|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बदली केलेल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱयांना पेडणेत परत आणा

बदली केलेल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱयांना पेडणेत परत आणा 

प्रतिनिधी/ पेडणे

पेडणे तालुक्यात प्रामाणिकपणे काम करणाऱया अधिकाऱयांची बदली कुणाचीही तक्रार नसताना बदली करण्यात आली आहे. याला पर्यटन तथा क्रीडामंत्री मनोहर आजगावकर जबाबदार असून सदर कर्तव्यदक्ष अधिकाऱयांना परत पेडणेत आणावे, अन्यथा मंत्र्यांविरोधात चळवळ उभारली जाईल, असा इशारा पेडणेकरांचा आवाज संघटनेतर्फे बुधवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

यावेळी पेडणे काँग्रेस गट अध्यक्ष उमेश तळवणेकर, ऍड. मुरारी परब, डॉ. साईनाथ चणेकर, हरमलचे माजी सरपंच डॅनियल डिसोझा, उगवेचे माजी सरपंच दशरथ महाले, पार्सेचे माजी सरपंच गुरु पांडे, उत्तम कशालकर, गोपिचंद आपुले, निवृत्त उपजिल्हाधिकारी भालचंद्र महाले, प्रशांत आरोलकर, शांताराम पेडणेकर अपस्थित होते.

बदलीला आजगावकर जबाबदार : उमेश तळवणेकर

 पेडणेतील अग्निशामक दलातील प्रशांत धारगळकर यांची कुडचडे येथे बदली तसेच वीज खात्याचे अभियंता सुभाष पार्सेकर यांची पणजी येथे बदली झाली आहे. याला मंत्री आजगावकरकरच जबाबदार आहेत. त्यांनी सुडबुद्धीचे राजकारण करू नये. जे चांगले काम करतात त्यांच्या इतरत्र बदल्या केल्या जात आहेत, असे उमेश तळवणेकर यांनी सांगून मामलेदार कार्यालयातील रिक्त जागा तसेच तलाठी उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री आजगावकर यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.

या बदली झालेल्या अधिकाऱयांवर अन्याय झाला असून याला पेडणेतील जनता गप्प बसणार नाही. पेडणेकरांचा आवाज हा आजपासून सुरु होणार आहे. अत्याचार व अन्यायाविरुद्ध आता चळवळ उभारणार आहे, असे ऍड. मुरारी परब म्हणाले.

मामलेदार कार्यालयात अनेक समस्या : मयेकर

शेमेचे आडवण येथे मोपा विमानतळाच्या नावावर दोन घरे मोडली. त्या कुटुंबांना आता उघडय़ावर राहावे लागत आहे. याचबरोबर मामलेदार कार्यालयात एकदाही मंत्री आजगावकर यांनी भेट दिली नसून तेथे किती तरी समस्या नागरिकांना भेडसावत आहेत, असे नारायण मयेकर यांनी सांगितले.

अग्निशामक दलात सेवा बजावणारे प्रशांत धारगळकर यांनी आतापर्यंत व्यवस्थित सेवा बजावली आहे. चांगली सेवा बजावत असल्याबद्दल त्यांना गेल्यावर्षी सरकारने गौरविले होते. मात्र मंत्री आजगावकर यांनी त्यांची बदली केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची कुडचडे येथे केलेली बदली रद्द करून त्यांना परत पेडणे येथे आणावे, अशी मागणी डॉ. साईनाथ चणेकर यांनी केली आहे.

पेडणेकरांचा अपमान : डॅनियल डिसोझा

गोवा मुक्तीनंतर पेडणेचा काहीच विकास झालेला नाही. जे अधिकारी चांगली सेवा देतात त्यांची मात्र बदली केली जाते. हा पेडणेकरांचा अपमान आहे, असे डॅनियल डिसोझा म्हणाले. मोपा विमानतळासाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला 60  टक्के लोकांना अद्याप मिळालेला नाही. या प्रकल्पात स्थानिकांना नोकऱया द्याव्यात अशी मागणी भालचंद्र महाले यांनी केली आहे.

मोपा विमानतळाबाबत माजी मंत्री संगीता परब, रमाकांत खलप यांनी खऱया अर्थाने पाठपुरावा केला आहे. तसेच मोपा पंचायतीमुळेच या प्रकल्पाला चालना मिळाली आहे. त्याचे श्रेय अन्य कुणी घेऊ नये, असे दशरथ महाले म्हणाले.

Related posts: