|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » एसटी भरतीतील ‘घोळा’वर ठेवले बोट

एसटी भरतीतील ‘घोळा’वर ठेवले बोट 

मराठा समाज पदाधिकारी आक्रमक : विभाग नियंत्रकांना घेराव : न्यायालयात जाणार

प्रतिनिधी / कणकवली:

एस. टी. महामंडळाच्या चालक कम वाहक भरती प्रक्रियेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय करण्यात आला आहे. यादीमध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना  जास्त गुण असतानाही ‘पूर्णांक’ दाखविताना कमी दाखवून रिजेक्ट करण्यात आले.  निवड यादीत हा ‘घोळ’ असून ही भरती प्रक्रिया रद्द करा. याबाबत अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत चालकांचे प्रशिक्षण बंद ठेवा, अशी मागणी करीत मराठा समाजाच्यावतीने विभाग नियंत्रकांना घेराव घालण्यात आला. निवड यादीतील घोळ पाहता तसेच प्रात्यक्षिक चाचणीत देण्यात आलेले गुण ‘मॅनेज’ करण्यात आले आहेत. हा मंत्रालय पातळीवर झालेला भ्रष्टाचार असून या भरती प्रक्रियेबाबत आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा जि. प. सदस्य सतीश सावंत यांनी सांगितले.

चालक कम वाहक भरती प्रक्रियेत सर्वसाधारण प्रवर्गाच्या 218 जागा होत्या, तर ओबीसाठीच्या 170 जागा होत्या. ओबीसीमध्ये 36 उमेदवारांची निवड झाली, तर सर्वसाधारणच्या यादीत ओबीसी व इतर प्रवर्गातील 90 उमेदवारांची निवड झाल्याने सर्वसाधारण उमेदवारांवर अन्याय झाल्याचा आरोप करीत मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने 14 रोजी विभाग नियंत्रकांना घेराव घालण्यात आला होता. यावेळी प्रात्यक्षिकांचे गुण मिळावेत, वाहक बॅच नसताना भरती झालेल्या चालकांची यादी मिळावी, अशी मागणी करीत तोपर्यंत चालक प्रशिक्षण थांबविण्याची मागणी करण्यात आली होती.

दरम्यान, याबाबत पुढे काय कार्यवाही करण्यात आली, या अनुषंगाने मराठा समाजाच्यावतीने विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांना शनिवारी घेराव घालण्यात आला. यावेळी सतीश सावंत, ऍड. सुहास सावंत, सुरेश सावंत, सचिन सावंत, सुशांत नाईक, सोनू सावंत, महेश सावंत, सुशिल सावंत, सुशांत दळवी, अभय राणे, बच्चू प्रभूगावकर, समीर सावंत, बबलू सावंत, सुहास सावंत, सुभाष सावंत, महेंद्र सांब्रेकर, शशी राणे यांच्यासह उमेदवार व मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

यावेळी भरतीच्या जाहिरातीत वाहक बॅच नसल्यास प्रशिक्षण पूर्ण होण्याअगोदर  तो सादर करण्यात यावा, अशी अट होती. त्यानुसार उमेदवारांची निवड झाली असल्याचे विभाग नियंत्रकांनी सांगितले. बिंदूनामावलीनुसार सर्वसाधारण प्रवर्गासाठीची गुणवत्ता यादी अगोदर होते. यात इतर प्रवर्गातील गुणवत्ताधारक समाविष्ट होऊन नंतर आरक्षित जागांसाठीच्या याद्या तयार होतात. शासन धोरणानुसार ही प्रक्रिया झाल्याचे हसबनीस म्हणाले.

दरम्यान, लेखी व चाचणी परीक्षेतील गुणांबाबत सावंत व सहकाऱयांनी माहिती मागितली. यावेळी महामंडळाच्या धोरणानुसार लेखी परीक्षेतील गुणांचा भारांक 40 टक्के, तर प्रात्यक्षिकचा भारांक 60 टक्के धरून अंतिम गुण काढले गेले असल्याचे हसबनीस यांनी स्पष्ट करीत यादी दाखविली. मात्र या यादीत जे प्रात्यक्षिकचे गुण देण्यात आले, त्यात ज्यांची निवड झाली, त्यांना 25 पैकी 24.5, तर निवड न झालेल्यांना 21 व 22 गुण आहेत. हा प्रकार पाहता ‘मॅनेज’ झाल्याचे दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, ही प्रक्रिया कॉम्प्युटरच्या सहाय्याने झाली असल्याचे सांगण्यात आल्यानंतर माहिती अधिकारात याचे पूर्ण फुटेज मागण्यासाठीचा अर्जही सादर करण्यात आला.

दरम्यान, अंतिम गुणांची यादी पाहत असताना निवड झालेल्या उमेदवारांचे अंतिम गुण 82 असल्याचे दिसून आले. उमेदवारांचे गुण काढताना 82.5 पर्यंत असल्यास पूर्णांक 82 तर त्यापुढे असल्यास पूर्णांक 83 धरण्यात आला होता. मात्र, हे करताना गुरुप्रसाद गावडे याला 85.2 गुण असतानाही पूर्णांक दाखविताना 65 दाखविण्यात आला. त्याच्यासोबतच अन्य तीन चार उमेदवारांच्याबाबतीत अशी स्थिती असल्याचे पुढे आले. याबाबत अधिकाऱयांना आंदोलनकर्त्यांनी विचारणा केली असता ते निरुत्तर झाले. त्यानंतर निवड उमेदवारांची अंतिम गुणांची साक्षांकित यादी विभाग नियंत्रकांकडून घेण्यात आली. तसेच याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत सध्या बंद ठेवलेले चालक प्रशिक्षण बंद ठेवण्यात यावे, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा देण्यात आला.

दरम्यान, या प्रक्रियेचा विचार करता मंत्रालय पातळीवर यात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय करण्यात आला आहे. या उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले.

उमेदवाराला रिजेक्ट केल्याचा आरोप

प्रात्यक्षिक चाचणी परीक्षेत जिल्हय़ातील एक उमेदवार टेस्ट देत असताना गिअर लॉक झाला. याबाबत खात्री करूनही त्याला पुन्हा संधी न देता रिजेक्ट करण्यात आले. मात्र, काहींना चार-चार वेळा संधी देण्यात आली. तेथील अधिकाऱयांकडे तक्रार करूनही दखल घेतली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

Related posts: