जाण्यास सांगावे लागते अशांना काही महिन्यांचा अवधी देऊन त्यांना पर्यायी रोजगार-नोकरी शोधण्यास प्रवृत्त करणे, संबंधित कंपनी उद्योगाच्या विभिन्न शाखांमध्ये अशा कर्मचाऱयांना सामावून घेणे, त्यांना पर्यायी नोकरी मिळण्यासाठी नोकरी-रोजगार सल्लागारांशी समन्वय साधून विशेष प्रयत्न करणे, अशा कर्मचाऱयांना त्यांच्या संबंधित क्षेत्रात पर्यायी काम-रोजगार देण्याच्या दृष्टीने या कर्मचाऱयांच्या कौशल्याला उद्यमशीलतेची जोड देणे, एवढेच नव्हे तर कंपनी सोडून जावे लागणाऱया कर्मचाऱयांशी सातत्याने संवाद साधून त्याचे मनोधैर्य टिकवणे यासारखे प्रयत्न आणि उपक्रम सुरू केले असून या साऱया प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपन्यामधून कर्मचाऱयांना कंपनीच्या आर्थिक व्यावसायिक कारणांमुळे काढले जात असताना अशा कर्मचाऱयांचे शिक्षण प्रशिक्षण, कौशल्य, अनुभव, यांचा वेळेत व नेमकेपणे उपयोग करून त्यांना त्यांच्या कामगिरीनुसार पर्यायी व उपयुक्त रोजगार देत असतानाच आपले व्यावसायिक उद्दिष्ट साधण्याकडे रोजगार मार्गदर्शकाचा कल वाढत्या प्रमाणावर दिसून येत असून त्यामुळे अचानक नोकरी गमावणाऱया कर्मचाऱयांना पर्यायी व उचित नोकरी-रोजगाराद्वारे मोठा दिलासा मिळू लागणे ही प्राप्त परिस्थितीत नक्कीच एक आशादायी बाब ठरते.

Related posts: