|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ताईंच्या संवाद यात्रेत, नेत्यांमध्ये विसंवाद !

ताईंच्या संवाद यात्रेत, नेत्यांमध्ये विसंवाद ! 

निकम-जाधवांमध्ये शाब्दीक चकमक

सुप्रिया सुळेंची सेना-भाजपवर सडकून टीका

 

वार्ताहर /सावर्डे

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संवाद दौऱयातच माजी मंत्री व जिल्हा प्रभारी भास्कर जाधव आणि जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्यातील विसंवाद उघड झाला. सुप्रिया ताईंच्या उपस्थितीतच दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दीक चकमक झडल्याने राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस चव्हाटय़ावर आली. मात्र, ताईंनी या चकमकीवर कोणतेही भाष्य करणे टाळले.

चिपळूण दौऱयावर आलेल्या खासदार सुळे यांनी बुधवारी सावर्डे येथे विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. स्वर्गीय गोविंदराव निकम नगरीत झालेल्या जिल्हय़ातील कार्यकर्त्यांशी झालेल्या संवाद कार्यक्रमात लांजा तालुकाध्यक्ष महमंद रखांगी, रत्नागिरीचे बशीर मुर्तुझा आणि प्रदेश चिटणीस बाबाजी जाधव यांनी आपल्या मनोगतात जिल्हा प्रभारी असलेल्या जाधवांकडे जिल्हय़ाची सूत्रे सोपवावीत, अशी मागणी केली. त्याचबरोबर गुहागर मतदारसंघ मजबूत असल्याने तेथे जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव यांना उभे करून जाधव यांना रत्नागिरी मतदारसंघाची जबाबदारी दिल्यास यश निश्चित मिळेल, असे सांगितले. याचाच धागा पकडून आमदार जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनात, पक्षात आल्यापासून ते नगरपरिषद, जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत कशा पध्दतीने प्रत्येकवेळी जबाबदाऱया दिल्या आणि त्यानंतर कशा काढून घेण्यात आल्या हे कथन केले.

चिपळुणातील विषयावर बोलताना जिल्हाध्यक्षांसह युवक, महिला, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अशी अनेक पदे असल्याचे सांगत असताना त्यांना जिल्हाध्यक्ष निकम यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला विचारूनच या पदांवर नियुक्ती करण्यात आल्याचे सांगतानाच नेहमी तेच-तेच का काढले जाते. यापूर्वीचे सारे काही विसरून तुमच्या नेतृत्वाखाली सारेजण काम करताना हा प्रकार योग्य नसल्याचे सांगितले. यावर जाधव यांनी तुम्ही अस्वस्थ का होत आहात असे विचारले. व्यासपिठावर या दोघांच्या शाब्दीक चकमकीत सभागृह मात्र स्तब्ध झाले. यातच जाधव यांनी पवारसाहेबांनी आशीर्वाद दिला, तर रत्नागिरीतही यश मिळवून दाखवू असे शेवटी सांगितले.

ताईंनी नेली वेळ मारून

व्यासपीठावर घडलेल्या या शाब्दीक चकमकीनंतर सुप्रियाताईंनी आपल्या मार्गदर्शनात या वादाची फारशी दखल घेतली नसली तरी कुटूंब म्हटलं की जसे भांडय़ाला भांडे लागते तसेच संघटनेतही चालते. ते जर लागले नाही तर परिस्थिती समजत नाही. पक्षाच्या व्यासपीठावर आपली परखड मते मांडली नाहीत तर संघटना कसली असे सांगत वेळ मारून नेली.

सरकामुळे राज्य पिछाडीवर

आपल्या मार्गदर्शनात खासदार सुळे यांनी कार्यकर्त्यांना सोशल मिडियावर भर देण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर शिवसेना आणि भाजपवर टीकेची झोड उठवली. हे सरकार बिनकामाचे असून त्यांनी महाराष्ट्राला पिछाडीवर नेले आहे. राष्ट्रवादीला बाहेरचे कोणीही हरवू शकत नाही. मात्र आपलीच माणसे आपल्याला हरवू शकतात. आज सत्ता नसताना जे पक्षातून बाहेर गेले आहेत. त्यांना उद्या सत्ता आल्यावर पक्षात घेतले गेले तरी ते शेवटच्या रांगेत ठेवण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी आपल्या प्रास्ताविकात जिल्हय़ाचा आढावा घेतला. तर आमदार निरंजन डावखरे, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, नलिनी भुवड, युवक जिल्हाध्यक्ष राकेश चाळके, पंचायत समिती सदस्य आबू ठसाळे, सभापती सौ. पुजा निकम, जागृती शिंदे, राज विखारे, जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर, नगरसेविका वर्षा जागृष्टे, माजी सभापती शौकत मुकादम यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी विद्यार्थी कॉग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विक्रांत जाधव, कुमार शेटये, बाप्पा सावंत, अजित यशंवतराव यांच्यासह जिल्हयातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.

…तर 15 डिसेंबरनंतर मंत्र्यांना फिरू देणार नाही

राज्यातील महामार्गांसह सर्वच प्रमुख रस्ते सध्या खडय़ात गेले आहेत. याविरोधात राष्ट्रवादीने ‘खड्डे विथ सेल्फी’सह विविध आंदोलने केली आहेत. येत्या 15 डिसेंबरपर्यत राज्य खड्डेमुक्त करू असे बांधकाम मंत्र्यांनी जाहीर केले आहे. या घोषणेप्रमाणे या कालावधीत खड्डे भरले गेल्यास आपण बांधकाम मंत्र्यांचे स्वागत करू. मात्र खड्डे भरले गेले नाही तर राज्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा सुळे यांनी दिला.