|Friday, October 19, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सुभाषिते आणि मुक्ताफळे

सुभाषिते आणि मुक्ताफळे 

सुभाषिते आणि मुक्ताफळे यात फरक काय? पूर्वी देशातले आणि विदेशातले नेते एखादं वाक्मय बोलून जायचे किंवा घोषणा द्यायचे, त्यांची सुभाषिते होत. हल्लीचे नेते बोलतात किंवा बरळतात ती मुक्ताफळे असतात. सुभाषिते उपदेश करतात. मुक्ताफळे करमणूक करतात.

पूर्वी आम्ही ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा’ (सुभाषचंद्र बोस), ‘आराम हराम है’ (पं. नेहरू), जय जवान जय किसान’ (लाल बहाद्दर शास्त्री), ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ (अटलबिहारी वाजपेयी) अशी मान्यवरांची वाक्मये ऐकलेली किंवा वाचलेली होती. जॉन एफ केनेडी अमेरिकेचे अध्यक्ष होते. त्यांचे एक अवतरण अतिशय प्रसिद्ध होते, “देश तुम्हाला काय देतोय हे विचारू नका, तुम्ही देशासाठी काय करताय हे स्वतःला विचारा.’’ विशेष प्रसिद्ध नसलेले त्यांचे दुसरे अवतरण आहे, “आपण आपल्यातले मतभेद मिटवू शकत नसलो तर निदान हे जग सर्व मतांच्या लोकांसाठी असेल असे बनवूयात.’’ 

आता मनू पालटला. पुढारी लोक सुभाषिते बोलायचे बंद झाले. सामोशात बटाटे असतील तोवर मी बिहारमध्ये राज्य करीन किंवा आमच्या बिहारमध्ये ड्रीम गर्लच्या गालांपेक्षा गुळगुळीत रस्ते बनवीन असे एक नेता बोलला. दुसऱया नेत्याने बजावले की आमच्या मध्य प्रदेशातले रस्ते अमेरिकेपेक्षा सुंदर आहेत. पाऊस नसेल तर धरणात पाणी कसे भरायचे हा प्रश्न एका पाटबंधारे मंत्र्यांना पडला. पुढच्या निवडणुकीत ते जाऊन दुसरे मंत्री आले आणि म्हणाले की मी म्हातारा असलो तरी चावट चित्रफिती आवडीने बघतो. एक मंत्री म्हणाले की दारूच्या बाटल्यांना बायकांची नावे दिली तर त्या जास्त खपतील. एक पुढारी तक्रार करीत होते की शेतकऱयांना कितीही मदत केली तरी साले रडतातच. राजस्थानात तर सरकारनेच महिलांना सल्ला दिलाय की फिटनेससाठी रोज घरात झाडू मारा आणि जात्यावर बसून दळण दळा.

आपल्याकडे असं तर अमेरिकेत आपल्याहून सवाई. तिथले अध्यक्ष अशीच वाक्मये टाकत असतात. त्यांची काही मुक्ताफळे इथे देण्यासारखी नाहीत. त्यातल्या त्यात कमी आचरट असलेले नमुने देतो. “माझा बुद्ध्यांक अतिशय जास्त आहे, माझ्यासमोर स्वतःला मूर्ख वाटून घेऊ नका. तो तुमचा दोष नाही.’’ आणि “मी श्रीमंत आहे, हेच माझे सौंदर्य.’’

काय बोलणार?

Related posts: