|Friday, October 19, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » तैं साकारपणें नट नटीं

तैं साकारपणें नट नटीं 

सर्व तयारी पूर्ण झाल्यावर भगवंतांनी आपल्या वचन पूर्तीसाठी पृथ्वीवर अवतार घेतला. कंसाच्या बंदिखान्यात भगवान देह धारण करून प्रकट झाले. भगवंताचे हे अवतार घेणे कसे असते याचे वर्णन भगवंताने स्वतःच गीतेमध्ये केले आहे. त्याचा माउलींनी केलेला अनुवाद असा –

म्हणौनि हें आघवें । मागील मज आठवें ।

मी अजुही परि संभवें । प्रकृतियोगें ।।

भगवान म्हणतात-मागील सर्व अवतारांचं मला स्मरण आहे म्हणून त्या त्या वेळी मी काय काय केलं हे मला आठवतं. खर म्हणजे मी अज आहे, जन्मरहित आहे. मला जन्म नाही, मी स्वयंभू आहे, जन्मानं होणारा आणि मरणाने जाणारा असा मी नाही. होणं, जाणं माझ्याकडे नाही. माझ्याकडे केवळ असणं आहे. पण, माझ्या कार्याच्या वेळेला प्रकृतीच्या योगानं मी अवतार घेतो. साकार होऊन या भूमीवर नांदतो.

माझें अव्ययत्व तरी न नसे । परी होणें जाणें एक दिसे । तें प्रतिबिंबें मायावशें । माझ्याचि ठायीं ।।

असा जरी मी जन्माला आलो तरी मी मरणारा नसतो. माझं अविनाशीपण जन्माला येण्यामुळं नासत नाही. त्याला बाधा येत नाही. मी येतो आणि जातो असं जे काही भासतं तो प्रतिबिंबात्मक देखावा आहे. मायेच्या योगानं हा प्रतिबिंबात्मक देखावा माझ्याच ठिकाणी दिसतो. असं जरी असलं तरी –

माझी स्वतंत्रता तरी न मोडे ।  परी कर्माधीनु ऐसा आवडे। तेही भ्रांतिबुद्धि तरी घडे । एऱहवीं नाहीं ।।

माझं स्वातंत्र्य बिघडत नाही. मी कोणत्याही प्रकारे परतंत्र होत नाही. मी कर्माधीन आहे असं अवतारकाली भासतं ते भ्रांतबुद्धीमुळं भासतं. ज्याने मला खरोखर जाणलं आहे त्याला मी कर्माधीन आहे असं वाटत नाही.

या ठिकाणी देवाची देहधारणा आणि आपली देहधारणा यामधला फरक लक्षात यायला पाहिजे. आपण पूर्वकर्मानं बांधलेले आहोत. आपण देह धारण करतो तो प्रारब्धामुळं, स्वेच्छेने नव्हे. आपल्याला जन्म येतो तो पूर्वकर्मांमुळं. कर्म हेच आपलं उपादान कारण आहे. या जन्मातही आपण कर्मानं बांधलेले आहोत. भगवान अवतार धारण करतो तो स्वेच्छेने. त्याला प्रारब्ध नाही. म्हणून जन्म घेऊनही त्याचं अजत्व मोडत नाही, त्याच्या अविनाशीपणाला बाधा येत नाही, त्याचं स्वातंत्र्य जात नाही.

कीं एकचि दिसे दुसरें । तें दर्पणाचेनि आधारें ।

एऱहवीं काय वस्तुविचारें । दुजें आहे ? ।।

तैसा अमूर्तचि मी किरीटी ।  परी प्रकृति जैं अधि÷ाrं । तैं साकारपणें नट नटीं । कार्यालागीं ।।

देव म्हणतात – अर्जुना! आरशामुळं एक वस्तू असूनसुद्धा आपल्याला दोन दिसतात ना? मग हे दोनपण खरं असतं का? वस्तूच्या दृष्टीनं विचार केला तर प्रत्यक्ष वस्तू एकच असते. त्याप्रमाणे मी अमूर्त म्हणजे आकाररहित असूनही, सर्वव्यापी असूनही माझ्या कार्यासाठी स्वमायेचा अंगीकार करून मी साकार होतो आणि एखादा नट स्वतःला न विसरता जसा सोंग वठवीत असतो तसा मीही नटासारखा नटून माझं कार्य करतो.

– ऍड. देवदत्त परुळेकर

Related posts: