|Monday, January 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » न्यूड ते दशक्रिया

न्यूड ते दशक्रिया 

दशक्रिया, न्यूड, सेक्सी दुर्गा, पद्मावती या चार चित्रपटांवरून एकाचवेळी वाद सुरू असावेत हे काही चांगले लक्षण नाही. वादांमागची कारणे वेगवेगळी असली तरी त्याला निमित्तमात्र ठरलेली मानसिकता थोडय़ाफार प्रमाणात सारखीच असल्यामुळे त्यांचा एकत्रित समाचार घेणे आवश्यक ठरते. गोव्यात अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या 48 व्या महोत्सवासाठी इंडियन पॅनोरामा विभागात शुभारंभाचा चित्रपट म्हणून रवी जाधव यांचा न्यूड हा मराठी चित्रपट परीक्षक मंडळाने निवडला होता. मात्र माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने न्यूड आणि सनाल शशिधरन या मल्याळम दिग्दर्शकाचा सेक्सी दुर्गा असे दोन चित्रपट प्रदर्शनातून वगळले आहेत. या निर्णयाचे चित्रपट वर्तुळात जोरदार पडसाद उमटले असून दिग्दर्शक, कलावंतांनी सरकारी हस्तक्षेपाचा निषेध केला आहे. परीक्षक समितीचे प्रमुख सुजॉय घोष यानी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यूड  चित्रपटावरील अन्यायाविरोधात मराठी चित्रपटसृष्टी एकवटली आहे. इफ्फीसाठी नऊ मराठी चित्रपटांची निवड झाली होती. त्यातल्या बहुसंख्य कलावंत,  दिग्दर्शकांनी सरकारचा निषेध केला आहे.  या सर्व प्रकाराला संबंधित खात्याच्या मंत्री स्मृती इराणी याना जबाबदार ठरविले जात आहे. चित्रपट न पाहताच संबंधित मंत्रालयाने हा निर्णय घेतला. त्याची कोणतीही पूर्वकल्पना किंवा कारणे  देण्यात आलेली नाहीत, असे  रवी जाधव यांचे म्हणणे आहे. न्यूड आणि सेक्सी दुर्गा  या  नावामुळे काही गैरसमज होऊ शकतात. नावातून आकर्षण निर्माण करण्याचा हेतू असू शकतो. प्रत्यक्षात हे चित्रपट वेगळ्या विषयावरचे  आहेत.  जगण्यासाठी आयुष्यभर  देहाचे प्रदर्शन करावे लागलेल्या महिलेची कहाणी न्यूडमध्ये मांडण्यात आली आहे. चित्रकार एम. एफ. हुसेन यांची  वादग्रस्त चित्रे आणि त्यानिमित्ताने धर्मवादी संघटनांनी  घातलेला धुमाकूळ या संदर्भातले प्रसंग चित्रपटात आहेत. त्याला कदाचित सरकारचा आक्षेप असू शकतो. एस. दुर्गा हा चित्रपट एका जोडप्यास रात्रीच्या प्रवासात आलेल्या भयकारी अनुभवाविषयीचा आहे. देशात  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे आयोजन केले जाते, त्याला केंद्र आणि राज्यसरकारचे अनुदान असते. आयोजक म्हणून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची भूमिका महत्त्वाची असते. सर्वसाधारणपणे महोत्सवासाठीच्या चित्रपटांची निवड जाणकार तज्ञ समितीकडून होत असते. त्यात कोणताही बदल किंवा फेरफार मंत्रालय किंवा सरकारकडून होत नसतो. तसा कोणताही नियम किंवा कायदा नसला तरी संकेतांचे पालन होणे अपेक्षित असते. स्मृती इराणी यांच्या मंत्रालयाने म्हणजे पर्यायाने  मोदी सरकारने हे संकेत सरळसरळ धाब्यावर बसविले आहेत. सरकारचा हा हस्तक्षेप लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारा असल्याचा आरोप चित्रपट क्षेत्रातून केला जात आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दशक्रिया चित्रपटाबद्दलचा  वाद थोडा वेगळा आहे. हा चित्रपट जातीद्वेष पसरविणारा असून त्यावर बंदी घालावी अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केली आहे. हिंदू धर्मातील दशक्रिया विधीसह प्रथा, परंपरेवर भाष्य करणारा हा चित्रपट मुळात बाबा भांड यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. सुमारे 22 वर्षांपूर्वी त्यांची ही कादंबरी प्रकाशित झाली. अनेक भाषांमधून त्याचे अनुवाद झाले आहेत. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश झाला आहे. इतक्या कालावधीत कादंबरीवर बंदी घालण्याची मागणी कुणी केली नव्हती.  पुण्यातल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कष्ठ चित्रपटासह अनेक पुरस्कार त्याला मिळाले, त्याला  कुणी  आक्षेप घेतला नव्हता. सेन्सॉर संमत  होऊन तो प्रदर्शित होत असतानाच त्याला  विरोध का व्हावा?  चित्रपट किंवा कादंबरी ही एखाद्या जातीपेक्षा मानवी प्रवृत्तीवर भाष्य करणारी आहे. विरोध करण्यापूर्वी चित्रपट नीट पहावा, असे बाबा भांड यांचे म्हणणे आहे.  न्यूड  आणि दशक्रियाचे कलावंत यांचे म्हणणे सारखेच आहे. हिंदु धर्मातील प्रथा, परंपरांचे, तसेच इतिहासाचे चित्रपटाच्या माध्यमातून विकृतीकरण केले जाते असा आरोप ब्राह्मण महासंघाने केला आहे. संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटावरही  इतिहासाचे विकृतीकरण केल्याचा आरोप होता. त्याच भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटावर बंदी घालावी या मागणीसाठी आता राजस्थानी हिंदू समाज मोर्चे काढतो आहे. हा योगायोग नक्कीच नाही. भन्साळींच्या इतर चित्रपटांप्रमाणे हा चित्रपटसुद्धा सुरुवातीपासून वादग्रस्त ठरला आहे. त्याच्या  चित्रिकरणाचा सेट जाळण्यापर्यंत काही संघटनांची मजल गेली होती. चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून अवकाश आहे. सध्या त्याची गाणी आणि ट्रेलर विविध माध्यमातून यशस्वीपणे जाहिरातबाजी करत आहेत. चित्रपट हा चित्रपट असतो, मग तो कलात्मक असो की व्यावसायिक हे खरे मानले तरी त्यामध्येही फरक असतोच. भन्साळी आणि रवी जाधव यांच्या साध्य आणि साधनांमध्ये फरक असू शकतो, नव्हे तसा तो आहेच. पण आपल्याकडे एकूणच कला, चित्रपट, नाटक याकडे व्यापकदृष्टीने पाहणारा प्रेक्षकवर्ग तयार झालेला नाही. कलेचा बाजार मांडणारे व्यापारी आणि कला हा अभिव्यक्तीचा, अस्तित्वाचा भाग आहे असे समजणारा कलावंत यांच्यामध्ये काही फरक हा राहणारच. कलाबाह्य हेतू ठेवून चित्रपटाविषयी  जाणीवपूर्वक वाद निर्माण करणे किंवा त्याला खतपाणी घालणे जसे गैर आहे. तसेच आपण म्हणजे समाजाचे हितरक्षक, संस्कृतीरक्षक अशा भूमिकेतून कलेतला खुलेपणा मारून टाकणे हे सुद्धा गैरच.  अर्थात हे काही पहिल्यांदाच घडलेले नाही.  काँग्रेसच्या राजवटीतसुद्धा असे प्रकार घडले आहेत.  विषय, मांडणी, त्यातील वास्तव याबाबत मतभेद असू शकतात. हे मतभेद नोंदविण्याचे मार्ग सनदशीर असले पाहिजेत. प्रदर्शनावर बंदी घालणे, महोत्सवातून चित्रपट वगळणे हे मार्ग होऊ शकत नाहीत. एक निश्चित की  चित्रपटाकडे निकोपपणे पाहणारा प्रगल्भ समाज तयार होण्याचे काम पद्मावतीपेक्षा  न्यूड, दशक्रिया सारखे चित्रपट करत असतात हे  सुद्धा आपण केव्हातरी समजून घेणे आवश्यक ठरते.

Related posts: