|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » समुद्रात लपलेल्या शत्रूंना पकडणार स्वदेशी ‘नजर’

समुद्रात लपलेल्या शत्रूंना पकडणार स्वदेशी ‘नजर’ 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

सागरी भागांमध्ये पाण्यात आत पाणबुडे किंवा मानवरहित छोटय़ा पाणबुड्यांद्वारे कोणताही हल्ला होऊ नये याकरता पहिल्यांदाच देशात सोनार निर्माण केले जाणार आहेत. सोनार तंत्रज्ञान नौदलासाठी टेहळणीकरता महत्त्वाचे मानले जाते. नौदल मोठय़ा प्रमाणात सोनारची खरेदी करणार असून जवळपास सर्व नौकांवर त्या तैनात केल्या जातील.

अत्यंत हलके असल्याने ते एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी नेता येते. पॉर्टेबल डायव्हर डिटेक्शन सोनार (पीडीडीएस) असे याचे नाव असून याच्या पुरवठय़ासाठी टाटा पॉवर एसईडीसोबत करार करण्यात आला. पहिल्यांदाच भारतीय कंपनी हा सोनार निर्मिणार आहे. सरकारच्या मेक इन इंडिया धोरणानुसार हे सोनार बेंगळूरमध्ये निर्माण केले जातील. सोनारकरता इस्रायलची कंपनी डीएसआयटी तंत्ज्ञानाचे हस्तांतरण करेल. आतापर्यंत नौदलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सोनार आयात केले जात होते.

हवाई टेहळणी यंत्रणा

भारतीय सैन्य 60 शॉर्ट रेंज रिमोट पायलट एअरक्राफ्ट यंत्रणा खरेदी करणार आहे. या यंत्रणेमुळे मोठय़ा भूभागाची हवाई टेहळणी दिवसरात्र करता येईल. ही यंत्रणा कोणत्याही मोहिमेदरम्यान सैनिकांना प्रत्यक्ष वेळेत इलेक्ट्रॉनिक डाटा आणि छायाचित्रे उपलब्ध करणार आहे.  यंत्रणेची कार्यकक्षा 200 किलोमीटर असावी आणि 10 तास उड्डाण भरण्याची क्षमता यात असावी असे सैन्याचे म्हणणे आहे. यंत्रणेच्या खरेदीसाठी गुरुवारी विनंती अर्ज प्रसिद्ध करण्यात आला. ही यंत्रणा भारतीय उद्योजकांकडून विकसित केले जाणार आहेत. करार झाल्याच्या 2 वर्षांच्या आत याचा पुरवठा कंपनीला करावा लागेल.