|Saturday, October 20, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » भारतातील हवा प्रदूषणाचे संकट

भारतातील हवा प्रदूषणाचे संकट 

भारतीय स्वातंत्र्यप्राप्ती सत्तरीच्या उंबरठय़ावरती प्रवेश करत असताना स्वच्छ हवा, निर्मळ पाणी आणि सकस अन्नाची मूलभूत गरजेची पूर्तता दिवसेंदिवस दुरापास्त होत चाललेली आहे. देशाची झपाटय़ाने वाढत चाललेली लोकसंख्या, नैसर्गिक साधनसंपत्तीचा अविवेकी पद्धतीने होत असलेला ऱहास आणि जीवाश्म इंधनाचा होणारा आततायी वापर यामुळे आज हवा प्रदूषणाचे संकट इथल्या महानगरात थैमान मांडू लागलेले आहे. देशाची राजधानी दिल्लीत हवा प्रदूषणाने इतका कहर मांडलेला आहे की, त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याची पाळी आली होती. विमानसेवा, रेल्वेसेवा विसकळीत करण्यास हवा प्रदूषण कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. शुद्ध हवेचे घटक नसलेल्या वस्तू वातावरणात प्रवेशकर्त्या झाल्या की हवा प्रदूषणाची समस्या निर्माण होते. धूर, धुळीकण, राख, परागकण आणि मानवनिर्मित बाबी हवा प्रदूषणास जबाबदार असतात. पृथ्वीच्या वातावरणात उल्का आणि अशनी यांचा उत्पात होऊन त्यांचे कणसुद्धा हवा प्रदूषण निर्माण करतात परंतु अशाप्रकारचे प्रदूषण नियंत्रित करण्यात निसर्ग महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आकाशात विहरत असलेले धुळीकण आणि इतर प्रदूषणाला कारण असलेले घटक, पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर पडतात परंतु अतिसूक्ष्म कण आणि काही वायू बराच काळ हवेत राहतात. धुळीकण, कार्बनचे कण, राख यांच्याबरोबर शिसे, शिशाची संयुगे आणि अन्य धातूचे घटक हवेत मिसळून हवा प्रदूषणाची समस्या निर्माण होते.

दुसऱया महायुद्धानंतर औद्योगिकीकरण, शहरीकरण गतिमान झालेले आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर जीवाश्म इंधनांवरती चालणाऱया स्वयंचलित वाहनांची संख्या आपल्या देशात वाढलेली आहे. कापड, कागद, प्लास्टिक यांचे कारखाने, धातूकामाच्या भट्टय़ा, औष्णिक वीज निर्मिती करणारे कारखाने, चामडय़ाचे उद्योग, रासायनिक खते, जंतूनाशके यांचे कारखाने, रबर, पोलाद, तेल यांचे वाढते उद्योग यामुळेच पिण्यासाठी स्वच्छ पाणी, श्वसनासाठी शुद्ध हवा आणि योग्य निवारा या मूलभूत नागरी सुविधा मिळणे दिवसेंदिवस दुरापास्त झालेले आहे. आपल्या जीवाश्म इंधनांवरती चालणाऱया वाहनांच्या धुरात शिसे तसेच कार्बन डाय ऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड त्याचप्रमाणे कार्बनचे घनकण असतात आणि त्यामुळे श्वसनाच्या असंख्य विकारांना निमंत्रण मिळते. कार्बन मोनोक्साईड मानवी फुफ्फुसातून रक्तात जाऊन प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता कमी होते. दीर्घकाळ हवेतील प्रदूषणात राहणाऱयामध्ये फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची भीती असते. वाहने आणि कारखाने यामुळे निर्माण होणारी वातावरणातील धूळ दमा, खोकला, श्वासनलिकेला सूज येण्यासाठी कारणीभूत ठरतात. आमांश, जंत, क्षय यासारख्या रोगांचा संसर्ग धुळीतून होत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. आग्रा येथे असलेल्या पाचशेच्यावर कारखान्यांमधून निघणाऱया सल्फर डायऑक्साईडच्या उत्सर्जनामुळे भारतीय वास्तुकलेचा अजोड नमुना असलेला ताजमहाल काळवंडत असल्याने त्याच्याविरुद्ध वरिष्ठ वकील एम. सी. मेहता यांनी न्यायालयीन लढा उभारून त्याविरुद्ध दाद मागितली होती. बऱयाचदा ढगाळ हवामान व सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे हवेचा प्रवाह स्तब्ध होतो आणि त्यात धूर आणि धूळ यांचे मिश्रण झाल्यावर निर्माण झालेल्या जहरी धुरक्याने भारतीय लोकमानसाच्या जगण्याला संकटग्रस्त केलेले आहे.

2009 साली चीन आणि अमेरिकेपाठोपाठ आपला देश जागतिक पातळीवरती तिसऱया क्रमांकाचे कर्बवायुचे उत्सर्जन करीत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. आपल्या देशात हवा प्रदूषणाच्या समस्येने धोक्याची पातळी गाठल्या कारणाने सुमारे 6,20,000 लोकांचा मृत्यू लवकर झाल्याचे उघडकीस आलेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील वीस अति प्रदूषणकारी शहरांमध्ये भारतातील तेरा शहरांचा समावेश होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई इथली हवा प्रदूषणाची समस्या चिंतेचा विषय ठरलेला आहे. हवा प्रदूषण हे आपल्या देशात दुसरी मोठी आरोग्याची समस्या ठरलेली असून दाट धुरक्याच्या जहरी विळख्यात देशातल्या वीस नगरातल्या लोकांचे जीवन संकटग्रस्त झालेले आहे. दगडी कोळशातून होणारी ऊर्जा निर्मिती, जळणाचे लाकूड, शेतातले गवत, भुसा, गुरांचे शेण यांचे होणारे वाढते ज्वलन, जीवाश्म इंधनांचे ज्वलनरंग, व्हर्निश स्प्रे आदींतून निर्माण होणाऱया वाफा, रासायनिक वाऱयाबरोबर उडणारी धूळ, जंगलांना लागलेल्या आगीमुळे निर्माण होणारा धूर आणि कर्बवायूचे उत्सर्जन यामुळे हवा प्रदूषणाची समस्या भारतीय लोकमानसात आरोग्याचे असंख्य प्रश्न निर्माण करण्यास कारणीभूत ठरलेली आहे. दिल्लीसारख्या महानगराचा होत असलेला विस्तार, तेथे कोलमडलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि वाढत असलेली स्वयंचलित वाहनांची संख्या, हरियाणा-पंजाबसारख्या राज्यात पिकांच्या टाकाऊ कचऱयाचे होणारे ज्वलन, मोसमी पावसाच्या निरोपाच्या क्षणी वाऱयाच्या गतीमधील शिथिलता, आसमंतात असलेले ओलाव्याचे उच्च प्रमाण आणि त्यात भर म्हणून की काय विविध स्रोतांतून उत्सर्जित होणारे प्रदूषणकारी कर्बवायुबरोबर अन्य वायूंचे प्रमाण यामुळे दिल्लीत वाढत्या वायू प्रदूषणाने मानवी समाजाबरोबर सजीवमात्रांना संकटांच्या खाईत लोटलेले आहे. दिल्लीच्या हवा प्रदूषणाच्या समस्येमुळे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक झपाटय़ाने खालावत चाललेला आहे. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक वाढू लागल्यावरती कचरा जाळणाऱया भट्टय़ांवर निर्बंध घातले जातात. सुका कचरा उघडय़ावरती जाळण्यास मज्जाव केला जातो. औष्णिक विद्युत उत्पादन केंद्रावर निर्बंध घातले जातात. सार्वजनिक वाहनांचा वापर  करण्याचे सूचित केले जाते.

वायू प्रदूषणाने आज केवळ दिल्लीतच नव्हे तर भारतभरच अस्मानी संकटाचे जहरी ढग दाटून आणलेले आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी केंद्र आणि राज्यस्तरावरच्या घटकांनी आपापसातले मतभेद विसरून आरोग्यविषयक आणीबाणीची ही परिस्थिती सोडविण्यासाठी एकत्र येऊन नियोजनबद्ध उपाययोजना करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. पर्यावरणाच्या तापमानवाढीचे दुष्परिणाम हळूहळू जगभर दिसू लागलेले आहेत. पिण्याच्या पाण्याचे स्रोत संकटग्रस्त झालेले आहे. तापमान वृद्धीचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर जाणवू लागलेले आहे. अशा पार्श्वभूमीवर आज दिल्लीत निर्माण झालेली वायू प्रदूषणाची समस्या वर्तमान आणि आगामी काळात देशभर आपले जाळे विस्तारणार आहे. त्यासाठी आपल्या सभोवताली असणाऱया हिरव्या जंगलाचे संवर्धन आणि संरक्षण करण्याबरोबर नवनवीन ठिकाणी हिरवाईच्या आच्छादनांचा विस्तार होण्याची नितांत गरज आहे. वायू प्रदूषणाची ही समस्या नियंत्रित करणे केंद्र आणि राज्य सरकारसमोरचे मोठे आव्हान आहे.

Related posts: