|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पवार, ठाकरेंच्या सल्ल्यानेच कर्जमाफी- सुभाष देशमुख

पवार, ठाकरेंच्या सल्ल्यानेच कर्जमाफी- सुभाष देशमुख 

सहकार बुडव्यांच्या आरोपांची कीव : कर्जमाफीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही

प्रतिनिधी/ सांगली

कर्जमाफीचा निर्णय घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनीच सरसकट कर्जमाफी करु नका असा सल्ला दिला होता. त्यानुसारच कर्जमाफीचा निर्णय घेतला असल्याचा गौप्यस्फोट सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी येथे बोलताना केला. ज्यांनी साखर कारखान्यांची विक्री केली, पत संस्था, दूधसंघ, सूतगिरण्या बुडविल्या तेच सरकारवर सहकार बुडवित असल्याचा आरोप करतात याची कीव येते, असा टोलाही त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना लागावला.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात सहकारी सोसायटय़ांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. खा. संजयकाका पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी आ. भगवानराव साळुंखे, बापूसाहेब पुजारी उपस्थित होते. पुढे बोलताना ना. देशमुख म्हणाले, कर्जमाफीच्या बाबतील सरकार जागृत आहे. गरजू शेतकऱयांच्यापर्यंत कर्जमाफीचा लाभ पोहचावा असा या पाठीमागचा हेतू आहे. थोडा वेळ लागेल पण शेवटी ‘रिझल्ट’ चांगलाच दिसेल. त्यामुळे शेतकऱयांनी कर्जमाफीची चिंता करु नये सर्वांचे कर्ज माफ होणारच आहे. 2009 पासून थकबाकीदार असलेला एकही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही हे माझे वचन आहे.

ऑनलाईनने अनेकांचे धाबे दणाणले

कर्जमाफीचा गरजू शेतकऱयांनाच लाभ मिळावा यासाठी ‘ऑनलाईन’ अर्ज भरुन घेतले. पण काहींनी यावर टीका केली. शेतकरी ऑनलाईन अर्ज कसे भरणार असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. पण, राज्यातील 77 लाख शेतकऱयांनी ऑनलाईन अर्ज भरल्याचे सांगत ना. देशमुख म्हणाले, ज्यांनी 2007-08 च्या कर्जमाफीमध्ये प्रचंड लाभ घेतला त्यांचे ऑनलाईन यंत्रणेमुळे धाबे दणाणले. त्यांनी टीका करण्यास सुरूवात केली. पण, पारदर्शकतेच्या बाबतीत सरकार तडजोड करणार नाही. कर्जमाफीसाठी उभा पेलेला निधी हा सर्वसामान्यांनी कराच्या रुपात जमा केलेला पैसा आहे. तो गरजू शेतकऱयांपर्यंत पोहोचावा हाच या मागचा सरकारचा हेतू आहे.

सहकार बुडव्यांची कीव येते

राज्य शासन सहकार बुडवायला निघाले आहे अशी टीका सुरु असल्याचे सांगत ना. देशमुख म्हणाले, ज्यांनी राज्यातील 11 हजार संस्था बुडविल्या. 38 साखर कारखान्यांची कवडीमोल दराने विक्री केली. सूतगिरण्या, दूधसंघ, पत संस्था बुडविल्या तेच असा आरोप करत आहेत. त्यांची कीव येते असा टोला काँग्रेस-रा
ष्ट्रवादीच्या नेत्यांना मारला. विनाकारण आरोप होत असल्याचे सांगत सरकारवर सहकार बुडविल्याचा आरोप करणाऱयांनी चिंतन करण्याची गरज आहे. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ या प्रमाणे टीकाकारांच्याही सूचनांचे स्वागतच आहे असेही  देशमुख म्हणाले.

शेतीमध्ये मूलभूत सोयी देणार

गरीब व श्रीमंत यांच्यामधील दरी कमी करण्याचे काम सरकार करत आहे. शेतीसाठी वीज, पाणी, चांगल्या प्रतीचे बियाणे व रास्तभावामध्ये खत या मूलभूत सुविधा देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे सांगत ना. देशमुख म्हणाले, शेतकऱयांना कमी व्याजदराने पत पुरवठा करणे, त्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळवून देणे,  शेतमाल तारण कर्ज देण्याची गरज आहे. तरच शेतकरी पुन्हा कर्जमाफी मागणार नाही हीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे. त्यानुसार सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकचे संचालक, जिह्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटय़ांचे चेअरमन, सचिव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

जास्त खाल्ल्याने अपचन झाले

कर्जमाफीचा विषय जास्त चघळत ठेऊ नका अशाने चव जाते असा टोला जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी ना. देशमुख यांना मारला. हा धागा पकडत ना. देशमुख यांनी 2007-08 साली जास्त खाल्ल्यानेच अपचन झाल्याचे सांगत चघळून खाण्यातच आनंद असल्याचा पलटवार दिलीपराव पाटील यांच्यावर केला. थोड थांबा यातून चांगलच निष्पन्न होईल, असेही देशमुख म्हणाले.

कुरघोडय़ा करु नका

सांगली जिह्याचे पालकमंत्रीपद घेताना मला ‘सोसां’यची म्हणजे सांगली-सोलापूरची सवय लावून घेण्याचा सल्ला दिला होता. त्याप्रमाणे सोसतो आहे. काम करतो आहे. सांगली जिह्यापासूनच सोसायटय़ा सक्षम करण्यासाठी त्यासाठीच पाऊल उचलेले आहे. पण, मी सामान्य कार्यकर्ता आहे. माझ्यावर कुरघोडय़ा करु नका असे ना. देशमुख यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.

Related posts: